‘विश्वकर्मा जयंती’ दिवशीच साजरा करावा ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’

    17-Sep-2022
Total Views |

labour 
 
 
 
भारत सरकारने अमृतकालामध्ये परकीय विचारांची जोखड झुगारून आपल्या संस्कृतीनुसार, परंपरेने चालत आलेला, समाजासाठी त्याग व समर्पणाची प्रेरणा देणारा ‘विश्वकर्मा जयंती’ हा दिवस ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून जाहीर करावा, असे आवाहन दि. 17 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने ‘भारतीय मजदूर संघा’ने देशातील समस्त कामगार वर्गाच्यावतीने केंद्र सरकारला केले आहे. त्यामागील पार्श्वभूमी विशद करणारा हा लेख...
 
 
सध्या आपल्या देशात दि. 1 मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून पाळला जातो. दि. 4 मे, 1894 रोजी अमेरिकेतील शिकागो या शहरात कामाचे तास किमान आठ करा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने पुन्हा झालेल्या आंदोलनावर तत्कालीन सरकारने गोळीबार केला होता. त्या मोर्चात अनेक कामगार ठार झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस’ म्हणून पाळावा, असा ठराव 1896 साली झालेल्या ‘इंटरनॅशनल सोशालिस्ट काँग्रेस’च्या सभेत करण्यात आला होता. त्यानुसार 1898 पासून 1 मे हा दिवस ‘कामगार दिवस’ म्हणून अनेक देशांत पाळला जात आहे.
 
 
गेली 100 वर्षे जगात भांडवलशाही आणि साम्यवादी विचारांना प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या अनुयायी देशांनी प्रयत्न केल्याचे दिसते. रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर रशियात साम्यवाद प्रस्थापित झाला. साम्यवादाचा प्रभाव हळूहळू अनेक देशांमध्ये वाढू लागला. दुसर्‍या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियन बनले, सुमारे एक तृतीयांश जग साम्यवादाच्या विचाराखाली आले होते. साम्यवादावर आधारित आपली समाजव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्नदेखील केला. त्याच वेळेला अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलवादी देश आपला प्रभाव निर्माण करत होते. अनेक ठिकाणी या दोन विचारधारा एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्या.
 
 
समाजात ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ हे दोन वर्ग आहे. ‘आहे रे’ म्हणजे भांडवलवादी शोषक, तर ‘नाही रे’ म्हणजे कामगार, श्रमिक ज्यांचे शोषण केले जाते. हा साम्यवादाचा मूळ सिद्धांत. त्यामुळे कामगार व मालक हे एकमेकांचे शत्रू असून कामगारांवर होणार्‍या अन्यायाविरूद्ध चीड निर्माण करणे आणि कामगारांना त्याविरुद्ध लढण्यास उभे करणे, कामगारांच्या क्रांतीतून राज्यक्रांती करणे, ही कार्यपद्धती. त्यास काही ठिकाणी यशही आले. तसे पाहिले तर भांडवलवाद आणि साम्यवाद या दोन्ही विचारधारा या साम्राज्यवादीच होत्या. एकाला भांडवलदारांचे तर दुसर्‍याला कामगारांचे साम्राज्य स्थापित करायचे आहे.
 
 
स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी भारतात रशियन साम्यवादावर आधारित मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. काँग्रेसने राज्यसत्ता सांभाळली, तर साम्यवाद्यांनी शिक्षण, विद्यापीठ प्रशासन या माध्यमातून साम्यवादी अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच भाग म्हणून भारतात 1 मे हा दिवस ‘कामगार दिवस’ म्हणून प्रस्थापित करण्यात आला. भारतात कम्युनिस्ट राज्यक्रांती घडवण्याच्या उद्देशाने या दिवसाचा शस्त्र म्हणून वापर साम्यवादी कामगार संघटना गेल्या 75 वर्षांपासून करत आहे. या दिवशी विविध कार्यक्रम करून कामगारांच्या मागण्यांच्या नावाखाली कामगार व मालक यांना एकमेेकांचे शत्रू अशा पद्धतीने उभे करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. 1 मे हा ‘आंतरराष्ट्रीय श्रमिक दिन’ असं म्हंटल जात असलं तरी, खर्‍या अर्थाने तो सर्वच देश पाळतात असे नाही. जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी ‘कामगार दिन’ पाळला जातो.
 
 
ऑस्ट्रेलियात राजधानी आणि दक्षिण ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार, तर पश्चिम ऑस्ट्रेलियात मार्च महिन्याचा पहिला सोमवार हा दिवस ‘कामगार दिन’ असतो. म्हणजेच एकाच देशात वेगवेगळ्या भागात दोन वेगवेगळ्या दिवशी ‘कामगार दिन’ साजरा करतात.आपल्या शेजारी बांगलादेश हा 14 एप्रिल हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून साजरा करतो. अमेरिका व कॅनडा या देशात 1884 पासून सप्टेंबर महिन्याचा पहिला सोमवार हा दिवस ‘कामगार दिन’ असतो, तर जपानमध्ये 23 नोव्हेंबर हा दिवस ’लेबर थँक्स गिविंग डे’ म्हणून पाळला जातो.
 
 
न्यूझीलंडमध्ये 1995 पासून ऑक्टोबर महिन्याचा चौथा सोमवार हा दिवस ‘कामगार दिन’ असतो, तर त्रिनिनाद व टोबॅगो या देशात 24 जून हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. कझाकिस्तानमध्ये सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा दिवस ‘कामगार दिन’ असतो. याचा अर्थ 1 मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिवस’ आहे आणि सर्वच देश तो पाळतात असे नाही. केवळ दुसर्‍या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियाच्या युनियनमध्ये सहभागी झालेल्या देशात 1 मे हा दिवस पाळला जात असे. रशियाचे पतन झाल्यानंतर अनेक देश वेगळे झाले आणि त्या देशात वेगवेगळ्या दिवशी ‘कामगार दिवस’ साजरे होत आहेत.
 
 
 
बरे, ज्या देशात 1 मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून पाळला जातो, त्यांचाही उद्देश वेगळावेगळा आहे. ज्या युरोपियन राष्ट्रांमध्ये 1 मे हा दिवस साम्यवादाचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी प्रतिज्ञा करण्याचा आहे, तर रशियाच्या गटातील देश भांडवलवाद्यांचे वर्चस्व नाहीसा करण्याचा संकल्प करतात. त्यासाठी ‘जगातील कामगारांनो एक व्हा!’ असा नारा देतात. मात्र, गेल्या 100 वर्षांच्या अनुभवातून ते पूर्णत्वास येऊ शकत नाही, हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे रशियाचे विभाजन झाले. भारतातही साम्यवादी विचाराने काम करणारे किमान दहा पक्ष व त्यांच्या कामगार संघटना आहेत. मात्र, त्यादेखील केवळ भारतातही एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे ‘जगातील कामगारांनो एक व्हा!’ ही घोषणा हवेतच विरून गेलेली आहे.
 
 
भारतात पश्चिम बंगाल, त्रिपुरा, केरळ या राज्यांमध्ये साम्यवाद्यांनी आपले सरकार 30 वर्षांपेक्षा अधिक काळ चालवले. त्या राज्यातील कामगारांची प्रगती झाली का? तर या कामगारांची परिस्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत अत्यंत खराब आहे असे दिसते. त्यामुळे कामगारांमध्येसमाजातील अन्य घटकांविरुद्ध द्वेषभावना, चीड निर्माण करणारा 1 मे हा दिवस हा देशाचा ‘कामगार दिन’ का असावा, याचा विचार केला पाहिजे.
 
 
मग आपल्या संस्कृतीत ‘कामगार दिना’बाबत काहीच विचार नव्हता का? तर तसे अजिबात नाही. हिंदू संस्कृतीत नेहमी त्याग आणि समर्पण याला महत्त्व आणि आदर दिला आहे. तसेच मजूर आणि मालक हे समाजातील अन्य घटकांप्रमाणेच समाजाचे एक घटक आहेत आणि ते एकमेकांना पूरक आहेत, असे आपण मानतो. कामगारांना ‘मजूर’, ‘गडी’, ‘सेवक’ या नावानेदेखील संबोधले जाते. अनेक घरांमध्ये काम करणारे मजूर, गडी हे त्या कुटुंबाचे सदस्यच आहेत, असे मानले जाते.
 
 
‘हिंदू कुटुंब’ या व्याख्येत केवळ त्या घरात राहणारे एका रक्ताचे सदस्य नाही, तर त्याचबरोबर घरात कायम राहणारे नातेवाईक, कामाला असणारे मजूरदेखील त्या कुटुंबाचे घटक समजले जातात. ही व्यापक संकल्पना आपल्या देशात आहे. आपल्या संस्कृतीत मनुष्य, प्राणी, वनस्पती प्रत्येकाचा सन्मान केला जातो. त्या दृष्टीनेच आपण बैलपोळा, नागपंचमी या सणांकडे पाहू शकतो.
 
 
त्याप्रमाणेच भारतात ‘विश्वकर्मा जयंती’ हा दिवस ‘श्रमिक दिन’ म्हणून पाळण्याची प्रथा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. भारतीय ग्राम समाजव्यवस्था ही ‘बारा बलुतेदार’ या पद्धतीवर आधारलेली होती. हे बारा बलुतेदार म्हणजे विविध सेवा देणारी, कलाकुसर करणारे सुतार, कुंभार, लोहार, सोनार, विणकर आदी कामे करणारे कारागिर आहेत. जे समाजाच्या विविध गरजा पूर्ण करणे तसेच नवनिर्माण करण्याचे काम करतात. हे सर्व समाजघटक विश्वकर्माला आपला पूर्वज मानतात आणि त्याची जयंती हा दिवस ‘श्रमिक दिन’ सण म्हणून साजरा करतात.
 
 
विश्वकर्माचा उल्लेख महाभारत, रामायण, स्कंदपुराण, भागवत यासह वेद-उपनिषदे आदी प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये जागोजागी आढळतो. भगवान विश्वकर्मा सर्व कलांमध्ये पारंगत होते. त्यांच्या फोटोकडे आपण पाहिले तरी त्यांच्या मागे सर्व प्रकारची हत्यारे व उपकरणे आपल्याला पाहायला मिळतात. पुढे पुढे ‘विश्वकर्मा’ ही एक व्यक्ती राहिली नसून विविध नवनिर्माण करणार्‍या स्थापत्य, अभियंता, कलाकुसर आदी कामे करणार्‍या व्यक्तींचा समूह झाला. आजही भारतातील अनेक ज्ञाती-समाज स्वत:ला ‘विश्वकर्मा समाज’ असेच म्हणतात. विश्वकर्माने अनेक नगरांचे निर्माण केलेले आहे. ज्यात इंद्राची राजधानी अमरावती, श्रीकृष्णाची द्वारका, अलंकापुरी, रावणाची लंका, पांडवांची इंद्रप्रस्थ, हस्तीनापूर आदी. तसेच, स्वयंचलित आकाश आणि समुद्र यामध्ये लढण्यासाठी लागणार्‍या विविध प्रकारच्या अस्त्रांची निर्मिती, रामायणातील ‘पुष्पक विमान’ या सर्वांची निर्मिती भगवान विश्वकर्माने केलेली होती, असा उल्लेख सापडतो.
 
 
केवळ त्यामुळेच त्याची जयंती ‘कामगार दिन’ म्हणून साजरी केली जाते का? नाही, तर या उत्कृष्ट निर्मिती बरोबरच त्याचा समाजासाठी असणारा त्यागही जास्त महत्त्वाचा आहे. त्यासाठी एक कथा विविध ठिकाणी आलेली आहे. विश्वकर्माचा पूत्र वृत्रासुर अत्यंत शूर होता. त्याने भगवान शंकराची आराधना करून जी शक्ती मिळवली, त्या शक्तीचा वापर तो समाज हिताऐवजी समाजाला त्रास देण्यासाठी करू लागला. त्याचा त्रास इतका वाढला की, अन्य समाजाला आपलं जीवन जगता येणं कठीण झाले. त्यामुळे समाजहितासाठी त्याचा वध करण्याची आवश्यकता निर्माण झाली. मात्र, त्याचा वध करणार कसा? भगवान शंकरांनी त्याला वर दिलेला होता. त्यानुसार तो हाडांपासून बनवलेल्या एका अस्त्रापासून त्याचा वध होईल, असे सांगण्यात आले होते.
 
 
मग त्यासाठी दधीची ऋषींनी आपला देह त्याग केला. त्यांच्या हाडांपासून विश्वकर्म्याने आपल्याच मुलाला मारण्यासाठी एक अस्त्र बनवले आणि त्या अस्त्राने इंद्राने वृत्रासुराचा वध केला. समाजाला त्याच्या त्रासापासून मुक्त केले. समाजहितासाठी आपल्या पुत्राचे बलिदान देणारा विश्वकर्मा यासाठी सर्वांना पुज्य आहे. विश्वकर्माच्या जीवनातून समाजाला, कामगार वर्गाला नवनिर्माण करण्याची प्रेरणा समाजहितासाठी त्याग करण्याची देखील प्रेरणा मिळते. त्यामुळेच केवळ कामगारच नाही, तर सर्वसमाज हा विश्वकर्माला भगवान मानतो आणि त्यांच्या जयंती हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून पाळतो. 1 मे या दिवशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांप्रती दुःख आहेच. मात्र, त्याचा स्मृतिदिवस ‘कामगार दिन’ कसा असेल? कोणताही दिन समाजात सकारात्मक संदेश देणारा असावा. 1 मेच्या घटनेमुळे समाजातील एक वर्ग दुसर्‍याविरुद्ध शत्रू म्हणून उभा राहतो. वर्ग संघर्षाला बळ मिळते.
 
 
आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्षं पूर्ण झाली आहेत. आता आपण अमृतकालामध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या मार्गदर्शनात देशातील विविध क्षेत्रात असलेल्या गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचे आवाहन केले आहे. मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख पंथाचे धर्मगुरू श्री गुरुगोविंदसिंग यांची दोन मुले जोरावर सिंघ आणि फतेसिंघ या दोन मुलांनी दि. 26 डिसेंबर, 1705 या दिवशी हिंदू धर्मासाठी स्वतःचे बलिदान दिले. धर्मपरिवर्तन करून मुसलमान होण्यास नकार दिला म्हणून त्यांचा स्मृतिदिन 26 डिसेंबर हा दिवस ‘बालदिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचबरोबर ‘राजपथ’चे नाव ‘कर्तव्यपथ’ करणे, किंग जॉर्जच्या जागी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा लावणे याद्वारे अशा गुलामीच्या खुणा पुसण्याचे काम केंद्र सरकारने सुरू केलेले आहे, तर महाराष्ट्रात औरंगाबादचे संभाजीनगर करणे हा देखील त्याचाच भाग आहे. त्याच पद्धतीने 1 मे हा दिवस ‘कामगार दिवस’ म्हणून पाळणे हीदेखील साम्यवाद्यांनी लादलेली एक वैचारिक गुलामीच आहे. तीदेखील पुसून टाकली पाहिजे.
 
 
 
भारतीय श्रमिक गेल्या हजारो वर्षांपासून समाजासाठी त्याग, समर्पण करणारा विविध कलाकुसर यांची निर्मिती करणारा देशातील श्रामिकांचा पूर्वज 17 सप्टेंबर भगवान विश्वकर्माची जयंती हा दिवस ‘राष्ट्रीय श्रमिक दिवस’ म्हणून साजरा करतात. उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल बिहार, ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश आदी अनेक राज्यांमध्ये त्यादिवशी पूजा केली जाते, तर काही राज्यांत राजकीय सुट्टीदेखील दिली जाते. ‘भारतीय मजदूर संघ’ आपल्या स्थापनेपासून गेली 67 वर्ष ‘विश्वकर्मा जयंती’ हा दिवस ‘राष्ट्रीय श्रमिक दिवस’ म्हणून साजरा करत आहे. महाराष्ट्र सरकारचे कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनीही या वर्षी 17 सप्टेंबर विश्वकर्मा जयंती दिनी सर्व कामगार कार्यालयात विश्वकर्मा पूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे हार्दिक आभार.
 
 
 
-अ‍ॅड. अनिल ढूमणे