"शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणारच" : एकनाथ शिंदे

    14-Sep-2022
Total Views |

shinde
मुंबई: शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने महापालिकेकडे अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबर रोजी वांद्रे येथे शिंदेंनी बैठक घेतली. या बैठकीत दसरा मेळाव्यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
 
मेळावा यशस्वी करण्याच्या दृष्टीने शक्तीप्रदर्शन या विषयावरही चर्चा झाली. या बैठकीनंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. "आमचा दसरा मेळावा होणारच. पण ठिकाण अद्याप अंतिम झालेले नाही," असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवाजी पार्क मिळाले नाही तरी दसरा मेळावा घ्यायची तयारी शिंदे गटाने सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानाचाही विचार सुरू आहे.
  

शिवाजी पार्क दोन्ही गटासाठी का महत्वाचा?
 
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या शिवाजी मैदानावर आजवर शिवसेनेलाच दसरा मेळाव्याची परवानगी मिळत आलेली आहे. शिवाजी पार्कवर इतर राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाही. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांपैकी कोणत्या एका गटास परवानगी मिळणार? अथवा दोघांनाही परवानगी मिळणार नाही. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये खलबतं सुरु झाली आहेत.