आपल्या देशाचे अभिनंदन

    16-Sep-2022   
Total Views |
MUSLIM

 
 
पाकिस्तान, बांगलादेश आणि मलेशियाच्या मुसलमानांनी एकत्रित येऊन भारतावर हल्ला करा, असे आवाहन ‘इस्लामिक स्टेट’चा प्रवक्ता अबु उमर-अल मुजाहिर याने नुकतेच केले. भारत हे शत्रूराष्ट्र असून त्याच्याशी लढायलाच हवे. या सगळ्यासाठी पाकिस्तान, बांग्लादेश, फिलीपिन्स, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या मुसलमानांनी एकत्रित येऊन भारताविरोधात हल्ला करावा. कारण, भारतातला मुसलमान घाबरलेले आहेत आणि भारतातले सरकार त्यांच्यावर हमले करत आहे. ‘इस्लामिक स्टेट’च्या या प्रवक्त्याला भारतीय मुसलमान घाबरलेले वाटतात.
 
 
 
काय म्हणावे, त्याने ओवेसी बंधूंचे गेला बाजार मानखुर्दच्या अबू आझमीचे प्रगट विचार ऐकलेले नसावेत. त्यांचे तर सोडाच, पण रामनवमीपासून अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्येही उपद्रव करणारे ते सगळे दंगेबाज पाहिले नसावेत आणि हो, शबाना आझमीपासून नसरूद्दीन शहा वगैरेंबद्दल पण त्यांना माहिती नसावी. छे, पण असेही म्हणू शकत नाही. कारण, भारतातल्या विरोधी पक्षालाही हे सगळे माहिती आहे, पण तरीही तेसुद्धा म्हणतच असतात की, भारतात अल्पसंख्याक त्यातही मुसलमान समाज घाबरलेला आहे, तर ‘इस्लामिक स्टेट’च्या प्रवक्त्याने आशिया उपखंडातील देशासाठी हे ३२ मिनिटांचे भाषण अरबी भाषेतून केले. त्याचे हे विधान पाहून एक संदर्भ आठवला.
 
 
 
‘अल कायदा’चा प्रमुख अयमान-अल-जवाहिरी यानेही काही महिन्यांपूर्वी ‘इस्लामिक स्टेट’चा प्रवक्ता मुजाहिर सारखेच विधान केले होते. पण, विधानानुसार त्याचे घाणेरडे स्वप्न पूर्ण होण्याआधीच तो जुलै महिन्यात अल्लाला प्यारा झाला. आता ‘अल कायदा’ची भूमिका ‘इस्लमिक स्टेट’ निभावत आहे. आफ्रिका खंडातील गरीब आणि त्यातही मुस्लीम देशांमध्ये या दहशतवादी संघटनांनी कहर माजवला. खरे इस्लामिक राज्य आणायची भाषा करत त्या देशांना अक्षरशः नरकाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. तिथे या दहशतवादी संघटना त्यांच्याच कौमच्या भाईबंदांशी लढत आहेत.
 
 
 
पण, त्यामुळे ही राष्ट्रे आणखीन गरिबीच्या आणि दुर्देवाच्याउंबरठ्यावर पोहोचली. दुसरीकडे पाश्चिमात्य राष्ट्रांनाही या दहशतवादी संघटनांनी लक्ष्य केले. आता या दहशतवादी संघटना भारताविरोधीच गरळ का ओकत आहेत? तर याचे उत्तर आहे, दहशतवाद्यांना जगाचे इस्लामीकरण करायचे आहे. त्यासाठी त्यांना मुस्लीमेतर धर्म शत्रू वाटतात. दहशतवादी जेव्हा ख्रिस्ती समाजला लक्ष्य करतात, तेव्हा ख्रिस्ती म्हणून जगातले असंख्य देश एकवटतात आणि हिंदू म्हंटले की, एक केवळ भारत असे चित्र पूर्वी असायचे. भारतातही बहुसंख्य हिंदू कधीच एकवटलेला दिसला नाही. मात्र, २०१४ सालानंतर निवडणुकीमध्ये मतपेटीच्या माध्यमातून हिंदू एकवटलेला दिसला.
 
 
 
त्यानंतर कोणत्याही पंथीय लांगूलचालनाला भीक न घालता देशात पूर्वी कधीही न झालेले ऐमिहासिक निर्णय कायद्याने घेतले गेले, जे कट्टरपंथींच्या काळजात घुसले. राममंदिर आणि आता काशिविश्वेश्वर मंदिर प्रकरण यामुळेही दहशतवाद्यांना कळून चुकले की, भारत आणि भारताचे सरकार कोणत्याही दहशतवादाला बिलकूल न घाबरता लोकहिताचे निर्णय घेते. परिणामस्वरूप, या दहशतवाद्यांना भारतात त्यांची मूळ रूजवणे कठीण होत आहे. त्यामुळे भारताबाहेरील मुसलमानांना भारताविरोधी कारवाया करा, अशी विधान दहशतवादी संघटना करत आहेत.
 
 
 
आता यातही विचार करण्यासाारखी गोष्ट अशी की, उघूर मुस्लीम आणि चीन यासंदर्भात ‘इस्लामिक स्टेट’ किंवा इतर कट्टरपंथी दहशतवादी चकार शब्द उच्चारत नाही. यांना मुस्लीम समाजाची खूप कणव आहे. मात्र, सध्या पाकिस्तानात पूर आला असून, तिथे यांचे बांधव अन्नान्न दशेने टाचा घासत मरत आहेत. मात्र, त्यांना मदत करावी असे चुकूनही कुणा कट्टरपंथी दहशतवादी संघटनेला का वाटत नाही? इस्लामचे राज्य आणायचे म्हणजे केवळ दहशतवाद आणि भीतीचा बागुलबुवा उभा केला की झाले असेच या संघटनांना वाटते. बाकी ते जे अमन-चैन आणि इमान वगैरे बोलतात, त्याचा मागमूसही या दहशतवादी संघटनांमध्ये नाही.
 
 
 
 
असो. आताही मुख्य मुद्दा हाच की, ‘इस्लामिक स्टेट्स’ आणि इतर दहशतवाद्यांना भारत आणि भारत सरकारची भीती वाटत आहे. आपण एकटे भारताला विरोध करूच शकत नाही, याची खात्री त्यांना पटली आहे. दहशतवाद्यांच्या उरात धडकी भरवणार्या आपल्या भारत देशाचे आणि सरकारचे खरेच अभिनंदन!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.