‘रंगछंद’ कलाकार

    02-Sep-2022   
Total Views |

roshan
 
 
 
ज्या गोष्टीसाठी सवड नव्हती, तीच नंतर आवड झाली. सध्या तो ‘रंगछंद ग्रुप’च्या माध्यमातून १५ हून अधिक मुलांना रांगोळी रेखाटण्याचे धडे देत आहेत. जाणून घेऊया रोशन जयवंत पाटील याच्याविषयी...
 
 
पनवेलजवळील कसळखंड या गावी जन्मलेल्या रोशन जयवंत पाटील याच्या घरची परिस्थिती तशी अगदी सामान्य. जे. एच. अंबानी शाळेत त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शालेय वयात अत्यंत शांत आणि संयमी असल्याने तो शाळेत तसा जास्त परिचित नव्हता. चौथीत असताना रोशनने रांगोळी रेखाटण्याचा छोटासा प्रयत्न केला होता. रांगोळी स्पर्धेकरिता तेव्हा त्याला आईनेच गणपतीची रांगोळी काढायला शिकवली. अगदी त्याच पद्धतीने त्याने रांगोळी रेखाटली आणि त्याला बक्षिसही मिळाले. अकरावीला विज्ञान शाखा घेतल्याने त्याला ते अतिशय जड गेले. अगदी बारावीपर्यंत रोशनला व्यासपीठावर जाण्याचीदेखील भीती वाटायची. अकरावीत त्याने शिवाजी महाराजांची रांगोळी रेखाटली.
 
 
तेव्हा त्याने या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. केवळ स्पर्धेकरिता त्याने रांगोळी रेखाटली पण रांगोळीच्या क्षेत्रात पुढे काम करेल, असा विचारही त्याने कधी केला नव्हता. बारावीनंतर तो रांगोळी वगैरे सर्व विसरला. पुढे भाऊ इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असल्याने त्यानेही भावाची मदत होईल म्हणून पिल्लेज कॉलेजला २०१३ साली इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. एकदा दिवाळीत आई रांगोळी काढत असताना रोशन रांगोळी न्याहाळत होता. तेव्हा त्यानेही पेपरवरील फोटो पाहून बाळासाहेब ठाकरेंची रांगोळी रेखाटली.
 
 
या रांगोळीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर रोशनवर कौतुकाचा वर्षाव झाला. अनेकांनी त्याला त्याच्या या आवडीसाठी प्रोत्साहन दिले. पुढे नातेवाईकांच्या घरी पूजा असल्याने तिथे त्याला रांगोळी काढण्याची संधी मिळाली. या रांगोळीमुळेही त्याचे भरपूर कौतुक झाले. त्यानंतर ‘शिवप्रेमी मंडळा’ने त्याला महाड येथील गणपती मंदिरात रांगोळी काढण्याविषयी विचारले. मात्र, रोशन रांगोळी रेखाटण्यात इतका तरबेज नसल्याने त्याने सुरूवातील नकार दिला. परंतु, मंडळाने दाखविलेल्या विश्वासामुळे तो तयार झाला. त्यावेळी रवी चौधरीच्या मदतीने रोशनने रांगोळी काढली. नंतर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही त्याने छानशी रांगोळी काढली.
 
 
यावेळी कॉलेजमधील शिपाई असलेल्या सदाकाकांनी रोशनला त्याच्या रांगोळीवर हात फिरवण्याची इच्छा व्यक्त केली. रोशनने होकार देताच सदाकाकांनी अर्थात सदाशिव अव्हेरे यांनी रांगोळीला आपल्या अनोख्या शैलीने चार चाँद लावले. खराब वाटणार्‍या रांगोळीला त्यांनी अक्षरशः जीवंत केले. अवाक झालेल्या रोशनने त्यांच्याकडे मार्गदर्शनसाठी विनंती केली. यानंतर रोशन सदाकाकांसोबत रांगोळी काढण्यासाठी जाऊ लागला. सदाकाकांचे सुंदर हस्ताक्षर पाहून रोशन भारावला होता. रांगोळीतील बारकावे त्याने त्यांच्याकडून शिकून घेतल्या. हळूहळू रांगोळी कलाकारांशी रोशनची ओळख झाली. कॉलेज संपल्यानंतर तो स्पर्धांसाठी जाऊ लागला. एवढे शिक्षण घेऊनही नुसता रांगोळ्या काढत बसला म्हणून त्याची हेटाळणी होऊ लागली. पण, त्याकडे दुर्लक्ष करत महाड येथील गणपती मंदिर परिसरात तो रांगोळी काढू लागला. तेव्हा त्याची वाहवा झाली.
 
 
कुटुंबीयांचे त्याला संपूर्ण सहकार्य मिळत होते. परंतु, घरी किती दिवस बसणार हादेखील प्रश्न होता. सुरूवातीला नोकरीसाठी चाचपणी केली असता कमी पगार मिळत असल्याने त्याने रांगोळीचा पर्याय निवडला. परंतु, नंतर पावसाळ्यात रांगोळीची कामे कमी मिळायची. कुटुंबीयांनीही नंतर नोकरीसाठी आग्रह धरला. अखेर रोशन एका कंपनीत रुजू झाला. नोकरीसोबत त्याने आपली रांगोळीची आवडदेखील जोपासण्यास सुरूवात केली. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या विवाहातही त्याला रांगोळी काढण्याची संधी मिळाली. पुढे रोशनला रांगोळी क्लास घेण्याची मागणी होऊ केली. त्यानंतर त्याने क्लासेस सुरू करण्यासाठी चाचपणी केली. क्लासेससाठी नोकरी सोडली. परंतु, जागा भेटत नसल्याने तोही विषय बारगळला. पुढे महाड येथील मंदिरात त्याने मुलांना शिकण्यासाठी बोलावण्यास सुरूवात केली. हळूहळू रांगोळी शिकण्यासाठी मुलांची संख्याही वाढली. पुढे त्याने रांगोळीवर स्वतःचे नाव टाकणेही बंद केले. या ग्रुपला ‘रंगछंद कलाकार, पनवेल’ असे नाव देण्याचे ठरले. या ग्रुपच्या माध्यमातून त्याने १५ हून अधिक मुलांना रांगोळी शिकवण्याचे मोफत धडे देण्यास सुरूवात केली.
  
 
 
रांगोळी आनंद देऊ शकते, पोट भरू शकत नाही, असा सल्ला ज्येष्ठ कलाकार महादेव गोपाळे यांनी रोशनला दिला. नंतर ‘लॉकडाऊन’मुळे रोशनपुढे पुन्हा मोठे संकट उभे ठाकले. त्याने पुन्हा नोकरीचा मार्ग पत्करला. आतापर्यंत शेकडो रांगोळ्या व चित्रे त्याने काढली आहे. रांगोळी काढल्यानंतर आदर मिळतो, पण तुमच्या आयुष्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. रांगोळीची आवड असली तरीही नोकरीदेखील तितकीच आवश्यक आहे. रांगोळीसाठी ‘स्केचिंग’ महत्त्वाची आहे. कारण, ज्याला ‘स्केच’ जमले त्याला रांगोळीही सहज जमून जाते, असे रोशन सांगतो. इतक्या कमी वयातही रोशन १५ हून अधिक मुलांना रांगोळी रेखाटण्याचे धडे देत आहे आणि तेही अगदी मोफत. त्याच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.