‘युपीआय’ला जागतिक मागणी

    23-Sep-2022   
Total Views |

upi
 
 
 
यंदाच्या जून महिन्यात जर्मनीत ‘जी-7’ राष्ट्रांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीला गेले. ‘जी-7’ राष्ट्रांचे संमेलन पार पडतानाच त्यातली एक चित्रफित प्रचंड ‘व्हायरल’ झाली. मोदींशी संवाद साधण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन स्वतःहून त्यांच्याकडे धाव घेताना त्यात दिसत होते. त्यावरून भारताची जगात सातत्याने वाढणारी पत-प्रतिष्ठा सर्वांना पाहायला मिळाली. अर्थात, अमेरिकेसारख्या ‘महासत्ता’ म्हणवल्या जाणार्‍या देशाच्या प्रमुखाने भारतीय पंतप्रधानांच्या भेटीसाठी पुढे येण्याइतकी परिस्थिती एकाएकी निर्माण झालेली नाही, तर भारताने आपल्या विकासप्रवासात अनेक टप्पे पाहिले असून, एकेकाळी भारताची खिल्लीही उडवली जात असे.
 
 
 
एकेकाळी भारताला विकसित देशांनी ‘गारुड्यांचा देश’ असेही संबोधित केले होते. पण, काळाचे चक्र सतत फिरत असते अन् सातव्या आसमानात वावरणार्‍यांना जमिनीवर तर जमिनीवर वावरणार्‍यांना सातव्या आसमानात पोहोचवत असते. भारताची खिल्ली उडवणार्‍यांबरोबरही तसेच झाले. परिणामी, भारताने आपल्या शक्तिशाली पायाची निर्मिती करतानाच तीव्र गतीने ओलांडलेल्या विकासाच्या विविध टप्प्यांमुळे आज संपूर्ण जग भारतासमोर कुर्निसात करत आहे. एकेकाळी भारताकडे डोळे वटारुन पाहणारे देशही आज भारताशी सन्मानाने चर्चा करत आहेत. जगात आज भारताचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान असून इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारताला कालसुसंगत पावले उचलावी लागली आहेत. या प्रवासात भारताने प्रत्येक क्षेत्रात विकास केला. परंतु, त्यातही अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात भारताने अभूतपूर्व प्रगती केली. त्याअंतर्गत भारताने ऑनलाईन देयक सहजसुलभ करण्यासाठी ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’-‘युपीआय’ची निर्मिती केली अन् याच ‘युपीआय’ने ऑनलाईन देयकक्षेत्रात खळबळ माजवली.
 
 
 
‘युपीआय’चा प्रभाव इतका वाढला की, आज विकसित देशदेखील या प्रणालीसाठी भारताशी चर्चा करत आहेत.
नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑनलाईन देयक क्षेत्रातील भारताने केलेल्या जबरदस्त प्रगतीची प्रशंसा करत म्हटले की, भारतीय ‘युपीआय’मध्ये सिंगापूर, भुतान आणि फ्रान्सने रस घेतला आहे. अन्य देशांनी ‘युपीआय’ प्रणाली आपलीशी करण्यासाठी भारताशी चर्चा करण्यामागे या प्रणालीची सहजसुलभ हाताळणी अन् सुरक्षाव्यवस्थेचे कारण आहे. भारतीय ‘युपीआय’ पैशाच्या हस्तांतरणाच्या वेगवान, कोणत्याही त्रासाशिवाय होणार्‍या आणि सर्वांत स्वस्त पर्यायांपैकी एक आहे. त्याचा वापर कोणतीही व्यक्ती कोणत्याही ठिकाणांहून आणि कधीही करू शकते. त्यासाठी केवळ एका प्रमाणिकरणाची आवश्यकता असून त्यात केवळ दोन कारकांचा समावेश असतो. यात देव-घेव करण्यासाठी केवळ ‘युपीआय आयडी’ची आवश्यकता असते.
 
 
 
खात्याविषयीची कोणतीही संवेदनशील माहिती इतरांना देण्याची, साठवून ठेवण्याची अथवा लक्षात ठेवण्याचीही यात आवश्यकता नसते. वापरकर्ते ‘युपीआय’ अ‍ॅपमध्ये आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांना एका ‘आयडी’ने सहजतेने जोडू शकतात. ‘युपीआय’ अ‍ॅपबरोबर वापरकर्त्यांना रोख रक्कम घेऊन जाण्याची आवश्यकता असते आणि ऑनलाईन अथवा ऑफलाईन खरेदी करण्यासाठीदेखील केवळ ‘क्यूआर कोड स्कॅन’चा वापर करावा लागतो. त्याद्वारे तत्काळ पैशांचे हस्तांतरण होते अन् कोणतीही तक्रार असल्यास थेट ‘युपीआय’ अ‍ॅपद्वारेही करता येते.
 
 
 
एका कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील ‘युपीआय’ प्रणालीची प्रशंसा केली होती. ‘युपीआय’मध्ये प्रत्येक मिनिटाला 1 लाख, 30 हजार देवघेवीच्या व्यवहारांची नोंदणी केली जाते, त्याद्वारे जगातील 40 टक्के ‘डिजिटल’ देवघेवीचे व्यवहार भारतात होतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. ‘एनपीसीआयएनआयपीएल’ने 2021 मध्ये ‘युपीआय’आधारित देयक स्वीकारण्यासाठी सिंगापूरशी सहकार्यावर स्वाक्षरी केलेली आहे. त्यानुसार, वापरकर्ते सिंगापूरमध्ये ‘भीम’ अ‍ॅपच्या माध्यमातून खरेदी करू शकतात.
 
 
 
‘एमएएस’ आणि ‘आरबीआय’देखील सिंगापूरचे ‘पे-नाऊ’ व भारताच्या ‘युपीआय’ला ‘रिअल-टाईम’ देयक प्रणाशी जोडण्यावर काम करत आहे. याच मालिकेंतर्गत भारताचे ‘भीम युपीआय’ जुलै 2021 मध्ये भुतानमध्ये जारी करण्यात आले होते. मलेशिया, युएई आणि फ्रान्सदेखील याच मार्गावर आहेत. येत्या काळात ऑस्ट्रेलिया आणि रशियातदेखील ‘युपीआय’चा वापर होऊ शकतो. यावरुनच ‘युपीआय’चे यश अधोेरेखित व्हावे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.