गृहखरेदीचा विक्रम यंदा मोडणार ? सविस्तर वाचा या लेखात

    19-Sep-2022
Total Views |

real
 
गृहखरेदी हा सर्व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. स्वतःचे छोटेसे का होईना पण घर असावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी कधी कधी आयुष्यभराची पुंजी पणाला लावली जाते. त्यामुळे सर्वच भारतीयांच्या दृष्टीने हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि संवेदनशीलतेचा विषय ठरतो. सुरवातीला शहरांच्या मुख्य वस्तीपुरतीच मर्यादित असलेले शहरे, जस -जसा आवाका मोठा करायला लागली तसा या बांधकाम व्यवसायाचा पसाराही वाढायला लागला. मुख्य शहरांमध्ये घरे परवडेनाशी झाल्यावर आजूबाजूंच्या गावांना कवेत घ्यायला सुरुवात झाली. इतके वर्षे जोरदार धावणाऱ्या बांधकाम व्यवसायाच्या या गाडीस कोरोना संकटाने करकचून ब्रेक मारला आणि हे क्षेत्र कोलमडून गेले. गेल्या दोन वर्षांची मरगळ झटकुन आत कुठे पुन्हा एकदा हा व्यवसाय जोर धरू बघतोय. यंदाच्या दसरा - दिवाळीच्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सर्वच मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी विक्रमी गृहखरेदीचा अंदाज वर्तवला आहे. या क्षेत्रात नेमके काय बदल झाले आहेत? ग्राहकांच्या मागण्यांमध्ये काय बदल झाले आहेत ? जे अंदाज वर्तवले जात आहेत ती वस्तुस्थिती आहे का? याचाच उहापोह करणारा हा लेख.
 
 

नेमके अंदाज वाक्य वर्तवले जात आहेत ?
 
 
दोन वर्षांच्या कोरोनाच्या तडाख्याने कोलमडलेली अर्थव्यवस्था झपाट्याने पूर्वपदावर येत आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांत मागणी वाढल्याने प्रगतीच दिसायला लागली आहे. यात देशातील सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारे बांधकाम क्षेत्रही मागे नाही. वाढती मंहागाई, वाढते व्याजदर ही थोडीशी नकारात्मकता असली तरी बांधकाम क्षेत्राने सातत्याने वाढ नोंदवली आहे. देशात कित्येक राज्यांनी दिलेली मुद्रांक शुल्कात सवलत वगैरे गोष्टींनी घरांच्या मागणीत वाढच होत आहे. देशातील सर्वच मोठे बांधकाम व्यावसायिक यंदाच्या सणांच्या दिवसांत विक्रमी गृहखरेदीचा अंदाज व्यक्त करत आहेत. ही वाढ गेल्या दशकभरतली सर्वात मोठी वाढ असल्याचा अंदाज आहे.
 
 
या वाढीमागील कारणे काय आहेत ?
 
 
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने व्याजदरांत वाढ होत आहे. कोरोना काळात सर्वच क्षेत्रांमध्ये जबरदस्त उलथापालथ झाली. असे असले तरी मोठ्या संख्येने भारतीय घर खरेदीकडे कसे वळत आहेत याची कारणे शोधणे महत्वाचे ठरते. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली असली तरी मोठ्या मोठ्या आयटी क्षेत्र, सेवा क्षेत्रातील नोकऱ्या मात्र शाबूत राहिल्या. या क्षेत्रातील लोकांनी फक्त नोकरीवरच विसंबून न राहता फावल्या वेळचा सदुपयोग करत जोडधंदेही सुरु केले. कोरोना काळातली बचत, मिळकतीत झालेली वाढ यांमुळे या वर्गाकडून घरांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त सर्वच मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून वेगवेगळी सवलत जाहीर करण्यात आली. सरकारनेही पुढाकार घेत मुद्रांक शुल्कात सवलत, बांधकाम व्यावसायिकांना सवलती यांसारख्या उपायांनी हे क्षेत्र पुन्हा उभारी कशी घेईल याकडेच लक्ष पुरवले. कोरोनाचा जोर संपल्यावर जसे सगळे पूर्वपदावर आले तसे सर्वच गोष्टी सुरळीत होण्यास सुरुवात झाली. याचाच परिणाम म्हणजे ही आजची वाढ.
 
 
लोकांच्या अपेक्षा काय आहेत ?
 
 
लोकांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रसाद वाकोडे या तरुण बांधकाम व्यावसायिकाशी चर्चा केली. पुणे, पिंपरी- चिंचवड या शहरांमध्ये त्यांची 'ठेका कॉर्पोरेशन' काम करते. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये फरक पडत चालला आहे. दळणवळण आणि संपर्काची साधने चांगली असणे याला ग्राहकांची जास्त पसंती आहे. उदा. मेट्रोचे जाळे जेथोपर्यंत पोहोचले आहे तिथे लोकांचा घर घेण्याकडे कल जास्त आहे. परवडणाऱ्या घरांच्या बरोबरीने व्यावसायिक वापरासाठी मालमत्ता खरेदीकडेही कल वाढला आहे. ग्राहकांच्या घर खरेदीसाठी असणाऱ्या सर्वच अडचणी सोडवण्यासाठी आत बांधकाम व्यावसायिकच पुढाकार घेतात त्यामुळे ग्राहकांना ते सोयीचे होत आहे. एकूणच कोरोना नंतरच्या काळात, नवीन उदयाला येणाऱ्या शहरांची मागणी जास्त वाढणार आहे.
 
 
पुढचे चित्र आशादायी आहे का ? प्रसाद यांचे मत
  
एकूणच असा अंदाज होता की कोरोना नंतरच्या काळात घरांच्या किंमती कमी होतील पण असे होणे कधीच शक्य नाही. कारण बांधकाम करण्याचा खर्च अजूनही जशाच्या तसाच आहे आणि उलट तो वाढला आहे. त्यामुळे घरांच्या किंमती कमी होणार नाहीत. असे असले तरी आता बांधकाम व्यावसायिक ग्राहकांच्या अपेक्षा पूर्तीकडे जास्त लक्ष देत आहेत. "ग्राहक आणि आमच्यामधील दरी कमी करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. यामुळे पुढचे चित्र प्रचंड आशादायी आहे आणि या उत्सवांच्या काळात विक्रमी गृहखरेदी होईल असा आमचा विश्वास आहे" असे मत प्रसाद यांनी नोंदवले आहे. एकूणच येणारा काळ हा प्रचंड आशादायी असून हे क्षेत्र लवकरच पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
 
-  हर्षद वैद्य