सहा वर्षांनंतरही हँकॉक पूल अपूर्णावस्थेतच!

प्रकल्प खर्च पाच पटीने वाढूनही निकृष्ट बांधकाम

    21-Sep-2022
Total Views |
hanckok 
 
मुंबई : मागील सहा वर्षांपासून काम सुरू असणारा सध्याचा मुंबईतील पूल म्हणजे ‘हँकॉक पूल’ माझगाव आणि डोंगरी परिसराला जोडणारा हँकॉक पूल बांधून 18 महिन्यांत पूर्ण होणे, अपेक्षित होते. मात्र, सहा वर्षांनंतरही या पुलाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. या चारपदरी असणार्‍या हँकॉक पुलाच्या दोन मार्गिका न्यायालयाच्या आदेशामुळे दि. 1 ऑगस्ट रोजी खुल्या करण्यात आल्या आहेत. परंतु, या पुलाचे आतापर्यंत झालेले काम हेदेखील निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना केला.
 
 
जानेवारी 2016 मध्ये रेल्वेच्या तब्बल 18 तासांच्या रेल्वे ‘मेगाब्लॉक’च्या माध्यमातून हँकॉक पूल जमीनदोस्त करण्यात आला. 18 महिन्यांत जो पूल बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते. सहा वर्षं उलटल्या नंतरही त्या पुलाचे बांधकाम अपूर्ण आहे.
 
 
पुलावर अपघातांची शक्यता अधिक!
या पुलासाठीचा 14 कोटींमध्ये अपेक्षित असणारा खर्च मागील सहा वर्षांत पाचपटीने वाढत 75 ते 80 कोटींच्या घरात गेला आहे. परंतु, असे असूनही अद्याप हा पूल पूर्ण झालेला नाही. या पुलासंबंधी अनेक डेडलाईन हुकल्या. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने 1 ऑगस्टचा मुहूर्त साधत या पुलाच्या दोन मार्गिका जरी नागरिकांसाठी खुल्या केल्या असल्या तरी या मार्गिका अरुंद असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचेदेखील स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच, ज्या भागात पुलाचे काम सुरू आहे तेथे अनेक गर्दुल्ले आणि दारुडे असल्याचेही स्थानिकांनी म्हटले आहे.
 
 
या परिसरात असलेल्या ‘म्हाडा’च्या इमारती, खासगी इमारती आणि गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पालिकेकडून अद्याप सोडविण्यात आला नसल्यामुळे या पुलाचे काम सहा वर्षांनंतरही रखडलेलेचे आहे. या इमारतींमधील नागरिकांची जोवर पर्यायी व्यवस्था होत नाही, तोवर या पुलाचे काम पुढे सुरू होणे अशक्य आहे. दरम्यान, या पुलाशेजारील खासगी इमारत आणि गाळे मालकांशी पालिकेचा अद्याप काही संपर्क झाला नसल्याचेही स्थानिकांनी स्पष्ट केले.
 
 
पाच वर्षांनी कामास सुरुवात
मध्य रेल्वेच्या सॅण्डहर्स्ट रोड स्थानकानजीकचा ब्रिटिशकालीन हँकॉक पूल धोकादायक झाल्यामुळे 2016 मध्ये तो पूल पाडण्यात आला. त्यानंतर 2018 मध्ये नव्याने पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु, कधी जलवाहिन्या, तर कधी नजीकच्या झोपड्यांमुळे पुलाच्या कामात अडचणी आल्या. त्यामुळे खर्‍या अर्थाने प्रत्यक्षात पुलाच्या कामास 2021 मध्ये सुरुवात झाली.
 
पूलबांधणीवेळी येणार्‍या अडथळ्यांचा विचार आवश्यक या पुलाचे बांधकाम म्हणजे ‘अंगापेक्षा भोंगा मोठा’ असे झाले आहे. ज्यावेळी मुंबई महापालिकेच्या टेबलवर या फाईल्स पोहोचल्या, त्यावेळी पालिकेने आधी या पुलाच्या बांधणीमध्ये येणार्‍या अडथळ्यांचा विचार करणे गरजेचे होते. जो पूल दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, तो पूल अजूनही अपूर्णच आहे. या पुलाचा जो दर्जा असणे अपेक्षित होता, तो नाहीे. या पुलावर अपघात होण्याचीही शक्यता आहे. तसेच, पुलाच्या बांधकामामध्ये येणार्‍या इमारतींच्या स्थानिकांशी बोलून बैठका घेऊन त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे, अन्यथा या पुलाचे काम आणखी बरीच वर्ष पूर्ण होणे अशक्य आहे. 
- दीपक मिर्के, स्थानिक
तुमच्या राजकारणात जनतेची फरफट नको!      प्रशासनांमध्येच ताळमेळ नाही. ज्या गोष्टींना प्राधान्य देण्याची गरज आहे, त्या गोष्टींना येथे प्राधान्य देण्यात आले नाही. हा पूल सहा वर्षांनंतरही अर्धवट आहे. सद्यःस्थितीत हा पूल पूर्ण होईल, असे वाटत नाही. कारण, हा पूल पूर्ण करायचा, तर मध्ये येणार्‍या इमारती, दुकाने, घरे पाडावी लागतील. ते काही एक-दोन दिवसात किंवा एका महिन्यात होईल, असे नाही. तसेच, या पुलावर काम सुरू असताना बांधकामाचे सामान असो किंवा इतर गोष्टी अशाच टाकण्यात आल्या आहेत. त्याकडे लक्ष देण्यास काहीच सुरक्षाव्यवस्था नाही. प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की, तुमच्या राजकारणात जनतेची फरफट होऊ देऊ नका. अजूनही आपल्याकडे निवडणुका आल्या की, असा पुलाचा वगैरे इतर विषय समोर आणायचे आणि निवडणूक लढवायच्या. तसे तुम्ही करू नका आणि लवकरात लवकर हा पूल बांधून पूर्ण करा, एवढीच आमची मागणी आहे.
 - राजन दळवी, स्थानिक
नागरिकांच्या तक्रारींची पाहणी करून मग ठोस कारवाई!
चार मार्गिकांचा असणार्‍या या पुलाच्या दोन मार्गिका पूर्ण झाल्या असून, त्या सुरूदेखील करण्यात आल्या आहेत. परंतु, काही ‘स्ट्रक्चर्स’ या पुलाच्यामध्ये येत असल्यामुळे हा पूल पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे त्या पुलाचे काम हे उत्तम झाले असून, जर नागरिकांची काही तक्रार असेल, तर त्यासंबंधी पाहणी करून त्यासंबंधी पावले उचलण्यात येतील.
- सतीश ठोसर, प्रमुख अभियंता, पूल विभाग, मुंबई महानगरपालिका
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
- शेफाली ढवण