बांधकाम व्यवसाय हा देशातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक. देशातील रोजगार निर्मितीचे एक प्रमुख क्षेत्र. त्यामुळे या क्षेत्रात होणार्या उलाढालींचा साहजिकच देशाच्या अर्थव्यवस्थेवर बरावाईट परिणाम होत असतो. त्यामुळे हा व्यवसाय आपल्या देशाच्या प्रगतीसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. तेव्हा अशाच पद्धतीचा व्यवसाय सुरु करून, त्यात अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणार्या प्रसाद वाकोडेची ही उद्यमगाथा...
प्रसाद वाकोडे यांना बांधकाम क्षेत्रामध्ये मुळातच काम करायचे होते. त्यांचे शिक्षणही याच क्षेत्रातलेच. ते शिक्षणाने ‘सिव्हिल इंजिनिअर.’ प्रारंभी त्यांनी नोकरीही याच क्षेत्रात केली. पण, या क्षेत्रात काम करताना त्यांना सतत जाणवत होते की, या क्षेत्रात काहीच नावीन्य नाही. सातत्याने आपल्याला त्याच त्या परंपरागत पद्धतीने काम करावे लागते. यामुळे काही काळानंतर या क्षेत्रात तोचतोचपणा यायला लागतो. तसेच सातत्याने काम करण्यास मर्यादा येतात. हेच टाळण्यासाठी आणि आपल्या संकल्पना आपल्या पद्धतीने राबण्यासाठी स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करणे गरजेचे आहे, असे त्यांना प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे प्रसाद वाकोडे यांनी २०२२ मध्येच आपल्या ‘ठेका कॉर्पोरेशन’ची सुरुवात केली.
बांधकाम व्यवसायात एका साचेबद्ध पद्धतीने बांधकाम, विक्री या सर्व प्रक्रिया राबविल्या जात आहेत. त्यात फारसे काहीच नावीन्य नाही. म्हणूनच या प्रक्रियेत नावीन्य आणले पाहिजे, याच हेतूने प्रसाद यांनी दोन प्रकारे काम करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम नेहमीचे बांधकाम करणे आणि दुसरे म्हणजे ‘होम इन्स्पेक्शन.’ हे काम करताना ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक यांचा ताळमेळ खूप गरजेचा आहे. बर्याचदा या क्षेत्रात फसवणुकीचे प्रकार खूप घडतात. त्यामुळे पैशांमध्ये फसवणूक, घर घेतेवेळेस आश्वासन दिलेल्या गोष्टी पूर्ण केलेल्या नसणे, त्यात काहीतरी त्रुटी असणे या गोष्टी सातत्याने आपल्याला ऐकायला मिळत असतात. याच गोष्टींमध्ये काम करणे गरजेचे आहे, असे प्रसाद यांना वाटत होते. म्हणून या क्षेत्रात येताना त्यांनी ग्राहकांना काही नावीन्यपूर्ण सेवा देता येतील का, याचा विचार केला.
यात ‘ठेका कॉर्पोरेशन’कडून आपल्याला काही सेवा हवी असेल, तर ‘ठेका कॉर्पोरेशन’च्या संकेतस्थळावर जाऊन आपण आपले प्रश्न मांडू शकतात. त्यानंतर तुमच्या मागणीनुसार ’ठेका कॉर्पोरेशन’मार्फत काम पूर्ण केले जाते. यात कुठेही फसवणूक होण्यासाठी जागा नाही. कारण, ‘ठेका कॉर्पोरेशन’कडून जी किंमत एकदा सांगितली जाते, तीच कायम ठेवली जाते. त्यात कुठलाही बदल होत नाही आणि हेच या ‘ठेका कॉर्पोरेशन’चे वैशिष्ट्य.
आता या दोन्ही प्रकारच्या सेवा कशा दिल्या जातात, ते बघणे महत्त्वाचे ठरेल. पहिली म्हणजे, जर आपल्याला ‘ठेका कॉर्पोरेशन’कडून बांधकाम करून घ्यायचे असेल, तर प्रथम आपण आपल्या प्लॉटची सर्व माहिती ‘ठेका’च्या संकेतस्थळावर टाकायची. त्यानंतर ‘ठेका’ची टीम आपल्या प्लॉटवर येऊन पूर्ण पाहणी करतात. पाहणी झाल्यावर आपले बांधकाम कशा पद्धतीने केले जाईल, याबद्दल ‘ठेका कॉर्पोरेशन’कडून आपल्याला एक प्लान दिला जातो. त्यामध्ये आपल्या मागणीनुसारच बदल केले जातात. सर्व गोष्टी या वास्तुशात्राच्या नियमांनुसारच तयार केल्या जातात. सर्व गोष्टी ‘फायनल’ झाल्यावर आपल्याला एक ‘कन्स्ट्रक्शन’ची किंमत सांगितली जाते.
‘ठेका’ने ही किंमत ‘फिक्स’ ठेवली आहे. 1800 रुपये प्रति चौ.फूट. यात मग सर्वच गोष्टी अंतर्भूत असतात. ते म्हणजे, बांधकाम करणे, त्यातील सर्व सोयीसुविधा, त्यात अजून म्हणजे पाच वर्षांची वॉरेंटीसुद्धा दिली जाते. त्यामुळे ग्राहकांना अतिशय माफक दरात अत्यंत चांगल्या पद्धतीने बांधकाम करून मिळते. यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यात ठरलेली किंमत कधीच बदलत नाही. एकदा ग्राहकाने किंमत ‘फायनल’ केली की, ती कधीच बदलत नाही. मग या काळात बांधकाम साहित्याचे दर कमी-जास्त झाले, तरी एकदा किंमत ठरली की, तीच शेवटपर्यंत कायम राहते.
या पुढचा भाग म्हणजे, ‘होम इन्स्पेक्शन.’ हा सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत गरजेचा भाग. बर्याचदा आपण घर घेतल्यावर आपल्याला असे जाणवते की, घर घेताना ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या होत्या, त्यापेक्षा काहीतरी वेगळ्या किंवा कमी-जास्त प्रमाणात, कमी प्रतीच्या अशा पद्धतीने बरीच गोष्टी झाल्या आहेत, असे आपल्याला जाणवते. उदा. घरात सांगितल्यापद्धतीने पाणीपुरवठ्याची सोय नसणे, लाईट्सबरोबर नसणे, लिकेजेस होणे यांसारख्या अनेक गोष्टी आपल्याला जाणवतात, आढळून येतात. ही सरळसरळ फसवणूक असते, यानंतर करायचे काय? हा प्रश्न ग्राहकांसमोर असतो.
पण, काहीच करता येत नाही. अशा वेळेस आपल्याला या ‘होम इन्स्पेक्शन’ची गरज असते. या ‘इन्स्पेक्शन’च्या माध्यमातून ‘ठेका कॉर्पोरेशन’ची टीम आपल्या संपूर्ण घराची नीट छाननी करते, जेणेकरून त्यांना सर्व गोष्टी नीट तपासता येतात. यात ते या सर्व गोष्टी व्यवस्थित पडताळून घेतात. घरातील विद्युतपुरवठा व्यवस्थित आहे का? पुरेसा आहे का? यातून काही अपायकारक गोष्टी घडणार आहेत का? या सर्व गोष्टींची छाननी केली जाते आणि त्याचा विस्तृत अहवाल आपल्याला सादर केला जातो, या अहवालानुसार सर्व गोष्टी बनवून देणे हे ‘रेरा कायद्या’नुसार त्या बिल्डरला बंधनकारक राहते. या ‘होम इन्स्पेक्शन’चा इतका फायदा होतो की, यातून आपल्या घराच्या किमतीमध्ये जवळपास एक ते दोन लाख रुपयांपर्यंतचा फरक पडताना दिसतो.
या ’होम इन्स्पेक्शन’मध्ये अजून एका गोष्टीचा समावेश असतो, तो म्हणजे, ’कार्पेट एरिया’चे मोजमाप. बिल्डरने कबूल केल्याप्रमाणे जर ‘कार्पेट एरिया’ आपल्याला मिळाला नसेल, तर त्यातून तर कित्येक ग्राहकांना दहा लाखांपर्यंतचा फायदा होतो. इतकी महत्त्वाची सर्व्हिस आहे, ही ’ठेका’च्या माध्यमातून दिली जाते.
पुढच्या ध्येय-धोरणांबद्दल आणि आपल्या अनुभवांबद्दल बोलत असताना प्रसाद आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवणे या गोष्टीवर भर देतात. जर आपला आपल्या स्वप्नांवर विश्वास असेल, तर आपण त्यासाठी झोकून देऊन काम करू शकतो. बांधकाम क्षेत्रात काम करायचे असेल, तर नक्कीच आपण त्यात काय नवीन देऊ शकतो, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. जर आपला विचार तयार असेल आणि आपल्याला त्यावर विश्वास असेल, तर त्या गोष्टीमध्ये आपली चिकाटी, सातत्य, सर्जनशीलता कायम ठेवून आपले काम करत राहणे गरजेचे आहे.
’ठेका कॉर्पोरेशन’च्या भविष्यातील ध्येयांबद्दल बोलत असताना ’ठेका कॉर्पोरेशन’ला येत्या काही काळात १५ दिवसांत घर बांधून ते ग्राहकाच्या हवाली करण्याचे ध्येय आहे. म्हणजे १५ दिवसांत घर बांधून पूर्ण करायचे आणि असे पूर्ण करण्याचे की, १६व्या दिवशी ग्राहक सामानासह त्या घरात राहण्यास सुरुवात करू शकतो. इतकी तयारी ‘ठेका कॉर्पोरेशन’ला करायची आहे. हेच ‘ठेका कॉर्पोरेशन’चे पुढचे ध्येय आहे. त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरु आहे आणि येत्या काही काळातच ते हे ध्येय साध्य करतील, असा विश्वास प्रसाद यांना आहे.
बांधकाम व्यवसायासारख्या एका अत्यंत परंपरागत व्यवसायात स्वतःच्या नावीन्यपूर्ण कल्पनांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार्या ‘ठेका कॉर्पोरेशन’च्या प्रसाद यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
हर्षद वैद्य