मुंबई : उद्धव ठाकरेंच्या विरोधात उठाव करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटावर टीका करताना सर्वच मर्यादा सोडायचे असे उद्धव ठाकरे गटाने ठरवलेलेच दिसते. जिथे ठाकरे पिता-पुत्रच शिंदे गटावर आजही गद्दार- गद्दार अशी टीका करतात तिकडे इतर सामान्य शिवसैनिकांची काय कथा. उद्धव ठाकरेंच्या जवळचे आणि उरल्यासुरल्या शिवसेनेतील महत्वाचे नेते खा. विनायक राऊत यांनी या सर्वांच्या वरची कडी केली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाबद्दल बोलत असताना त्यांनी चक्क भकाराने सुरु होणाऱ्या शिवीने त्यांच्यावर टीका केली. दहिसर येथील एका नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. '
"किती आले किती गेले तरी शिवसेना संपली नाही, त्या भxxxxxx करणाऱ्या ४० जणांना उत्तर देण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल" अशा शब्दांत खालच्या पातळीवरची भाषा शिंदे गटावर विनायक राऊत यांनी टीका केली. उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा त्यांचा डाव आहे, त्या माध्यमातून शिवसेना संपवायची अशीच त्यांची धारणा आहे ,त्यामुळे हा डाव आपल्याला यशस्वी होऊच द्यायचा नाही असे सांगत शिंदे गटाविरोधात त्यांनी लढा पुकारला. ठाकरे कुटुंबियांना कधीही लक्ष्य करायचे नाही याची काळजी शिंदे गट वारंवार घेत असताना आणि आपल्या मर्यादा राखून वागत असताना ठाकरे गटाकडून शिंदे गटाला अत्यंत अर्वाच्य भाषेत लक्ष्य केले जात आहे याचेच हे विनायक राऊत एक उदाहरण ठरले आहेत.
याच भाषणात मात्र विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मात्र चांगले उद्गार काढले. फडणवीसांसारख्या अभ्यासू व्यक्तीला कोणाला संभाळवे लागत आहे, अशा शब्दांत त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले. शिंदेंच्या हाताखाली काम करायला लागणे ही फडणवीसांची नामुष्की असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे ठाकरे गटाकडून सातत्याने एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात उगीचच टीका करून आपली केविलवाणी अवस्था झाकण्याचा प्रयत्न केला जातोय हे उघड आहे.