समाजकार्यापासून ते पर्यावरण संवर्धनापर्यंत वैजयंती ठकार यांच्या कार्यकुशलतेचा आवाका प्रचंड व्यापक आहे. तेव्हा, अशा या माणसांना जगण्यावर प्रेम करायला लावणार्या वैजयंती ठकार यांच्याविषयी...
आपलं आयुष्य स्वतःसाठी आणि इतरांसाठी आनंददायी ठरेल, असे जगणे फार कमी लोकांना जमते. मात्र, जगण्यातली ही गंमत उमजून घेतलेले लोक नक्कीच इतरांसाठी विशेषतः समाजासाठी प्रेरक आणि आदर्श असतात. आज आपण ज्यांची ओळख करुन घेत आहोत, त्या वैजयंती ठकार अशाच आनंद वाटत फिरणार्या अष्टपैलूंपैकी एक. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख बघितला, तर ’या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या ओळीची महती कळून येते.
बालपणी अगदीच अबोल असलेल्या वैजयंती महाविद्यालयीन जीवनापासून मात्र स्वतःसाठी बहरत गेल्या आणि मग आपल्या कल्पकतेने त्यांनी विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेतली. गेल्या ३१ वर्षांपासून त्या समाजसेवेत कार्यरत आहेत. त्यांनी अनाथ, दिव्यांग, रुग्ण, वृद्ध, देहविक्रय करणार्या महिला, निरीक्षण गृहातील मुले, समाजसेवक, अभिनेते, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन करुन त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला. त्या स्वतः ‘होम सायन्स’मध्ये ’चाईल्ड डेव्हलपमेंट’ या विषयात निपुण असून त्याचा त्यांना समुपदेशन करताना उपयोग होतो.
तसेच मुलांसाठी स्वओळख, स्वमूल्ये, लैंगिकता, लिंगभाव, अभ्यास कौशल्ये, प्रेम, मैत्री आकर्षण, भावना व वर्तन, आहार, पर्यावरण, शाळाबाह्य शिक्षण, नाट्य प्रशिक्षण तसेच ज्येष्ठांसाठीदेखील विविध विषयांवर त्यांनी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले आहे. प्राण्यांना माणसांच्या भावना कळतात, हेदेखील त्यांनी अधोरेखित केलं. एकदा प्राणिसंग्रहालयात हत्ती न्याहाळताना त्यांना तो बांधून ठेवलेला हत्ती काहीतरी सांगायचं म्हणून डुलतोय, असे जाणवले.
तेथे त्यांना बघणारे अनेकजण ‘हत्ती किती छान डुलतोय’ म्हणून निघून जात. मात्र, वैजयंती यांना त्या डुलण्यामागील नेमकी व्यथा कळली होती. त्या हत्तीच्या पायाला बांधलेला साखळदंड त्याला रुतत होता आणि त्या वेदना त्याला असह्य होत आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. त्याचक्षणी वैजयंती यांनी त्याच्या सोंडेवरून प्रेमाने हात फिरवून त्याच्याशी संवाद साधला. त्यांना माहीत होते की, हे त्याला कळणार नाही, त्या वेदनेतून त्याला मुक्त करण्यासाठी त्या त्याच्याशी सहज प्रेमळ संवाद करीत राहिल्या आणि मग तो हत्ती काही क्षण डुलायचा थांबला. त्याने नजरेस नजर भिडवली, त्याचक्षणी त्या वेदना तो विसरला होता आणि हे समाधान वैजयंती यांना अनोखं सुख, आनंद देत होते. या अनोख्या भावनांची ही देवाणघेवाण नक्कीच स्पृहणीय प्रेरक अशी.. त्यांच्या ’असीमित’ या संस्थेतर्फे ’ग्रहण’ या विषयावर घेतलेला ’जाणीवजागृती’ कार्यक्रम ६५ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहोचविला. विशेष म्हणजे, याची नोंद ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.
पर्यावरणक्षेत्रातदेखील त्यांची रुची आहे. ’माझा निसर्ग आणि माझा परिवार’ हे महाराष्ट्रातील सहा विभागांमधील आधारित प्रदर्शन राज्यातील ४०हून अधिक शाळांमध्ये भरवण्यात आले. जवळपास एक लाख मुलांपर्यंत जैवविविधता हा विषय पोहोचवून त्यांनी, ’जैवविविधता म्हणजे नेमके काय? त्यावर मानवी हस्तक्षेपाचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना’ याविषयी जाणीव निर्माण केली. यावर पीपीटीद्वारे माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचा देखील प्रयत्न केला. वैजयंती ठकार यांनी दापोली येथे झालेल्या ’अपूर्व संचित’ ’बोलीभाषा संवर्धन परिषदे’मध्ये सहभागी होऊन मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. याशिवाय वृक्षलागवड व संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेऊन सात हजारांहून अधिक झाडांची लागवडी केली.
विशेष म्हणजे, यातील ९८ टक्के झाडे जगली असल्याचे त्या आवर्जून सांगतात. २०१९ साली चिपळूण शहराला महापुराने वेढले होते. त्यावेळी अनेक अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तेव्हा आपल्या समाजकार्याचा एक भाग म्हणून त्यांनी ‘मिती’, ’अनुनाद’ आणि ‘बिझनेस एथिक्स फाऊंडेशन’ या तीन संस्थांसह अनेक सेवाभावी लोकांच्या सहकार्याने मदतकार्य केले.
वैजयंती ठकार यांच्या कार्यकुशलतेचा आवाका मोठा आहे. स्वस्थ बसणे हा त्यांचा स्थायीभाव नाही. कोणत्याही समारंभ किंवा कार्यक्रमात काहीतरी नवे, युनिक असे करायचे यावर त्या ठाम असतात. त्यांनी आपल्या आजपर्यंतच्या कार्यकाळात मालिकांमध्ये अभिनय, दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन तसेच जाहिरातींनादेखील आवाज दिला आहे. अनेक कार्यक्रमात उत्कृष्ट निवेदिका म्हणून त्या पेश झाल्या आहेत.
‘अध्यात्म’ या विषयावरदेखील त्यांनी अध्ययन केले आहे. याबाबत युट्यूबवर त्यांचे विवेचन उपलब्ध आहे. महाविद्यालयीन जीवनातील क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. खो-खो, हॉलीबॉल तसेच मैदानी खेळात थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक यात विशेष प्राविण्य मिळवले आहे. काव्यलेखन, वृत्तपत्रातील लेखन, टाकाऊ वस्तूंपासून कलाकृतींची निर्मिती, शिल्पकाम, शिवणकामात त्या निपुण आहेत. त्यांची निरीक्षण आणि आकलन शक्तीदेखील अद्भुत आहे. त्यांनी सांगितलेला हा अनुभव असाच. रम्य आणि अनोखं समाधान सुख देणारा... आपल्या क्षेत्रात स्वतःसह इतरांना भरभरून आनंद देत कार्य करणार्या वैजयंतींना दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!