"नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित!" : पंतप्रधान
आयएनएस विक्रांतच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण
02-Sep-2022
Total Views | 162
73
कोची : भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका शुक्रवारी (२ सप्टेंबर) नौदलाच्या सेवेत दाखल झाली. कोचीमध्ये झालेल्या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. "आयएनएस विक्रांत भारतीय सामर्थ्याचं प्रतीक असून प्रत्येक भारतीयासाठी स्वाभिमान आहे! ते भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे जहाज ठरणार आहे. तसेच आत्मनिर्भर भारताचं प्रतिक ठरणार आहे.", असे म्हणत पंतप्रधानांनी आयएनएस विक्रांतच्या सामर्थ्याचा यावेळी गौरव केला. या सोहळ्यादरम्यान भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचंही अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
नौदलाच्या नव्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉस हटवण्यात आले असून डाव्या बाजूला तिरंगा तर उजव्या बाजूला नौदलाला संबोधित निळ्या रंगाचे नवे चिन्ह साकारण्यात आले आहे. त्या खाली संस्कृत भाषेत 'शं नो वरूणः' असे लिहिण्यात आले आहे. "इतिहास बदलून टाकणारी आणखी एक ऐतिहासिक घटना आजच्या दिवशी घडली आहे. भारताने गुलामगिरीचे ओझे उतरवले असून भारताला नवा ध्वज मिळाला आहे. आजवर या ध्वजावर गुलामगिरीची ओळख होती. मात्र आजपासून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात डौलाने फडकणार आहे.", असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
'विक्रांत'वर महिलांनाही स्थान मिळणार!
"आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आहे. ही नौका जेव्हा देशाच्या सागरी क्षेत्रात रक्षणासाठी उतरेल तेव्हा नौदलाच्या अनेक महिलाही जहाजावर तैनात असतील. भारतीय नौदलाने महिलांसाठी आपल्या सर्व शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाने वोकल फॉर लोकल हा मंत्र जगायला सुरुवात केली तर देश स्वावलंबी व्हायला फारसा वेळ लागणार नाही.", असे पंतप्रधान मोदी यांचे म्हणणे आहे.
कशी आहे आयएनएस विक्रांत?
विक्रांत ही एक विमानवाहू युद्धनौका आहे. एकाच वेळी ३० पेक्षा जास्त विविध प्रकारची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता विक्रांतमध्ये आहे. तब्बल ४० हजार टन एवढे वजन असून पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना ते ४५ हजार टनपर्यंत वाढू शकते. एका दमात १५ हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची क्षमता आहे. तब्बल १४०० पेक्षा जास्त सैनिक, अधिकारी, कर्मचारी विक्रांतवर तैनात राहू शकतात. हवेतील १०० किलोमीटर पर्यंत उंचीवरील लक्ष्य भेदणारी बराक-८ ही क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात करण्यात आली आहेत. २६२ मीटर लांब आणि १४ मजली उंच अशी ही आयएनएस विक्रांत पूर्णतः स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका आहे.