नवी दिल्ली : शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशाच्या प्रमुखांच्या २२ व्या शिखर परिषदेस उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उझबेकिस्तानमधील समरकंद येथे रवाना झाले. या परिषदेत महत्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्याविषय़ी परराष्ट्र मंत्रालयातर्फे माहिती देण्यात आली. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले, यजमान देशासोबतच्या त्यांच्या द्विपक्षीय चर्चेव्यतिरिक्त, पंतप्रधान इतर नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग अतिशय महत्वाचा असल्याचे क्वात्रा यांनी सांगितले. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी उपस्थित राहणार आहेत. समरकंदमधील रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्जिओयेव यांच्याशी त्यांची द्विपक्षीय बैठक होण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये भारत – रशिया सहकार्याविषयीदेखील चर्चा होणार आहे.
शिखर परिषदेत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे, शांघाय सहकार्य परिषदेतील सुधारणा आणि विस्तार, प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती, सहकार्य, दळणवळण मजबूत करणे, व्यापार व पर्यटनाला चालना देणे या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित असल्याचे परराष्ट्र सचिव क्वात्रा यांनी सांगितले. त्याचप्रमाणे समरकंद घोषणापत्र आणि अन्य दस्तऐवजांना अंतिम स्वरूपही परिषदेत दिले जाऊ शकते. शांघाय सहकार्य परिषदेच्या सचिवालयाचे महासचिव आणि प्रादेशिक दहशतवादविरोधी संरचनेचे (आरएटीएस) संचालकदेखील शिखर परिषदेस उपस्थित राहतील, असेही क्वात्रा यांनी सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर परिषदेत चर्चा होणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तान दौऱ्यास रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयातर्फे निवेदन जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिरझीयोयेव यांच्या निमंत्रणावरून मी, शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी समरकंदला भेट देणार आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्यास तसेच शांघाय सहकार्य संघटनेच्या विस्ताराबाबत आणि संघटनेतील बहुआयामी आणि परस्पर लाभदायक सहकार्य अधिक सखोल करण्याबाबतच्या चर्चेसाठी मी उत्सुक आहे.
उझबेकिस्तानच्या अध्यक्षतेखाली व्यापार, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मी समरकंदमध्ये राष्ट्राध्यक्ष मिर्झीयोयेव यांना भेटण्यासाठी देखील उत्सुक आहे. २०१८ मधील त्यांची भारत भेट माझ्या आजही स्मरणात आहे. २०१९ मध्ये व्हायब्रंट गुजरात परिषदेला त्यांनी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहून गौरवले होते. याशिवाय, शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या इतर काही नेत्यांसोबत मी द्विपक्षीय बैठका घेईन.