वेदातील पर्यावरणीय विचार

    18-Sep-2022   
Total Views |
Vedas
 
 
संस्कृत भाषा ही अनेक भाषांचे जसे मूलस्थान आहे, तसेच अनेक आधुनिक शास्त्रांचे मूलज्ञानस्थानही आहे. आज ज्या शास्त्रांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो, त्या शास्त्रांचा चिकित्सक अभ्यास संस्कृत साहित्यात, अगदी वैदिक साहित्यातही झालेला आढळतो. पर्यावरणासारखा संवेदनशील झालेला विषयही संस्कृत साहित्याने हाताळलेला आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संस्कृत साहित्यातील पर्यावरण संकल्पनेचे संदर्भ या लेखातून पाहूया.
 
संस्कृती हा शब्द ‘सङ्क्’ उपसर्ग असलेल्या ‘कृ’ धातू ‘तिन्’ प्रत्ययातून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ सुधारणे, सुंदर करणे, परिपूर्ण बनवणे असा होतो. ‘वृञ्’ धातूला ’परी’ आणि ’आ’ उपसर्ग लावून ‘ल्यूट’च्या योगाने झालेला ‘पर्यावरण’ शब्द तयार होतो. ‘परित: आवरणङ्क्’ म्हणजेच चारही बाजूने वेढलेले आवरण किंवा वातावरण. या वातावरणाचा आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे उपभोग घेत असतो. ‘आवरण’ याचा शब्दश: अर्थ झाकणे, लपविणे इत्यादी. परंतु, भारतीय संस्कृतीत पर्यावरण हा शब्द प्राचीन काळापासून परिघ आणि परिसर या स्वरूपात वापरला जात आहे. यजुर्वेदात पर्यावरणाच्या व्याख्यासदृश मंत्र आढळतो.
 
 
परितः आवृणोतित पर्यावरणम् ।
जे चारही बाजूंनी वेढलेले आहे, त्याला पर्यावरण असे म्हणतात.
 
 
प्राचीन भारतात पर्यावरणाच्या समस्या म्हणाव्या तशा नव्हत्या. संस्कृत साहित्यात एक प्रसिद्ध वचन आहे - प्रक्षालानादि पऽस्य दूरादस्पर्शनं वरम्। म्हणजेच, चिखलाने पाय खराब होण्यापेक्षा पायाला चिखलच लागू न देणे, हे इष्ट!
 
 
पंचतत्त्वांचा समतोल न राहणे हे पर्यावरण प्रदूषण मानले जाते. त्याचा मानवी जीवनावरही परिणाम होतो. तुलसीदासजींनी स्पष्टपणे सांगितले आहे - क्षिति, जल, पावक, गगन, समीरा। पंचरहित यह अधम शरीरा॥ म्हणजेच विश्वात जे आहे ते शरीरात आहे, प्रपंच बिघडला, तर शरीरही बिघडेल. वैदिक ऋषींनी सर्वप्रथम विश्वनिर्मितीवर चिंतन करताना सुरुवातीच्या अवस्थेत त्यांनी सृष्टी ज्या प्रकारे पाहिली, त्याचे वर्णन ऋग्वेदातील नासदीयसूक्तात केलेले आहे-
 
 
नासदासीनों सदासीतदानी,
हरण्यगर्भा समवर्तताग्रे।
 
 
म्हणजेच जगात चांगले किंवा वाईट असे काहीही नव्हते, जगात फक्त पाणी होते. तेव्हा शक्ती हिरण्यगर्भाच्या रूपात प्रथम प्रकट झाली आणि जग अस्तित्वात आले. आजही पृथ्वी आणि मानवी शरीर हे 71 टक्के पाण्याने व्याप्त आहे. प्राचीन काळी ज्याप्रमाणे पंचतत्त्वांच्या असमतोलास प्रदूषण म्हणत, ज्याचे प्रमाण अत्यल्प होते. परंतु, सध्या पूर्ण जग प्रदूषणाने ग्रस्त झालेले आहे. पाणी, हवा, माती, ध्वनी इत्यादी सर्व प्रकार आज भयंकर रूप धारण करत आहेत. अगदी अवकाशही प्रदूषित झालेले आहे. अगदी पृथ्वीच्या तळापासून ते अवकाश प्रदूषणविरहित राहावे, यासाठी शुक्ल यजुर्वेदात ऋषिमुनी प्रार्थना करतात की,
 
द्यौ शान्तिरन्तरिक्षः।.
सध्या दिसणारे वायुप्रदूषण हे धूळ, विविध धूर तसेच विविध हानिकारक गॅस, वायू यांच्या प्रसरणाने होते. ऋग्वेदातील काही मंत्र हे वायू शुद्ध ठेवण्यासंदर्भात, तसेच वायूचे महत्त्व विशद करणारे आहेत.
 
वात आ वातु भेषजम्,
स नो जीवात्वे कृधि।
 
म्हणजेच, हवा तुमच्यासाठी औषधासारखी वाहू द्या. शुद्ध हवाच ही आमच्या जीवनाचे मूळ आहे.
तसेच, घरातील वातावरण कसे असावे, यासाठी ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील 186 वे सूक्त बघावे.
 
शमन्तरिक्ष दुश्यनो अस्तु! 
 
आपण ज्या ठिकाणी वावरतो ती जागा धूर, धूळ यांपासून मुक्त असू दे, ती स्वच्छ असूदे. ती एवढी नितळ असूदे की, तिच्यात पारदर्शकता यावी.
 
शं न दूषिपरो अभिवातु वात - अंतराळात वारे निर्दोषपणे वाहू दे. तसेच हे ‘व्हेंटिलेशन’ शन्ना दुशीपारो अभिवतु वाता । प्रमाणे असावे. म्हणजेच हवेला एकाच ठिकाणी बांधून ठेवू नये, तर ‘दुशीपारो’ म्हणजेच स्वच्छपणे उजवीकडून डावीकडे वाहत राहावे.
कोणत्या गोष्टी जाळाव्यात किंवा जाळू नये, यासाठीही ऋग्वेदात मंत्र आला आहे.
 
ना मेध्यं प्रक्षिपेदग्नौ - कोणतीही अशुद्ध वस्तू अग्नीत टाकू नये, अन्यथा ती वातावरणही प्रदूषित करते. आज लाखो टन कचरा, प्लास्टिक जाळले जाते, त्यातूनच वायुप्रदूषणात भर पडते. म्हणूनच शुद्ध हवा असेल, तर दीर्घायुष्य मिळते, असे म्हणतात.
 
हवा शुद्ध राहण्यासाठी वैदिक वाङ्ङ्कङ्मातषिमुनींनी वनांच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केलेले आहे. जसे की, तत् शिव कुसुमित बालपदापः च्यफलदयार्थ वृक्षमाश्रयते जनः। म्हणजेच झाडे सदैव शिवच (पवित्र) असतात.
 
म्हणून ते लोक फळ आणि सावलीसाठी लावतात. महाभारतील भीष्मपर्वात वृक्षांची एक मनमोहक प्रतिमा आहे. ‘सर्वकाम फलः वृक्ष:।’ सर्व कामनांची पूर्तता वृक्ष करतात. अन्न, निवारा या गरजा वृक्ष भागवतात. वैदिक साहित्यात वृक्षांचे महत्त्व सांगितले आहे आणि ते हवा शुद्ध करण्यासाठी उपयुक्त मानले आहेत. मत्स्य पुराणात म्हटले आहे - दसकूपसमावापी दसवापीसमोहृदः दसहृदसमः पुत्रो दसपुत्रोसमो द्रुमः। म्हणजे एक ‘वापी’ बनवताना दहा विहिरींचे पुण्य, एक तळे बनवताना दहा छोट्या तळ्यांचे, एका मुलाकडून दहा तळी आणि झाड लावल्याने दहा पुत्रांचे पुण्य मिळते.
 
हवा शुद्धीकरणासाठी आज बाजारात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. प्राचीन काळी यज्ञामुळे हवा शुद्ध होते, असे मानले जात होते, यजुर्वेदाने यज्ञांना पुरेसे महत्त्व दिले आहे, ज्याचा थेट संबंध पर्यावरण शुद्धीकरणाशी आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानेही यज्ञाचे महत्त्व सांगितले आहे:-
 
अन्नाद्भवन्ति भूतानिपर्जन्यादन्नसम्भवः।
यज्ञात्भवति पर्जन्यों यज्ञः कर्म समुद्भवः॥
 
म्हणजेच प्रदूषणामुळे भूमीची भरभराट होत नाही. सत्याच्या विरुद्ध अधर्मामुळे भूमीची भरभराट होत नाही. यज्ञात केलेल्या हवनाद्वारे धूर निर्माण होतो. तो वातावरण शुद्ध करतोच. तसेच, त्यामुळे ढगही तयार होतात, मग तेच ढग पावसाच्या रूपाने पृथ्वीवर बरसतात.
 
मानवी शरीराचा, तसेच पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग जलीय घटकांनी बनलेला असतो. पाणी हे सर्व सजीवांसाठी जीवन आहे. ऋग्वेदात पाण्याला जगाला जन्म देणारी सर्वश्रेष्ठ माता म्हटले आहे.
 
मातृतामा दृश्या स्थतुर्जगतो जनित्री ।
 
बृहदारण्यक उपनिषदात म्हटले आहे - इमा आपः सर्वेषां भूतानां मध्वासामपाँसर्वाणि भूतानि मधु।
हे पाणी सर्व प्राण्यांसाठी अमृत आहे. अग्नी पाण्यामध्ये राहतो, म्हणून सचैल स्नान करण्यास मनाई होती, अशी माहिती पुराणात देण्यात आली आहे.
 
नाप्सु मूत्रपुरीषं कुर्यात् न निष्ठीवेत् न विवसनः स्नायात् गुह्यौ न इवोग्निः॥
 
गंगेला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पवित्र व शुद्ध मानली जाते. मनूने मनुस्मृतीत लिहिले आहे. कोणत्याही व्यक्तीने पाण्यात थुंकू नये, विसर्जन करू नये. कोणतीही वस्तू किंवा अशुद्ध वस्तू शुद्ध पाण्यात टाकू नये. जगत्ताय प्रतप्तानां जलराशि च वाच्छतम् । उष्णता आणि तहानने व्याकूळ झालेल्या जगासाठी पाणी आवश्यक आहे. पण, हे पाणी कसे असावे, तर जलं पर्युषित त्याज्यम् । तहान शमवण्यासाठी पवित्र जल श्रेयस्कर आहे. पवित्र, शुद्ध पाण्याचे महत्त्व सांगितलेले आपल्याला दिसून येते. कूप्रपापुष्कारिणी वनानाम् चक्रुः क्रियास्तत्र च धर्मकामाः। म्हणजे धर्माभिमानी लोकांनी विहिरी, तलाव, तळी बांधली, असे उल्लेख दिसून येतात. तसेच, अशोकाचे अनेक शिलालेख याचे उदाहरण आहे. वेदांमध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून तीक्ष्ण वाणी, उच्च स्वरात बोलणे टाळावे आणि परस्पर संभाषण हळू आणि गोड आवाजात असे सांगितले आहे.
 
मा भ्राता भ्रातरं द्विक्षन्मा स्वसारमुत स्वसा।
सम्यश्चः सव्रता भूत्वा वाचं वदत् भद्रया॥
 
कोणत्याही नात्यांमध्ये हेवेदावे असू नये. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपली मते शांततेत सांगितली पाहिजे आणि एकत्र राहून सभ्य माणसांप्रमाणेच शांततेने एकमेकांशी बोलले पाहिजे. इथे आवाजाच्या गोडव्याची आशा व्यक्त केलेली दिसते.
 
अथर्ववेदातील एका मंत्रात ऋषी म्हणतात
जिव्हाया उग्रे मधु में जिव्हामूले मधूकलम्।
ममेदह कृत्तावसो मम् चित्तमुषायसि॥
 
म्हणजे माझ्या जिभेतून मधुर स्वर निघावेत. भगवंताचे भजन, पूजा, कीर्तन करताना त्यामध्ये गोडवा असावा. माझ्या कामात आणि मनाची गोडी सदैव राहो.
 
प्रत्येक आस्तिक आजही पृथ्वीला आपली आई आणि स्वतःला आपला पुत्र मानतो. ऋग्वेदाच्या पृथ्वीसूक्तात म्हटले आहे:- माता भूमिः पुत्रोऽहम् पृथिव्या:। भारताच्या भूमीला माता मानणारे लोक आज आपली भूमी प्रदूषित करत आहेत, ही खेदाची गोष्ट आहे. औद्योगिक कचरा, मानवी मलमूत्र, प्लास्टिक (ज्याचे विघटन होत नाही) इत्यादी सर्व गोष्टी पर्यावरणाला प्रदूषित करत आहेत.
अथर्ववेदातीलही पृथ्वीसूक्तातील एकूण 63 मंत्रांमध्ये पृथ्वीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. पृथ्वीच्या निर्मितीबद्दल असे म्हटले आहे -
शिला भूमिरश्मा पांसुः
सा भूमिः संघृता घृता।
तस्यै हिरण्यवक्षये पृथिव्या अकरं नमः॥
म्हणजेच जमीन, खडक, दगड आणि माती, त्याच हिरण्यमयी पृथ्वीला मी नमस्कार करतो.
 
‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपि गरियासी’ या भावनेने भरलेला प्रत्येक भारतीय जीवनाविषयी कृतज्ञतेने भारावून गेला आहे. कारण, आपल्या पृथ्वीला (पृथ्वी) मातेचे स्थान दिले गेले आहे -
 
यस्यामन्न ब्रीहियवौ यस्या इमाः
पश्च कृष्टयः।
भूम्यै पर्जन्यपत्नयै नमोऽस्तु वर्षमेदसे॥
 
म्हणजे ज्या भूमीत भात, गहू, जव इत्यादी अन्नद्रव्ये विपुल प्रमाणात असतात, ज्या भूमीत हे पाच प्रकारचे लोक, योद्धे, व्यापारी, कारागीर आणि नोकर आनंदाने राहतात. ती भूमी ज्यामध्ये ठरावीक वेळी पाण्याचा पाऊस पडतो आणि अन्न उत्पन्न केले जाते, इ. पर्जन्याने पोषित अशा मातृभूमीला आम्ही नमस्कार करतो. संस्कृतसाहित्यात ज्याप्रमाणे पर्यावरणाशी निगडित संदर्भ आढळतात, तसेच प्रदूषण नियंत्रणाचेही उपाय दिसून येतात. सध्या पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी नियम आणि कायदेशीर शिक्षेसह अनेक योजना आखल्या गेल्या आहेत, पण तरीही विशेष परिणाम साधता आलेला नाही. भारतीय संस्कृतीत मानवाची ऐश्वर्यप्राप्तीची अतिइच्छा, हव्यास हे पर्यावरणीय प्रदूषणाचे कारण मानले गेले आहे.
 
सुखार्थमशुभं कृत्वा य एते भृषदुः खिताः।
आस्वादः स किमेतेषां करोति सुखमवपि॥
 
म्हणजेच सुख (ऐश्वर्य) साठी मानव अशुभ कर्मे करून (पर्यावरणाचा र्हास) करून नाना प्रकारचे दु:ख भोगत आहे. त्यामुळे मानवी मनाच्या शुद्धतेवर भर दिलेला दिसतो. - यते मनसः शेमे । शुद्ध मनाने आणि नैतिक नियमांचे पालन करावे, असे वैदिक ऋषी सांगतात. भारतीय संस्कृतीतील पर्यावरणविषयक जाणिवा या उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक असल्याचे आढळून येते. समस्या निर्माणच होऊ नये, यासाठी वेदांनी, तसेच तत्कालीन भारतीय राजांनी प्रयत्न केलेले दिसतात. वैदिक ऋषी विश्वाच्या पूर्णत्वाची प्रार्थना करताना म्हणतात -
 
ऊँ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
 
याचप्रमाणेच अथर्ववेदामध्येही ऋषिमुनींनी सकल विश्वाच्या शांती आणि कल्याणासाठी प्रार्थना केलेली आहे. अथर्ववेदातील शांतिसूक्तामध्ये पर्यावरण रक्षण तसेच निरामय जीवनाची प्रार्थना केलेली दिसते. निसर्गाप्रति आपण आताच संवेदनशील झालो नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा विनाश निश्चित आहे. वसुधैव कुटुंबकम् आणि साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेला आपला देश आज पाश्चिमात्य संकल्पनेमुळे वसुधैव आपानम् आणि खा, प्या आणि मौजमजा याला बळी पडला आहे. पर्यावरणाबाबत जनजागृतीची गरज आहे. 2000 मध्ये ‘अर्थ चार्टर कमिशन’मध्ये पृथ्वीवरील संकटावर तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये दोन दिवसांत 22 सूत्रांची निवड करण्यात आली आणि परिषदेच्या शेवटच्या दिवशी अथर्ववेदातील पृथ्वीसूक्तावर चर्चा करण्यात आली होती. हे आश्चर्यकारक आहे की, शास्त्रज्ञांनी चर्चा केलेली 22 सूत्रे अथर्ववेदात आधीच उपलब्ध आहेत. त्यामुळे आज पर्यावरणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगाला आधुनिक उपायांसह वैदिक तत्त्वज्ञानाची गरज आहे, तरच आपली भारतीय संस्कृती आणि निरामयता सदैव राहील...
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.