नक्षलवादविरोधी मोहिमेस निर्णायक यश प्राप्त: अमित शाह

हिंसक घटनांसह नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्येही घट

    22-Sep-2022
Total Views |
shah

नवी दिल्ली: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षादलांनी देशभरातील डाव्या विचारसरणीच्या दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये निर्णायक यश प्राप्त केले आहे. बुधा पहाड, चक्रबांध आणि भीमबांध या दुर्गम भागातून माओवाद्यांना यशस्वीपणे बाहेर काढून प्रथमच सुरक्षादलांच्या कायमस्वरूपी छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. दहशतवाद आणि डाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांविरोधात गृहमंत्रालयाचे शून्य सहिष्णुता धोरण सुरूच राहील आणि हा लढा आणखी तीव्र होईल,” असे प्रतिपादन देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी बुधवारी केले आहे.
 
 
सुरक्षादलांनी गेल्या काही काळात नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईमध्ये प्राप्त केलेल्या यशाची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देण्यात आली. त्यात म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नक्षलवादमुक्त भारताचा दृष्टिकोन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचे धोरण लक्षात घेऊन, गृह मंत्रालयाने देशभरात डाव्या विचारसरणीच्या दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. डाव्या विचारसरणीच्या अतिरेकाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात सुरक्षादलांनी आज निर्णायक विजय मिळविण्यास प्रारंभ केला आहे.”
 
 
छत्तीसगढ आणि झारखंडच्या सीमेवरील बुढा पहाड आणि बिहारमधील चक्रबंध आणि भीमबांध या अत्यंत दुर्गम भागात घुसून माओवाद्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातून यशस्वीपणे बाहेर काढल्यानंतर प्रथमच तेथे सुरक्षादलांचे कायमस्वरूपी तळ उभारण्यात आले आहेत. हे सर्व क्षेत्र प्रमुख माओवाद्यांचे बालेकिल्ले होते आणि या ठिकाणी सुरक्षादलांनी शस्त्रास्त्रे, दारूगोळा, विदेशी ग्रेनेड्स, एरोबॅम आणि ‘आयईडी’चा मोठा साठा जप्त केला होता. 2019 पासून डाव्या विचारसरणीच्या अतिरेकाविरोधात विशेष रणनीती अवलंबली जात आहे. केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दले आणि संबंधित एजन्सींच्या समन्वित प्रयत्न आणि मोहिमांमुळे डाव्या विचारसरणीच्या अतिरेकाविरुद्धच्या लढ्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे.”
 
 
2022मध्ये, ‘ऑपरेशन ऑक्टोपस’, ‘ऑपरेशन डबल बूल’, ‘ऑपरेशन चक्रबंध’मध्ये सुरक्षादलांना अभूतपूर्व यश मिळाले आहे. डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांविरुद्धच्या लढाईत सात माओवादी ठार झाले आणि छत्तीसगढमध्ये 436 अटक/शरण आले. झारखंडमध्ये चार माओवादी मारले गेले आणि 120 जणांनी शरणागती पत्करली आहे. बिहारमध्ये 36 माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे, तर मध्य प्रदेशात तीन माओवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. यापैकी मिथिलेश यादवसारख्या माओवाद्यावर एक कोटी रुपयांची बक्षीसही ठेवण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.
 
 
मोहीम आता अंतिम टप्प्यात
 
माओवादविरोधी मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 2022 मध्ये डाव्या विचारसरणीशी संबंधित हिंसाचाराच्या घटनांमध्ये 39 टक्के घट झाली आहे, सुरक्षादलांच्या जवानांच्या बलिदानांच्या संख्येत 26 टक्के, नागरी मृत्यूच्या संख्येत 26 टक्के घट झाली आहे. हिंसाचार होणार्‍या जिल्ह्यांची संख्या 24 टक्के कमी झाली आहे असून 2022मध्ये या जिल्ह्यांची संख्या केवळ 39 झाली आहे.
 
 
हिंसाचारामध्ये घट
 
2014 पूर्वीच्या तुलनेत डाव्या विचारसरणीच्या हिंसाचाराच्या घटना 77 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. हिंसाचाराच्या घटना 2009मधील सर्वोच्च 2,258वरून 2021मध्ये 509 पर्यंत खाली आल्या आहेत. हिंसाचारामुळे मृत्यूचे प्रमाणही 85 टक्क्यांनी कमी झाले आहे. 2010 मध्ये ते 1,005च्या सर्वोच्च स्तरावर होते, ज्यामुळे 2021 मध्ये मृतांची संख्या 147 वर आली आहे आणि त्यांच्या प्रभावाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे.