भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण सुरक्षेकरिता इलेक्ट्रिक वाहनांची ‘ग्रीन एनर्जी’

    17-Sep-2022   
Total Views |

cl
 
 
 
दि. 9 सप्टेंबर हा दिवस ‘इलेक्ट्रिक वाहन दिवस’ म्हणून जगभर ओळखला जातो. त्यानिमित्ताने भारताच्या इलेक्ट्रॉनिक वाहन संबंधी धोरणाचा विचार करता, आपल्या देशाचेही इलेक्ट्रिक वाहनांसंबधीचे स्वप्न साकार होऊ शकते. पण, त्यासाठी वित्तीय पुरवठ्याच्या आघाडीवर भरीव प्रयत्न करावे लागतील. तसेच कर्जासाठीच्या प्राधान्य क्षेत्रात या उद्योगाचा समावेश करणेही गरजेचे आहे. त्याबद्दल सविस्तर...
 
 
भारत ही जगातील चौथी सर्वांत मोठी वाहन बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. जरी वर्तमान ‘ऑटोमोबाईल’ बाजारपेठेत जीवाश्म इंधन-आधारित वाहनांचा प्रभाव असला तरीही भारत सरकारने महत्त्वाकांक्षी लक्ष्ये आणि अनुकूल धोरणे स्थापित केली आहेत, जेणेकरून ‘इलेक्ट्रिक वाहने जीवाश्म इंधन’-आधारित वाहनांची प्राथमिक पद्धत म्हणून बदलेल. ‘राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅन (एनईएमएमपी) 2020’ अंतर्गत, 2020 पासून वर्षांला सहा-सात दशलक्ष हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे. याव्यतिरिक्त, भारत सरकार 2030 पर्यंत 400 दशलक्ष ग्राहकांचे ‘इलेक्ट्रिक’ स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करेल.
 
 
या लक्ष्यांना प्राप्त करण्यासाठी, अलीकडेच सरकारने ‘हायब्रिड’ आणि ‘इलेक्ट्रिक’ वाहनांचे (फेम) जलद अंमलबजावणी आणि उत्पादन याचे ‘एमएयु-2’ची घोषणा केली. ज्यात एप्रिल 2019 पासून सुरू होणार्‍या तीन वर्षांच्या कालावधीसाठी दहा हजार कोटींचा खर्च समाविष्ट केला गेला. या योजनेमध्ये ग्राहकांना ‘इलेक्ट्रिक’ वाहने खरेदी करण्यासाठी मागणी प्रोत्साहन आणि ‘चार्जिंग’ पायाभूत सुविधांचा विकास करण्याशिवाय संशोधन व विकासासाठी उत्पादकांना प्रोत्साहन देणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. आर्थिक लाभांव्यतिरिक्त, विशेषत: ‘एमएसएमई’ क्षेत्रातील नोकरी निर्मितीची क्षमता, ‘इलेक्ट्रिक’ वाहन बदलणे फायदेशीर असेल. ‘फेम 2’ योजनेंतर्गत पात्र वाहने त्यांच्या आयुष्यात एकत्रितपणे 5.4 दशलक्ष टन तेल वाचवू शकतात, ज्याचे मूल्य 17.2 हजार कोटी आहे.
 
 
‘ग्रीन हाऊस इफेक्ट’ कमी करण्यातही मोठा हातभार
 
‘इलेक्ट्रिक’ वाहनांवर वापरण्याचे फायदे लक्षात घेऊन, ‘पीएम’-‘एसटीआयएसी’च्या ‘इलेक्ट्रिक व्हेईकल्स मिशन’चे उद्दिष्ट वाहन उप-प्रणाली आणि भारतीय गरजांनुसार विकसित करणे, ‘इलेक्ट्रिक’ वाहनांचा वापर व्यवहार्य बनवून त्यांचा जलद अवलंब करण्यास मदत करणे हे आहे.
 
 
वाढत्या इंधन दरवाढीमुळे आता नागरिक विद्युत वाहनांच्या खरेदीला पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे विद्युत वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. इंधनाच्या खर्चापेक्षा ‘चार्जिंग’ करण्यास लागणार्‍या विजेचा खर्च कमी आहे. एकदा तीन ते चार तास वाहन ‘चार्जिंग’ केले की ते वाहन साधारणपणे 90 ते 100 किलोमीटरपर्यंत चालते. त्यामुळे पैशाची चांगली बचत होऊ लागली आहे.
 
 
शासनाने जाहीर केलेले धोरण पाहता विद्युत वाहनांकडे खरेदीत आगामी काळात वाढ होणार असून, पुढील युग हे विद्युत वाहनाचे असेल. इलेक्ट्रिक कार किंवा बॅटरी असलेली कार, ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी नवीन संकल्पना आहे. काही कंपन्या आता इलेक्ट्रिक कार पूर्णपणे इलेक्ट्रिक म्हणून विकसित करत आहेत, तर काही कंपन्या अजूनही ‘हायब्रिड’ कारच्या स्वरूपात इलेक्ट्रिक कारची काही वैशिष्ट्ये, इंधनावर चालणार्‍या कारसह जोडत आहेत.
 
 
इलेक्ट्रिक कारचा वापर फक्त तुमचे पैसे वाचवण्यासाठी नाही, तर ते आरोग्यदायी आणि स्वच्छ वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील तितकेच गरजेचे आहे. पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनावर चालणार्‍या कार वातावरणात प्रचंड प्रमाणात कार्बन उत्सर्जित करतात, ज्यामुळे वायूप्रदूषणाला हातभार लागतो. अशा वाहनांचा ‘ग्रीन हाऊस इफेक्ट’वाढवण्यातही मोठा हातभार आहे. अशा परिस्थितीत ‘इलेक्ट्रिक’ कारकडे वरदान म्हणून पाहिले जात आहे. यामुळेच ‘ऑटो’ कंपन्याही ‘इलेक्ट्रिक’ कार बनवण्यात रस दाखवत आहेत.
 
 
व्यावसायिक ‘इलेक्ट्रिक’ वाहनांच्या विक्रीमध्ये वित्तपुरवठा मोठा अडथळा
 
भारताचे ‘इलेक्ट्रिक’ वाहनांसंबधीचे स्वप्न साकार होऊ शकते. पण, त्यासाठी वित्तीय पुरवठ्याच्या आघाडीवर भरीव प्रयत्न करावे लागतील. कर्जासाठीच्या प्राधान्य क्षेत्रात या उद्योगाचा समावेश केला पाहिजे.
 
 
गुंतवणूक आणि संशोधन यांमुळे भारतातील ‘इलेक्ट्रिक’ वाहनांची स्वीकारार्हता वेगाने वाढते आहे. देशाने 2030 पर्यंत 70 टक्के व्यावसायिक वाहने, 30 टक्के खासगी कार, 40 टक्के बस व 80 टक्के दुचाकी व तीनचाकी वाहने इलेक्ट्रिक करण्याचे अत्यंत महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट भारताने निर्धारित केले आहे.
 
 
व्यावसायिक वाहन उद्योग 70 टक्के वाहने विकण्याच्या लक्ष्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रात वापरासाठी लागणार्‍या अत्यल्प किमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांमधील संक्रमणाची प्रक्रिया अधिक परवडणारी, शाश्वत आणि सोपी होत आहे. मात्र, सध्या भांडवल आणि वित्तपुरवठाइलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या पायाभूत विकासाच्या दिशेने नेणे ही गरज आहे. या वाहनांसाठी परवडणारा आणि विनाअडथळा वित्तपुरवठा झाल्यास वाहनचालकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे जाणे सहज शक्य होणार आहे.
 
 
बहुतांश वाहने सरकारकडूनच खरेदी केली जात आहेत. व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये वित्तपुरवठ्यात येणार्‍या अडचणी हा मोठा अडथळा ठरत आहे. बँकांना कर्ज देताना भीती वाटत आहे आणि ग्राहकाकडून कर्ज थकल्यास इलेक्ट्रिक वाहनांच्या पुनर्विक्रीसंदर्भात काळजी वाटते.याचबरोबर व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांसाठी मालकी आणि वापरासाठीच्या नावीन्यपूर्ण योजना आणणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या खेळत्या भांडवलाची गरज पडेल.
 
 
इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांना वेळेवर वित्तपुरवठा मिळणे, जोखीम व्यवस्थापन, वेळेत प्रकल्प पूर्ण करून उत्पादन सुरू करणे यांसाठी कर्जपुरवठादार संस्थांची नोंदणी व्हायला हवी. आज देशातील बहुतांश इलेक्ट्रिक वाहनांचे प्रकल्प मागे पडत आहेत व आर्थिक मदत उपलब्ध नसल्याने त्यांच्यात व्यत्ययही येत आहे. देशात हरित आणि शाश्वत कर्ज देण्याची यंत्रणा उभारण्याची गरज आहे. जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासारख्या संस्थांच्या मदतीने देशातील संस्थांना आंतरराष्ट्रीय दराने कर्जपुरवठा करता येईल व त्यामुळे देशांतर्गत कर्जांचे दर कमी होऊ शकतील.
 
 
पतपुरवठा संस्था, विमा कंपन्यांनी याबाबतीत अनुकूल धोरण स्वीकारले, तर स्थित्यंतर अधिक सुलभ होईल. भारतात नीती आयोग आणि जागतिक बँक संयुक्तरित्या जोखीम व्यवस्थापनाची 30 कोटी डॉलरची यंत्रणा उभी करीत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होण्यात विलंब झाला, तर बँका आणि पतपुरवठा संस्थांसाठी हमी देणारी ही यंत्रणा असेल.
 
 
 

cl 
 
 
 
चीनमधील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाच्या यशामागची कारणे
 
इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती ‘इंटर्नल कम्बशन इंजिन’ असलेल्या वाहनांच्या तुलनेत अधिक स्पर्धात्मक बनली आहे. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुरुवातीला मोजावी लागणारी किंमत अजूनही एक मोठा अडथळा ठरत आहे.
 
 
वित्तपुरवठा उपलब्ध असला, तरी अधिकचे व्याजदर, कर्जफेडीचा कमी कालावधी व कर्जाच्या तुलनेत किमतीचे गुणोत्तर यांमुळे ग्राहकांवर मोठे ओझे पडते. आपल्या देशात ‘इंटर्नल कम्बशन इंजिन’ असलेल्या वाहनांसाठी परवडणार्‍या दरात कर्जपुरवठा होतो. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे व्याजदर कमी केल्यास कर्ज कमी होऊन देशात इलेक्ट्रिक वाहनांचा खप मोठ्या प्रमाणात वाढू शकेल. इलेक्ट्रिक वाहनांचे तंत्रज्ञान स्वीकारार्हतेबद्दल एकमत असूनही, ‘बिझनेस मॉडेल’चा धोका समजल्याने कर्जपुरवठादार संस्था इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर्ज देण्यास उत्सुक नाहीत. याचा परिणाम म्हणजे, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार्‍यांना कर्ज मिळणे दुरापास्त होते. या वाहनांची निर्यात वाढण्यासाठी ‘एक्झिम’ मदत मिळणे गरजेचे आहे. चीनमधील इलेक्ट्रिक वाहन उद्योग यशस्वी असण्याचे कारण, तेथील ‘सिनोशुअर’सारख्या संस्था या वाहनांसाठी मोठ्या कालावधीसाठीची निर्यात, पत आणि निर्यातीसाठीच्या सुविधा पुरवित आहे.
 
 
भारतानेसुद्धा असेच धोरण अवलंबले पाहिजे. त्यामुळे आपली निर्यात वाढेल आणि किमती कमी होतील.
दोन वर्षांत इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी चारचाकी वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांच्या किमतीएवढी होईल, असे महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनीही स्पष्ट केले आहे.
 
 
‘प्राईम सेक्टर लेंडिंग’ समाविष्ट केल्यास फायदा...
 
स्वच्छ, हरित व शाश्वत तंत्रज्ञानानाच्या जास्तीत जास्त वापरासाठी त्यांना ‘पतपुरवठा प्राधान्य क्षेत्रा’त (प्राईम सेक्टर लेंडिंग-पीएसएल) समाविष्ट केल्यास या स्थित्यंतराला चांगली चालना मिळेल. सौर व नवीकरणीय ऊर्जा यांचा समावेश ज्या पद्धतीने ‘पीएसएल’मध्ये करण्यात आला, त्याचप्रमाणे या बाबतीतही करता येईल. एकूण इलेक्ट्रिक वाहनांपैकी एक तृतीयांश वाहनांची खरेदी कर्ज घेऊनच होते. इलेक्ट्रिक वाहनांचा प्राधान्य क्षेत्रात समावेश केल्यास वित्तसंस्थांच्या व्यवसायात या क्षेत्राला महत्त्व मिळेल. वाहन क्षेत्रात होऊ घातलेल्या स्थित्यंतरात्मक बदलाच्या उंबरठ्यावर आपण आहोत. पर्यावरणानुकूल अशा या बदलात सरकार आणि वित्तसंस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. इलेक्ट्रिक वाहनांचा उद्योग बहरावा, यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करायला हवे. देशाच्या विकासविषयक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीही हे महत्त्वाचे आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.