अनंत करमुसे मारहाण प्रकरण - 'त्या' तीन पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा दणका

न्यायालयाचा अवमान केल्याचा पोलिसांवर ठपका

    14-Sep-2022
Total Views |
avghhd
  
ठाणे : ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे यांना बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह या कृत्यात सहभागी असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्याना महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली होती. या प्रकरणाची सुनावणी ८ सप्टेंबर २०२२ रोजी होऊन यात आव्हाड यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने मानवाधिकार आयोगाकडे स्पष्टीकरण सादर केले.मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष्य केले.तेव्हा, स्पष्टीकरण देण्यात कुचराई करणाऱ्या तिन्ही पोलिसांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे. त्यानुसार,आयोगाचे सदस्य एम.ए.सय्यद यांनी त्या पोलिसांविरोधात आदेश बजावले आहेत.
 
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील कावेसर भागात राहणारे अभियंता अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० रोजी तत्कालीन ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टीप्पणी केल्याच्या रागातुन आव्हाड यांचे पोलीस अंगरक्षक आणि कार्यकर्त्यांनी करमुसे यांना घरातुन उचलुन आव्हाड यांच्या नाद बंगल्यावर नेले होते. तसेच,आव्हाड यांच्या उपस्थितीत अंगरक्षक व कार्यकर्त्यांनी करमुसे यांना अमानुषरित्या बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी करमुसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर,आव्हाड यांच्या स्वीय सहायकासह सहा कार्यकर्त्याना अटक केली होती.मात्र, पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली होती.
त्यानंतर उच्च न्यायालयाच्या बडग्याने तब्बल दीड वर्षानंतर दि.१४ ऑक्टो.२०२१ रोजी सायंकाळी वर्तकनगर पोलिसांनी आव्हाड यांना अटक करून त्यांची जामिनावर मुक्तता केली होती.या अटकनाट्याची गंधवार्ताही पोलिसांनी तक्रारदार तसेच माध्यमांना न दिल्याने पोलिसांच्या भूमिकेवर त्यावेळी संशय देखील व्यक्त झाला होता.तर, ५ ऑक्टो.२०२१ रोजी अटक केलेल्या तिघा पोलिसांची विभागीय चौकशी करून त्यांची उचलबांगडी थेट नियंत्रण कक्षात केली होती.
दरम्यान, करमुसे यांनी याबाबत महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली होती. त्यानुसार,आ. जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले.मात्र, पोलीस कॉन्स्टेबल सागर तुषार मोरे, पोलिस नाईक सुरेश आवाजी जनाठे आणि पोलीस हवालदार वैभव शिवाजी कदम यांनी मानवाधिकार आयोगाच्या नोटीशीचा अव्हेर केल्याने आयोगाने त्यांच्याविरोधात कंटेप्ट ऑफ कोर्ट चा ठपका ठेवला आहे.
करमुसे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल
 
तत्कालीन ठाकरे सरकारमधील मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह छायाचित्र फेसबुकवर प्रसारित केल्याप्रकरणी अभियंता अनंत करमुसे यांच्याविरोधात वर्तकनगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने करमुसे यांच्याविरोधात आव्हाडांचे अर्धनग्न छायाचित्र सोशल मिडियात प्रदर्शित केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे,दोन वर्षापुर्वी करमुसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
आव्हाडांकडुन आयोगाची दिशाभूल
 
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सादर केलेल्या स्पष्टीकरणात आ. आव्हाड यांच्याकडुन दिशाभूल करणाऱ्या अनेक बाबींचा उल्लेख असल्याचा दावा अनंत करमुसे यांनी केला आहे. वारंवार सहकार्य करून देखील मला तसेच कुटुंबाला पोलिसांकडुन नाहक त्रास दिला जातो. आजपावेतो १४ वेळा समन्स बजावण्यात आले. आपणास मारहाण केलेल्या गुन्हयाची चार्जशीट दाखल करताना त्यात आ. आव्हाड यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करमुसे यांनी केला आहे.