दोघांमधली साम्यस्थळे

    19-Sep-2022   
Total Views |

ditya
 
 
देशात विरोधी पक्षात असलेल्या मात्र वंशपरंपरागत सत्ता प्राप्त झालेल्या नेत्यांनी यात्रांचा धडाका लावला. महाराष्ट्रात आदित्य ठाकरे तर देशात राहुल गांधी सध्या यात्रा करत आहेत. या दोघांच्या यात्रेमध्ये कमालीचे साम्य आहे. म्हणजे असे की, आदित्य यांच्या यात्रेत शिवसेनेचे खरे नेते आदित्य ठाकरेच. ठाकरे कुटुंबापासून दूर गेलेले नेते गद्दार असे म्हणत डोळे पुसणारे वृद्ध जागोजागी दिसत होते, तर राहुल यांच्या यात्रेत दाक्षिणात्य पारंपरिक वेशातल्या हसतमुख तरुणी दिसतात. आता काही लोक म्हणतात की, डोळे पुसणारे वृद्ध कार्यकर्ते दाखवून नेत्यांना समाजात असे दाखवायचे आहे की, जुन्या सगळ्या सैनिकांना आदित्य ठाकरेंचे नेतृत्व मान्य आहे.
 
 
तसेच राहुल यांच्या यात्रेत विश्वासाने सहभागी झालेल्या युवती दाखवून हे सांगायचे आहे की, देशातला युवा महिला वर्ग राहुल यांच्या पाठीशी आहे. डोळे पुसणारे वृद्ध किंवा हसणार्‍या युवती हे सगळे ‘इव्हेंट मॅनेजमेेंट’ आहे, असेही लोक म्हणतात. या दोघांच्या यात्रेत आणखी साम्य आहे, ते म्हणजे, या दोघांनीही जनमत सोबत घेण्यासाठी यात्रा केली. मात्र, यांच्या यात्रेदरम्यान दोघांच्या पक्षसंघटनेला प्रचंड गळती लागली. राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान तर अशा घटना घडल्या की, ‘काँग्रेस जोडो’ यासाठी यात्रा केली की काय, असे वाटावे. तिकडे राहुल गांधी जॉर्ज पोनैय्या या पाद्रीकडून येशूची थोरवी ऐकत होते आणि इथे गोव्यातल्या त्यांच्या पक्षाचे आमदार दिगंबर कामत देवाला कौल लावून काँग्रेस सोडून भाजपत गेले.
 
 
मी देवाला विचारून काँग्रेस सोडली, असे आमदार दिगंबर का मत म्हणाले. नेहमीप्रमाणे काँग्रेस पक्षाने याला घोडेबाजार नाव दिले. पण मला कोणतीही पूर्वसूचना न देता पदावरून हटवण्यात आले आणि दिल्लीला बोलावण्यात आले. तिथे गेल्यावर कुणीही माझ्याशी एका शब्दाने संवाद साधला नाही, असेही आ. दिगंबर म्हणाले. यावर कुणी काहीच बोलत नाही. जनतेने निवडलेल्या आमदाराला अशी अपमानस्पद वागणूक दिल्यावरही आमदाराने हांजी हांजी करत राहायचे का? सेना सोडलेल्या आमदारांनीही अशीच आपली आप बिती सांगितली आहे. मात्र, त्यावर ना उद्धव ठाकरे गटाने स्पष्टीकरण दिले, ना गोव्यातील आमदारांबद्दल काँग्रेसने. शेवटी काय? उद्धव ठाकरे गट आणि राहुल गांधींची काँग्रेस यामध्ये साम्यस्थळे आहेत, असे लोक म्हणतात.
 
 
 
दहाची पावती फाडली का?
 
'वेदांता’ गुजरातने पळवून नेले. महाराष्ट्राच्या लाख भर नोकर्‍या गुजरातला गेल्या. शिंदे-फडणवीस यांनी महाराष्ट्र गुजरातला विकला असे अतिशय शिवराळ, गलिच्छ भाषेत प्रसार माध्यमातून काही लोक मांडत आहेत. यात तथ्य नाही हे त्यांना पण माहिती आहे. प्रकल्प बाहेर का गेला असेल, याचे गणित मांडताना काही लोक असेही म्हणतात की, ‘वेदांता’-‘फॉक्सकॉन’ महाराष्ट्रात असा तासाभरापूर्वी आला आणि तासाभरानंतर गेला नाही. ‘वेदांता’ -‘फॉक्सकॉन’बद्दल २०२१ साली त्यावेळचे शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनीही मत मांडले होते की, हा प्रकल्प महाराष्ट्रात कदाचित येणार नाही.
 
 
देसाई किंवा इतर महाविकास आघाडी नेत्यांनी त्यावेळेसही स्पष्टीकरण दिले नाही की, हा प्रकल्प महाराष्ट्रात का उभा राहणार नाही? कसे सांगतील? कारण, मोठे भांडवल लावून उभारले जाणारे प्रत्येक प्रकल्प सर्वेक्षण करूनच होते. गल्लीतली किंवा फूटपाथवरची अनधिकृत जागा अडवली, तेथील कोणत्या तरी चिल्लर दादाला (जे एका ठराविक पक्षाचे अतिशय थुकरट कार्यकर्ते असतात) त्यांना पावशेर दारू पाजायची, त्यांच्याकडून १०-२० रु. ची पावती फाडायची आणि त्यानंतर तिथे पोटापाण्यासाठी टपरी लावायची. त्या टपरीत जे काही विक्रीला असेल ती वस्तू दररोज त्या गुंडांच्या घरी पोहोचवायची, त्याशिवाय जे काही उत्पन्न मिळाले असेल, त्यातले काही उत्पन्न ‘कमिशन’ म्हणून त्या गुंडाला द्यायचेच हे चित्र राज्याच्या शहरातील कोणत्याही वस्तीतले.
 
 
हे असेच मोठ्या कंपनीच्या मोठ्या प्रकल्पाबाबत होत नसते. सगळ्या कायदेशीर अटी-शर्थी पूर्ण केल्यावरही जर ‘कमिशन’ देण्याचा ‘ससेमिरा’ असेल तर? आज मुंबई-दादरसारख्या ठिकाणी पादचारी मार्ग हरवून तिथे फेरीवाले कसे आले, याचे गणित ज्यांना समजले, त्यांना नक्कीच समजेल की, ‘वेदांता’- ‘फॉक्सकॉन’ महाराष्ट्राबाहेर का गेला? २०२० -२०२१ साली महाराष्ट्रात काय वातावरण होते? प्रसिद्ध उद्योग पतीच्या घराबाहेर स्फोटके सापडणे, १०० कोटींच्या वसुलीमध्ये राज्याचे महत्त्वाचे मंत्री गुंतणे, कायदा, प्रशासन आणि तत्कालीन राज्य सरकारचे काही मंत्रीच सर्व प्रकारच्या गुन्ह्यात अडकणे. हे कमी की काय, तर राज्याचे मुख्यमंत्री कायम घरात होते. अशावेळी कोणती कंपनी महाविकास आघाडी सत्ता काळात उद्योग राज्यात उभारण्यासाठी उत्सुक असणार? दहाची पावती फाडून घेण्याच्या मानसिकतेने ‘वेदांता’-‘फॉक्सकॉन’ महाराष्ट्राबाहेर गेला असे मात्र काही लोक म्हणत आहेत.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.