अनाथ, निराधार बालगोपाळांना आधार देणारे गोकुळ आश्रम

    21-Sep-2022   
Total Views |
 
gsg
 
 
 
 
सगळं सोनं बँकेत गहाण. डोक्यावर कर्जाचा डोंगर. ‘तुला मारून टाकू, तुझं आश्रम बंद पाडू’ असे अनेक धमक्यांचे फोनही नित्याचेच. प्राणघातक हल्ल्यातून हिमतीने जीव वाचवून आजही मोठ्या हिमतीने ‘वुमेन्स फाऊंडेशन’अंतर्गत ‘गोकुळ आश्रम’ उभा आहे. जाणून घेऊया निराधार, अनाथ, बेघर आणि एचआयव्हीबाधितांना मायेची सावली देणार्‍या गुंजन सविता गोळे यांच्या गोकुळ आश्रमाविषयी...
 
 
मरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यामधील हंतोडा गावी जन्मलेल्या गुंजन सविता गोळे यांनी सीताबाई संगई कन्या शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. चौथीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेत त्या महाराष्ट्रातून नवव्या आल्या. पाचवीपासून त्यांनी आपल्या शाळेचे ‘अ‍ॅथलेटिक्स’मध्ये प्रतिनिधित्व केले. बालपणापासून आई सविता सर्वांना मदत करत. तीच सवय गुंजनताईंनाही लागली. एकदा शाळेत जाताना एक मुलगी झपाझप पावले टाकत एका विहिरीकडे जाताना गुंजनताईंना दिसली. तेव्हा त्यांनी त्या मुलीचा मागोवा घेत नंतर तिची समजूत काढून स्वतःच्या घरी नेले. त्यामुळे इतक्या लहान वयात त्यांनी एका मुलीचा जीव वाचवला. आजोबा हरिश्चंद्र गोळे यांनाही गावात मोठा मान होता. पैलवान असलेले आजोबाही गावातील गरजूंना मदत करत.
 
 
शालेय वयात गुंजनताई वर्गात कुणाकडे पेन, पेन्सिल नसल्यास ती देणे, सायकलवर ’लिफ्ट’ देणे, नववीत मोफत शिकवणी वर्ग घेणे अशी कामे करत होत्या. त्यामुळे समाजसेवेची आवड त्यांना शालेय वयातच लागली. सातवीत त्या वृत्तपत्रांतून लिखाणही करत होत्या.
 
 
’एनसीसी’ आणि ’एनएसएस’च्या माध्यमातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे, ‘एनएसएस’ व ’एनसीसी’ कॅम्पच्या माध्यमातून त्यांना समाज, जीवन आणि माणसे कळत गेली. घराला आधार म्हणून त्यांनी अनेकदा स्वतःच्या शेताबरोबरच दुसर्‍यांच्या शेतात मजुरी केली. राधाबाई शारदा महाविद्यालयातून त्यांनी मानसशास्त्राची पदवी घेतली. रस्त्यावरून जाताना गुंजनताई नेहमीच गरजूंच्या शोधात असायच्या. पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी त्यांनी 2010 साली अमरावतीच्या ‘एमव्हीएम महाविद्यालया’त प्रवेश घेतला. एकदा अपघातग्रस्त व्यक्तीला त्यांनी वेळीच रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला. त्यानंतर त्यांची समाजसेवेची आवड आणखी वाढली.
 
 
एकदा रस्त्याच्या कडेला अर्धनग्न अवस्थेत एक मनोरुग्ण महिला चिवडा खाताना दिसली. तो चिवडा तिच्याबरोबर दोन कुत्रेही खात होते. त्यावेळी काही मुले त्या महिलेला त्रास देत होती. गर्भवती असलेल्या या महिलेवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुंजनताईंनी तिला रूग्णालयात नेले. बाळ वाचले नाही आणि पुढे त्या महिलेचेही निधन झाले. पुढे त्यांनी मनोरुग्णांसाठी काम सुरू केले. बेवारस मृतदेहांच्या अंतिम संस्कारासाठी ताईंनी पुढाकार घेतला. आतापर्यंत त्यांनी 150 हून अधिक मृतदेहांचे अंत्यविधी केले आहे.
 
 
दुचाकीवरून प्रवास करताना त्या नेहमी पाण्याची बाटली, रूमाल, खाऊ असे सोबत ठेऊ लागल्या. ज्याला गरज असेल, त्याला ते देत. स्वतःचा डबाही त्या मनोरुग्णांना खाऊ घालत. काही काळ त्यांनी नोकरीचा मार्गही पत्करला. स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. पुस्तके विकत घेण्यासाठी पैसे नसायचे. तेव्हा त्यांनी अगदी घरोघरी जाऊन ’वॉशिंग पावडर’सुद्धा विकली.
 
 
“माझा जन्म ’10 ते 5’ नोकरी करण्यासाठी झालेला नाही,” असे त्यांना वाटे. त्यामुळे त्यांनी तीन ते चार वर्षे नोकरी केल्यानंतर तो मार्गही सोडला. “मी घरात राहणार नाही. काहीतरी करून दाखवेन,” असा निश्चय केला. केदारनाथचा महाप्रलय, जम्मू-काश्मीरच्या महापुरातही त्यांनी गरजूंना मदतीचा हात दिला. शेकडो मृतदेहांचा खच पडलेला पाहून त्यांना माणसाचे जीवन किती क्षणभंगूर आहे, याची प्रचिती आली. संपूर्ण जगासाठी नाही पण किमान आपल्या गाव, परिसरासाठी तरी आपण काहीतरी करायला हवे, असे त्यांनी ठरवले.
 
 
नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर त्यांनी तिथेही ‘बुलेट क्लब’सोबत काम केलं. शीख धर्मीयांच्या ‘लंगर’मध्ये सेवा दिली. त्यावेळी कितीतरी रात्री त्यांनी रस्त्यावर झोपून काढल्या. एका संस्थेच्या माध्यमातून त्यांनी 2013 ‘एचआयव्ही’बाधित मुलांसाठी काम करण्यास सुरुवात केली. एकदा संस्थेने त्यांना एका ‘एचआयव्ही’बाधित मुलाची मदत करण्याची विनंती केली. त्यावेळी ताईंनी होकार देत, त्या लहान मुलाची भेट घेतली. त्याला गाडीवर बसण्यास सांगितले, पण तो खूप अंतर राखून गाडीवर बसला. ‘तू खाली पडशील,’ असे सांगत ताईंनी त्याला घट्ट पकडण्यास सांगितले, पण तो ऐकत नव्हता. नंतर ताईंच्या पाठीवर मान ठेवत तो रडायला लागला.
 
 
ताईंनी गाडी थांबवून त्याला विचारले तेव्हा त्याने माझे आई-वडीलही ‘एचआयव्ही’बाधित होते. ते गेल्यानंतर मला आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी स्पर्श केला असल्याचे सांगितले. भर रस्त्यात ताई आणि तो मुलगा रडत बसले. नंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी ताईंनी पुढाकार घेतला. डॉक्टरांनी हा मुलगा जगणार नाही, असे सांगितले. परंतु, तो अजूनही जीवंत आहे.
 
 
प्रेमाला आणि स्पर्शाला आसुसलेल्या मुलांची आपण किमान प्रेमाची सावली तरी होऊ शकतो, हा उद्देश समोर ठेवून ताईंनी ’एचआयव्ही’बाधित मुलांसाठी काम करण्यास सुरुवात केली. ‘एचआयव्ही’बाधित मुलांचा आणि निराधार, गरजूंचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी भाड्याने एक घर घेतले. सुरुवातीला एक महिला आणि तिची मुले ताईंसोबत राहत होती. परंतु, याठिकाणी परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध झाला. त्यानंतर त्यांनी दोन-तीन घरे बदलली. महापालिकेच्या बंद पडलेल्या उर्दू शाळेच्या हॉलमध्ये त्यांनी दोन वर्षे काढली.
 
 
कर्नल राजेश आढाऊ यांनी एकदा या कार्याला दिशा देण्यासाठी त्यांनी गुंजनताईंना संस्था स्थापन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ताईंनी ’वुमेन्स फाऊंडेशन, अमरावती’ या नावाने 2015 साली संस्था स्थापन केली. त्याअंतर्गत त्यांनी तपोवन टेकडीजवळ भाड्याच्या जागेत ’गोकुळ आश्रमा’ची स्थापना केली. कुठल्याही सरकारी मदतीविना त्यांनी या कार्याला सुरुवात केली. सध्या या आश्रमात 27 हून अधिक मुलांचा सांभाळ ताई करत असून यात ’एचआयव्ही’बाधित मुलांसह अनाथ, निराधार मुलांचाही समावेश आहे. संस्थेतर्फे वैद्यकीय मदत, दूधदान चळवळ, कुमारीमाता व एकलमातांचे प्रश्न व त्यांचे समुपदेशन, बेवारस मृतदेहांचे अंतिमविधी, बचगटाच्या महिलांनी रोजगार उपलब्ध करून देणे, असे अनेक उपक्रम राबवले जातात.
 
 
त्यांचे सगळे सोने बँकेत गहाण असून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. ‘गोकुळ आश्रम’ हे दाट जंगलात असून तिथे जाण्यासाठी चांगला रस्ताही नाही. त्यामुळे अनेकदा रूग्णवाहिका येण्यासही अडथळा निर्माण होतो. अनेक महिलांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या पतींचे धमकीचे फोन येतात. ‘तुला मारून टाकू, तुझा आश्रम बंद पाडू,’ अशा धमक्याही त्यांना नेहमीच येतात. अनेकदा प्राणघातक हल्लेही गुंजनताईंनी अक्षरशः परतवून लावले. सध्या त्यांना ‘गोकुळ आश्रमा’ची जागा सोडावी लागणार असल्याने त्यांच्यासमोर जागेचा मोठा प्रश्न उभा आहे.
 
 
भविष्यात त्यांना 500 ‘एचआयव्ही’बाधित मुलांचा निवासी प्रकल्प सुरू करायचा आहे. त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. मेळघाटातील कुपोषणावरही काम करण्याची त्यांची इच्छा आहे. समाजाच्या देणगीवर सध्या ‘गोकुळ आश्रम’ उभा आहे. लोकांनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन त्या करतात. सध्या त्यांना या कामात आई सविता गोळे, पती आश्विन तळेगावकर, माजी नगरसेविका स्वाती निस्ताने, प्रणित सोनी, नितीन धावडे, राजेश आढाऊ, अभय तरंगे यांसह पोलीस प्रशासनही मोलाचे सहकार्य करते.
 

संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले सेवाकार्य
 
 
* अनेक नवजात बाळांना स्वतःचे दूध पाजून दूधदान चळवळ सुरू करून स्तनदा मातांना मार्गदर्शन व सहकार्य.
 
* रस्त्यावरील मनोरुग्णांना अन्नवाटप, तसेच प्रथमोपचार करून त्यांचे पुनर्वसन करणे.
 
* शहरातील बेवारस मृतदेहांचा स्वखर्चातून अंत्यविधी करणे.
 
* कुमारीमातांच्या मनोबलवाढीसाठी कार्य, तसेच त्यांना वैद्यकीय व कायदेशीर सर्व बाबींमध्ये मदत करून पुनर्वसन करणे.
 
* संपूर्ण महाराष्ट्रभर ‘एचआयव्ही’, मासिक पाळी, मानसिक आरोग्य या दुर्लक्षित विषयांवर जनजागृती कार्यशाळा, व्याख्यान आयोजित करून मार्गदर्शन करणे.
 
* महाराष्ट्रभर शाळा, महाविद्यालयांतील मुली व महिलांना स्वरक्षणाचे धडे देऊन त्यांचे मनोबल वाढवणे.
 
* पूर, भूकंप अशा आपत्तीजनक परिस्थितीत प्रत्यक्ष जाऊन मदतकार्य करणे.
 
* बचतगटांच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षण बनविण्यासाठी कार्य.
 
* वनवासी भागातील महिला व मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी कार्य.
 
* दर महिन्याला गरजू ‘एचआयव्ही’बाधित मुले व महिलांना ‘प्रोटिन किट’ वाटप.
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.