नवी दिल्ली : देशातील खाद्यतेलांच्या किंमती हा सर्वसामान्य भारतीयांच्या कायमच जिव्हाळ्याचा विषय असतो. तेलबिया उत्पादनात भारत स्वयंपूर्ण नसल्याने भारताला या बाबतीत कायमच आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे भारतातील खाद्यतेलांचे भाव कायम चढेच राहतात. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सारा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देणारी गोष्ट घडली आहे. भारतातील खाद्यतेलांच्या किंमती लवकरच आटोक्यात येणार आहेत. भारताचा सर्वात मोठा खाद्यतेल पुरवठादार देश असलेल्या इंडोनेशियाने भारतातला निर्यात होणाऱ्या पामतेलांच्या किंमतीत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत हा खाद्यतेलांचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. रशिया - युक्रेन युद्धामुळे जगातील खाद्यतेल पुरवठा साखळी संपूर्णपणे कोलमडलेली आहे. त्याच सर्वात जास्त फटका हा भारतालाच बसला. भारतात प्रामुख्याने पामतेल, सूर्यफूलतेल यांची आयात केली जाते. यालाच जोरदार धक्का बसल्यामुळे भारतात खाद्यतेलांच्या किंमती गगनाला भिडल्या. भारत सरकारने सातत्याने ही पुरवठा साखळी तुटू नये यासाठी प्रयत्न केले. यालाच आता यश आल्याचे दिसून येत आहे. इंडोनेशिया, मलेशिया यांसारख्या देशांनी भारताला निर्यात होणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमतीत सूट देण्याचा निर्णय घेतला.
भारत सातत्याने खाद्यतेलांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहे. तेलबियांच्या लागवडीसाठी भारत सरकारने प्रोत्साहन देणाऱ्या योजनाही सुरु केल्या आहेत. याशिवाय भारत सरकारने हे वर्ष भरड खाद्य वर्ष म्हणून जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यात भारतीय धान्ये, कडधान्ये यांच्या सेवनाने होणारे फायदे यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.