‘बलुतं’ : स्त्रियांवरील बेबंदशाहीची करुणगाथा

    17-Sep-2022   
Total Views |
 

balut
 
 
 
दि. 20 सप्टेंबर हा साहित्यिक दगडू मारुती पवार अर्थात ‘दया पवार’ या टोेपणनावाने लेखन करणार्‍या लेखकाचा स्मृतिदिन. पवार यांच्या साहित्यामध्ये ‘बलुतं’ या पुस्तकाचे स्थान ध्रुवतार्‍यासारखे अगदी अढळ आहे. त्यांचे ‘बलुत’ हे पुस्तक विद्रोही साहित्य आहे का? माझ्यासाठी या प्रश्नाचे उत्तर आहे की, ‘बलुतं’ हे केवळ दया पवार यांचे किंवा कोणत्याही एका समाजगटाचे जगणे मांडत नाहीत, तर पवार यांच्याभोवतालचा समाज आणि समाजेतर स्त्रियांचे कौटुंबिक जीवन आणि आंबेडकरी चळवळ यांचा इतिहासच ‘बलुतं’मध्ये मांडला आहे. ‘बलुतं’मधील आयाबायांचे जगणे आणि आजच्या तळागाळातल्या आयाबांयाचे जगणे, याचा घेतलेला हा कानोसा...
 
 
‘बलुतं’ पुस्तकात सुरुवातीलाच स्त्रियांचे जगणे सांगताना दया पवार म्हणतात- ”स्त्रियांना कुणी पडद्यात ठेवत नसतं, उलट पुरूषांपेक्षा त्याच जास्त राबत असतात. दारूड्या नवर्‍याने बदडलं तरी त्याची सेवा करीत, त्याचे व्यसानाचे लाड पुरवित रस्त्यावर पडलेल्या काचा, कचरा, लोखंड, कागद वेचून आणित आणि त्या विकत.” दिवसभर कचरा वेचणार्‍या, कष्टाची काम करणार्‍या या स्त्रियांना जीवनात आनंदासारखे काही असू शकते, याचा मागमूसही नाही.‘बलुतं’मधल्याया कष्टकरी आणि दुःखाचे डोंगर हसत हसत पार करणार्‍या महिला काही काल्पनिक वाटत नाहीत. नव्हे, दया यांची आई, मावशी, नातेवाईकांच्या मुली, प्रत्यक्ष दया यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया, या सगळ्यांचे जगणे जीवाला चटका लावून जाते.
 
 
‘बलुतं’मध्ये दया आईचे जगणे मांडतात. वडील तसे काही वाईट नव्हते, पण व्यसनी! बाई-बाटलीचा छंद. वडील 10-15 दिवस घरी यायचेच नाहीत. आई कचरा वेचून मुलाबाळांना जगवायची. पतीचे बाहेरही दुसर्‍या महिलांशी संबंध आहेत, हे सत्य तिने आजूबाजूच्या इतर स्त्रियांसारखे सहज पचवलेले. तसे दया यांचे वडील किंवा ‘बलुतं’मध्ये विस्ताराने ज्या पुरुषांबद्दल लिहिले गेले, ते सगळेच मूळ स्वरूपात लिहिले गेले, मांडले गेले. माणूस कधीच 100 टक्के चांगला नसतो किंवा 100 टक्के वाईटही नसतो. परिस्थितीनुसार माणसाचे वागणे आणि स्वभाव म्हणजे चांगल्या वाईटाचे उलटसुलट विण आहे, असे ‘बलुतं’ वाचून वाटते. त्यामुळेच कुटुंबाकडे लक्ष न देणारा आणि दुसर्‍या बायांकडे जाणारे दया यांचे वडील काही प्रसंगी प्रामाणिक आणि कुटुंबवत्सलही वाटतात. असो. तर दया यांच्या आईचे जगणे वाचून आज 2022 सालीही समाजातील महिलांच्या जीवनात काय बदल झाला, याची तुलना करावीशी वाटते.
 
 
मान्य आहे की, आज समाजात खुलेआम लैंगिक स्वैराचाराला समाजबंदी आहे. बहुविवाहाला कायद्याने बंदी आहे. मात्र, तरीही दया यांच्या आईचे जे दुःख होते, ते दुःख समाजातल्या कित्येक आयाबायांना भोगावेच लागते. त्यात उच्चवर्णीय समाजही आला बरं का? पतीचे निधन झाल्यावर मुलांना जगवण्यासाठी तिने केलेले कष्ट-त्याग पाहिला की, शहर भागातल्या झोपडपट्टीतल्या त्या दिवसभर मरमर मरून मुलाबाळाने इंग्रजी शिकून साहेब व्हावे म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवणार्‍या आयाबाया आठवतात. 10-12 घरची धुणीभांडी करून त्यांच्या हाताच्या रेषा नष्ट झाल्या. स्वतःच्या जगण्यासाठी त्यांना एक मिनिटाचा वेळ नाही.
 
 
आपण माणूस आहोत, आपल्यालाही शरीरधर्म आहे, या भावना तर त्यांच्या आयुष्यातून हद्दपार झालेल्या! आजही या सगळ्या जणींच्या व्यथा दया पवारांच्या आईच्या व्यथेचे कुळ सांगतात. मग प्रश्न पडतो, कुठे काय बदलले? समाज खूप शिकला. खूप प्रगती केली. मग शहराच्या बकाल वस्त्यांमध्ये कष्टाने उरीपोटी फुटणार्‍या त्या आयाबायांचे जगणे तिथेच का थांबले? त्यांच्यापर्यंत सुखाचा नव्हे, माणूस म्हणून जगण्याचा सूर्य का पोहोचला नाही? वडील वारल्यावर आई दुसरे लग्न करायला नकार देते. कष्टाने मुलाला वाढवते. अगदी मरेपर्यंत दया यांचे जगणे चांगले व्हावे म्हणून धडपडते. त्यामुळेच दया काहीसे असे मत व्यक्त करतात की, “आई होती म्हणून मी घडलो. जर वडील जीवंत असते, तर मी कदाचित शिकलोही नसतो.” ही दया यांची आई आजही बहुसंख्य घरात दिसते. या आईला कोणत्याही जातीचे ‘लेबल’ नाही. उच्चशिक्षित, उच्च समाजातही अशी आई भेटते आणि पालात तळ ठोकून राहणार्‍या बकाल जगातही अशी आई भेटलेली आहे.
 
 
‘बलुतं’मध्ये चटका लावणारी अशीच काही महिला पात्र. जमना. जमना ही त्यांच्या आईची दुधबहीण. म्हणजे बाप दोन आणि आई एक. तर दया यांना कळते की, जमना वेश्याव्यवसाय करते. तिच्या नशिबी हे भयंकर भोग का यावेत? तर जमना खूप सुंदर. त्यामुळे तिच्या नवर्‍याला कायमच संशय. त्या संशयामुळे तो तिचा खूप छळ करी. त्यात लैंगिक छळ तर बेफाम. तिच्या सौंदर्याशी त्याची तुलना फिकी पडे. त्यामुळे रागाने तिच्या नवर्‍याने तिला कुटंणखान्यात विकले. नवर्‍याने विकल्यावरही ‘ब्र’ न बोलणारी आणि विरोध न करणारी जमना. दया यांना भेटल्यावर ती त्यांचे लाड करते. पण, पुढे वृद्धापकाळी ती भीक मागून उदरनिर्वाह करते. त्या जमनाची चूक काय?
 
 
वेणूची कथाही अशीच. ती सुंदर होती म्हणून नवर्‍याला तिच्यावर कायम संशय. तिला कडीकुलपात बंदिस्त करी. तिच्या छळाला सीमाच नव्हती. तिचे वडील बबन तिला घेऊन माहेरी येतात. तेव्हा नवरा चाकू घेऊन तिचा खून करायला येतो. पण, सगळे मिळून तिला वाचवतात. वेणूचा दुसरा विवाह होतो. तोसुद्धा वृद्धाशी. त्याचीही नोकरी सुटलेली. अशा काळातही तिला खूप मुलंबाळ होतात. या सगळ्या मुलाबाळांना सांभाळण्यासाठी आणि वृद्ध नवर्‍याला जगवण्यासाठी वेणूला आयाबायाचे काम करावे लागते. का?
 
 
पहिल्या लग्नाचा इतका घाणेरडा अनुभव असताना दुसरे लग्न, तेही अशा व्यक्तीशी का? तर पहिला विवाह झालेली मुलगी म्हणजे ती काही कुमारी नाही आणि एकट्या स्त्रीला कुणीही फसवू शकेल. पुढे मागे काही झाले,तर इज्जत जाणार. यासाठी वेणूला लग्न करावेच लागले. वेणूचे काय? दया यांच्या पहिल्या पत्नीचे सईचे तरी काय होते? किशोरवयात सईसाठी वेडेपिसे असलेले आणि पुढे लग्नाच्या काही वर्षांनंतरही सईला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे दया. त्यांच्यामुळेच सईची आणि त्या मुस्लीम युवकाची ओळख झालेली.
 
 
तसे सईला आणि त्या मुस्लीम युवकाला काही आक्षेपार्ह कृत्य करताना दया यांनी पाहिले नाही. मात्र, लोक कुजबूज करतात. तिचा संबंध त्या मुस्लीम युवकाशी जोडतात. सई आणि तो मुस्लीम युवक परोपरीने दया यांना समजावतात. पण, तरीही दया सईला सोडून देतात. त्यांना वाटते की, सईने विश्वासघात केला. सई मग दया यांच्या वयाची मुलं आहेत, अशा माणसाशी लग्न करते. तिथेही दारिद्य्र हात जोडून उभेच! सईची काय चूक? फक्त त्या मुस्लीम युवकाशी बोलताना दया यांनी तिला पाहिलेले असते, असे दया लिहितात.
 
 
याच पुस्तकात गऊचाही संदर्भ येतो. गऊ वडार समाजाची. दया यांना ती आवडत असते. गऊलाही दया आवडतात. ती 14-15 वर्षांची पोर. दयाही वयाने तितकेच. ती जितकी सुंदर तितकाच तिचा मेहुणा दिसायला भयंकर. गऊच्या मोठ्या बहिणीचा नवरा. या बहिणीला मूल होत नाहीत. म्हणून थोराड वयाच्या तो मेहुणा गऊशीलग्न करायचे ठरवतो. गऊला लग्न करायचे नसते. पण, कुटुंबासमोर आणि समाजासमोर त्या किशोरवयीन मुलीचे काही चालत नाही. त्या लग्नात डुक्कर कापले जाते. दया म्हणतात,त्याचे ओरडणे आणि वेदना या गऊ सारख्याच आहेत. दया एका ठिकाणी म्हणतात की, “मेलेल्या गाईचे सताड पडणारे उघडे डोळे आणि आईचे डोळे त्यांना सारखे वाटतात.” खरे आहे मेलेल्या गाईच्या डोळ्यातले दुःख आणि वेदना समाजातल्या आयाबायांच्या भाळी होते, हे नक्की.
 
 
ते मांडतात की, “समाजात गरीब, मागासवर्गीय स्त्रियांची स्थिती म्हणजे कुणीही यावे शोषण करावे,” अशी स्थिती. ते जी उदाहरणं देतात त्या उदाहरणांनी वाटते की, खरेच आयाबायांचे शरीर हेच त्यांचे शोषणाचे आणि भोगदुःखाचे कारण आहेत की काय? अर्थात, ‘पॉलिश्ड’ दुनियेत ‘व्हाईट कॉलर’ संस्कृतीत नव्हे, तर समाजाच्या तळागाळातही कितीही नाकारले तरी आजही या न त्या रूपात शोषणाचे मार्ग आहेतच. एका प्रसंगात ते म्हणतात, “गवत कापायचे काम करायला बाया यायच्या तेव्हा काही पुरूष त्यांची विळी-कोयते लपवून ठेवायचे. निजायला द्याल तरच विळी परत देऊ, या बोलीवर त्या महिलांचे शोषण व्हायचे.
 
 
गरीब महिला, गवत कापल्यावर हातात पैसे मिळणार आणि त्या पैशावर घरची चूल पेटणार. गवत कापायची विळीच नसेल, तर ती गवत कशी कापणार? गवत कापले नाही, तर पैसे मिळणार नाहीत. दुसरी विळी घ्यायचीही ऐपत नाही. भयंकर! वितभर पोटासाठी महिलांचे शोषण करताना तो आपला हक्कच आहे, असे मानणारे हे सर्वच पुरुष काही ‘आहे रे’ गटातले नव्हते, तर ते ही समाजाच्या जातव्यवस्थेचे पीडित होते, शोषित होते.” ‘बलुतं’ पुस्तकात ज्या ज्या स्त्रियांचा उल्लेख येतो त्या सगळ्या जणींच्या व्यथा आहेत. समान व्यथाकथांनी त्यांचं जगणं एकमेेकींशी बांधले गेले आहे. दलित, मुस्लीम आणि सवर्ण महिलांचे भावविश्व आणि त्यांचे जगणे पाहून मनात अक्षरश: वणवा पेटतो.
 
 
असो. याच पुस्तकात सामाजिक चळवळ, त्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन चालणार्‍या चळवळीचे वास्तवही रेखाटले आहे. सभा झाल्यावर दया यांना स्वतःसोबत जेवायला न नेता ‘महारवाड्यात जा’ असे सांगणारे समाजवादी, चळवळीतला आणि मंत्री झालेला नेता दया यांना मोठ्या हॉटेलात भेटायला बोलावतो. पण, तेव्हा कळते की, त्या नेत्याची एका मोठ्या अधिकार्‍याशी त्या हॉटेलात भेट असते. तो नेता दया यांना खाली थांबायला सांगतो. तासन्तास दया खाली थांबतात. हा नेता त्या अधिकार्‍यासोबत खाली येतो. पण, दया यांना ओळखही देत नाही.
 
 
अधिकार्‍यासमोर समाजातल्या माणसाशी बोलणे कदाचित त्याला कमीपणाचे वाटत असावे. तो दया यांच्यासमोर गाडीतून निघून जातो. असेेच बाबासाहेबांची नक्कल करणारे नेते. बाबासाहेब सुटबूट घालत म्हणून कुणाच्या अंत्यात्रेला जातानाही सुटबूट घालणारे नेते. कार्यकर्त्यांच्या जीवावर सत्ता उपभोगत असतानाही रस्त्यावर त्या गरीब, फाटक्या-तुटक्या कपड्यातल्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागेच चालले पाहिजे, असा हट्ट धरणारे नेते! कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना दिवसभर शिव्या देऊन रात्री त्यांच्यासोबत कोंबडी खाणारे नेते.
 
 
आमदारकी मिळविणार्‍या त्या नेत्याचीही गोष्ट सांगितली आहे. या नेत्याला सभेला पाहुणे म्हणून बोलावले जाते. एका कार्यकर्त्याच्या घरी त्याची निवासभोजन व्यवस्था केली जाते. त्या घरची गृहिणी दिवसभर खपून या नेत्यासाठी चांगलं जेवण बनवते. नेत्याला झोपायला जागा मिळावी म्हणून ती चुलीजवळ झोपते, तर हा नेता रात्री तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर चळवळीच्या नेत्यांनी चळवळीचा कसा खेळखंडोबा केला, याचे सहज वर्णन दया करतात.
 
 
हे पुस्तक कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला अंतर्बाह्य हलवून टाकते. त्यामुळेच लेखक पु. ल. देशपांडे या पुस्तकाबद्दल म्हणाले की, ”या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या रूढीजन्य श्रद्धांचे सत्यदर्शनाला पारखे करणारे मोतिबिंदू गळून पडतील आणि हे भयानक वास्तव पाहता पाहता डोळ्यांत दाटणार्‍या अश्रूंत नवी किरणे उतरल्यावर साक्षात्कार होईल. माणुसकीच्या अधिक जवळ जाऊन जगायची ओढ लागेल चांगल्या साहित्याचा हेतू हा नाही, तर दुसरा काय असतो.”
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.