स्वर-अतींद्र!

    19-Sep-2022   
Total Views |
 
mansa
 
 
 
संगीत हाच जेव्हा आत्मा असतो, तेव्हाच त्यातून गानप्रतिभा बहरत जाते. अशीच स्वतंत्र गानप्रतिभा लाभलेल्या डॉ. अतींद्र सरवडीकर यांचा स्वरप्रवास जाणून घेऊया...
 
 
शाळेतील मुळाक्षरं शिकतानाच आईसोबत सहजगत्या संगीत क्षेत्रात प्रवेश केलेले डॉ. अतींद्र सरवडीकर. डॉ. अतींद्र हे स्वरयोगिनी ‘पद्मविभूषण’ डॉ. प्रभा अत्रे यांचे वरिष्ठ शिष्य, मुंबई विद्यापीठाची संगीत क्षेत्रातील प्रथम ‘विद्यापाचस्पती’ ही पदवीप्राप्त आणि स्वशैलीचा आविष्कार करणारे सृजन आहेत.
 
 
डॉ. अतींद्र हे मूळ सोलापूरचे. आपल्याला असणारी संगीताची आवड जाणून त्यांनी उत्तम गुण असतानाही वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात न जाता विज्ञान शाखेतील पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ते ‘अखिल भारतीय गंधर्व मंडळा’चे ‘तबला विशारद’ आहेतच, तसेच ते ‘संगीत विशारद’ आणि ‘संगीत अलंकार’ प्राप्तही आहेत. ’हिंदुस्तानी क्लासिकल व्होकल म्युझिक’ या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलेले असून संगीत क्षेत्रातील ‘नेट’ परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या संगीत क्षेत्रातील पहिल्या पीएच.डीचे ते मानकरी ठरले. डॉ. अतींद्र यांना स्वतंत्र संगीतरचना करण्याची आवड. कुणाचीही प्रतिलिपी न करता संगीताच्या स्वरचनेवरच ते लक्ष केंद्रीत करतात. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्यत्व स्वीकारले.
 
 
डॉ. अत्रे यांचे वास्तव्य मुंबई येथे असल्याने, तसेच प्रबळ इच्छाशक्तीमुळे सोलापूर ते मुंबई असा प्रवास डॉ. अतींद्र संगीत शिकण्यासाठी करू शकले. संगीत केवळ गुरूंकडून शिकायचं आणि आपण तसंच गायचं, या शिक्षणपद्धतीला अपवाद म्हणजे डॉ. अतींद्र. डॉ. प्रभा अत्रे या स्वत: सृजनशीलतेचा आविष्कार असणार्‍या गुरूंकडे शिकताना डॉ. अतींद्र यांनी संगीतामध्ये संशोधन करून स्वत: सादरीकरण करण्यास प्रारंभ केला. म्हणूनच स्वप्रतिभेची जोड दिल्यामुळे त्यांचे संगीत हे वेगळे भासते. संगीत आणि आयु:-आरोग्य यांचा संबंध असल्याचे आपण केवळ ऐकतो. परंतु, डॉ. अतींद्र यांचे आयुष्य हेच संगीतमय झालेले आहे. संगीतामुळे ते अंतर्मुख झाल्याचे ते सांगतात. मूळ संवेदनशील स्वभाव, तसेच आवाजातील मार्दव, तासन्तास केलेल्या रियाझांमुळे आलेला कसदारपणा, गानप्रतिभा याच्या संयोगाने ते ‘स्वर-अतींद्र’ झाले.
 
 
डॉ. अतींद्र यांनी अनेक प्रतिष्ठित मैफिलींमध्ये मंचप्रस्तुती केली आहे. ‘सवाई गंधर्व समारोह, कुंदगोळ’ येथे त्यांनी ज्येष्ठ गायिका गंगुबाई हनगल यांच्या समोर सादरीकरण करून कौतुकाची थाप मिळवली होती. तसेच ‘इंडियन फेस्टिव्हल, लंडन, ‘पूरब अंग ठुमरी उत्सव बनारस’,‘ सुबह-ए-बनारस’, ‘पुलोत्सव’, ‘उमंग- एनसीपीए, मुंबई’, ‘संगीत संकल्प सप्ताह-सप्तक अहमदाबाद’, ‘मल्हारोत्सव, ठाणे’, ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑफ म्युझिक, कोलकाता’, ‘हुलुमचंद वैष्णव संगीत समारोह, जोधपूर’, तसेच टीव्ही आणि रेडिओवरील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये त्यांनी सादरीकरण करून आपल्या संगीतसाधनेचा अभूतपूर्व परिचय करून दिला. शास्त्रीय संगीतासोबत ‘ठुमरी’, दादरा’, गीत, गझल, भक्तिसंगीत, ‘फ्युझन’, तसेच तामिळ भाषेतील काही गाणी अशा संगीतातील अन्य क्षेत्रातही त्यांचा स्वरसंचार आहे. तसेच ‘हंसकिंकिणी’, ‘चक्रधर’, सावनी’ असे अप्रचलित राग आणि ‘सुनंद ताल, मत्त ताल’ असे अनवट ताल यामध्ये त्यांनी बंदिशी सादर केल्या आहेत. तसेच नावाजलेल्या संगीत संस्थांनी त्यांची गाणी रिलीज केलेली आहेत.
 
 
त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये अगदी महाविद्यालयीन काळात 28 पुरस्कार, ज्यात ‘नाट्यसंगीता’तील राज्यस्तरावरील सुवर्णपदक मिळाले आहे. ‘युजीसी’तर्फे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात ‘हिंदुस्तानी शास्त्रीय संगीता’मध्ये सुवर्णपदक मिळालेले आहे. आता राष्ट्रीयस्तरावरचा ‘बाबा अल्लाऊद्दिन खान स्मृती सन्मान’, ‘दुर्लभसुंदरी वाद्य अकादमी’तर्फे ‘युवा पुरस्कार’, राज्य स्तरावरील ‘स्वर-चैतन्य पुरस्कार’, ‘पद्मश्री डॉ. डी. आर. बेंद्रे अवॉर्ड’, ‘महाराष्ट्र कलासन्मान’, ‘कलासाधना पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. परंतु, “2014 मध्ये जेव्हा स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला, तेव्हा त्यांच्या निवडक शिष्यांची मैफील आयोजित करण्यात आली होती, ज्याला संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायक, मान्यवर उपस्थित होते, त्या मैफिलीमध्ये डॉ. अतींद्र यांना गानप्रस्तुतीचा मान मिळाला आणि हा आपला सर्वोच्च सन्मान आहेत,” असे ते म्हणतात. अगदी फेब्रुवारी 2020 मध्ये वृंदावन गुरुकुल, जुहू येथे पं. हरिप्रसाद चौरसिया आणि ज्येष्ठ गायकांसमोर ‘अनुभव’ मालिकेअंतर्गत त्यांना डॉ. प्रभा अत्रे यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली.
 
 
केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही त्यांनी आपल्या स्वतंत्र संगीताची छाप पाडली आहे. 'University of Cincinnati' ने त्यांना संशोधनासाठी ‘फेलोशिप’ दिली आहे, तसेच इंग्लंडमध्येही त्यांनी महिनाभर संगीतसादरीकरण केलेले आहे. ’इस्टर्न आय’ या ब्रिटनमधील प्रसिद्ध वृत्तपत्रानेही त्यांच्या स्वरकार्याची दखल घेतली होती.
 
 
केवळ स्वत: संगीतसाधना न करता, नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचेही कार्य ते करतात. ते स्वत: मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागामध्ये प्राध्यापक आहेतच, तसेच त्यांची मुलुंड येथे स्वत:ची म्युझिक अकॅडमी आहे. आपल्या संगीतसंशोधनावर आधारित ‘किराणा : घराणे परंपरा आणि प्रवाह’ हे संशोधन पुस्तक तसेच, ‘मध्यान्हीच्या मैफिली’ हा मराठी लघुकथांचा संग्रह त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे. तसेच, त्यांचे संगीतातील 16 शोधनिबंध प्रतिष्ठित जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. स्वत: कायम नवनिर्मितीवर भर देऊन विद्यार्थ्यांनाही स्वसृजनास प्रोत्साहित करणारे आणि संगीत क्षेत्रात नवसंशोधन करणारे डॉ. अतींद्र हे ‘स्वर-अतींद्र’ आहेत, हे नक्की!
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.