लोककलेचा वारसा जपणारा यशराज कला मंच!

    13-Sep-2022   
Total Views |
yashraj

 
डोंबिवली आणि लोककला म्हटली की, सर्वाच्या डोळ्यांसमोर येते ती फक्त लावणी. पण लोककलेतसुद्धा अनेक प्रकार येतात. सध्या लोककलेचे स्वरूप बदलत चाललेले असून तिचे मूळ स्वरूपात सर्वासमोर राहावी, यासाठी कायम प्रयत्नशील असणारे ठाणे जिल्ह्यातील संपूर्णपणे लोककलेला वाहिलेल्या ‘यशराज कला मंच’ संस्थेचा कलाक्षेत्रातील प्रवास जाणून घेऊया.
 
शराज कला मंच’ ही संस्था १९९५ साली स्थापन करण्यात आली. डोंबिवलीतील लोककलाकार विवेक विनायक ताम्हनकर यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. लोककला जीवंत राहावी, यासाठी विवेक ताम्हनकर नेहमीच प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून चित्रकला, अभिनय, गायन अशा विविध कलादर्शन स्पर्धा तसेच, आपली लोककला, लोकसंस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये लोकनृत्य कार्यशाळा, लोकनृत्यांचे विविध उपक्रम इत्यादी लोकवाद्य, लोकसंगीत यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी ‘यशराज’ ही ठाणे जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे.
 
 
कल्याण-डोंबिवली तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात विविध सामाजिक तसेच विविध लोककला उपक्रमांत अग्रेसर असणारी ही संस्था आहे. संस्थेने स्थापनेपासून विविध उपक्रम आखून तसेच शहरातील सामाजिक, शैक्षणिक विविध उपक्रमांत आपला सहभाग नोंदवून आपली प्रगती करीत आहे. ओडिशा, आग्रा, जयपूर, आसाम राज्यांतील, तसेच राष्ट्रीय स्तरांवरील नृत्य, नाट्य, संगीत स्पर्धेत संस्थेच्या कलाकरांनी अनेक बक्षिसे पटकावून महाराष्ट्राचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकत ठेवला आहे.
 
 
त्याचाच परिपाक म्हणून एका खासगी मराठी वाहिनीवरील सादर झालेल्या केदारशिंदे दिग्दर्शित तसेच अनेक मान्यवर कलाकार ज्यात सहभागी होते, अशा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात ‘यशराज’चेही कलाकार सहभागी होते. या संस्थेतून रंगमंचावर पदार्पण केलेले स्नेहा चव्हाण, स्वप्नाली पाटील, शाल्मली टोळ्ये, पल्लवी टोळ्ये असे अनेक कलाकार आज सिनेक्षेत्रात नाव कमावत आहेत. सौरभ सोहोनी निवेदन व नाट्यक्षेत्र, तर युवराज ताम्हनकर, विराज सोने हे कलाकार नाट्य व लोककला क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘यशराज’चे अनेक कलाकार विविध क्षेत्रांत रंगमंच गाजवत आहेत. या सर्वांचा संस्थेला अभिमान असल्याचे संस्थेचे संस्थापक विवेक ताम्हनकर सांगतात.
 
 
२०१६ पासून संस्थेतर्फे ‘पद्मश्री’ शाहीर साबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्पर्धा आणि उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘पद्मश्री’ शाहीर साबळे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाने घेतले जाणारे नाव आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची संपूर्ण जगाला खर्‍या अर्थाने ज्यांनी ओळख करून दिली, महाराष्ट्राच्या लोककलेचा सातासमुद्रपार झेंडा ज्यांनी रोवला, ज्यांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाद्वारे विविध लोकनृत्यांची संपूर्ण जगाला सर्वप्रथम ओळख करून दिली, असे ’पद्मश्री’ शाहीर कृष्णराव साबळे. गायन, वादन, अभिनय या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचा हातखंडा होता.
 
 
अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या स्मृती जाग्या राहाव्यात, या उद्देशाने ‘यशराज’तर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. लोककलावंतांनी स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे अगदी शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत समाजाच्या जडणघडणीत आपले महत्त्वाचे योगदान दिले आहे. या समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेने पदरचे पैसे खर्च करून या लोककलावंतानी समाजाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे. म्हणूनच या लोककला क्षेत्रात ज्या कलाकारांनी आपले आयुष्य वेचले, अशा ज्येष्ठ कलाकराला ‘पद्मश्री’ शाहीर कृष्णराव साबळे ‘लोकगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. पहिल्या वर्षी ‘शोध नव्या शाहिराचा’ या विविध शाहिरांच्या लोकगीतांवर आधारित लोकगीत गायनाच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
 
 
सांगली, सातारा, नाशिक, अहमदनगर अशा ठिकाणांहून मोठ्या उत्साहाने स्पर्धक स्पर्धेत सहभागी होतात. दुसर्‍या वर्षी संस्थेतर्फे राज्यस्तरीय खुल्या लोकनाट्य स्पर्धेचे आयोजन दि. २४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, औरंगाबाद, अलिबाग, रत्नागिरी अशा सात ठिकाणी प्राथमिक फेरी घेऊन तेथील प्रथम क्रमांकांच्या संघांची महाअंतिम फेरी मान्यवरांच्या उपस्थितीत डोंबिवली येथे उत्साहात पार पाडली होती. लोककला हे जनजागृतीचे खूप मोठे महत्त्वाचे साधन आहे. ‘मनोरंजनातून प्रबोधन’ हे तर या लोककलांचे वैशिष्ट्यच आहे. तिसर्‍या वर्षी महाराष्ट्राची अस्सल ओळख म्हणता येईल, अशा लावणी स्पर्धेचे आयोजन दि. २३ नोव्हेंबर, २०१८ रोजी डोंबिवली येथे करण्यात आले होते.
 
 
उपक्रमाच्या चौथ्या वर्षी ‘लोकवाद्य’ हा विषय घेऊन आपल्या अस्तगत चाललेल्या लोकवाद्यांना संजीवनी मिळावी, या उद्देशाने लोककलावंतांचा ‘लोकवाद्य’ वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. २०२० व २०२१ या संपूर्ण जगाला भीतीच्या गडद छायेत लोटणार्‍या ‘कोविड’च्या काळात दोन वर्षे हा उपक्रम होऊ शकला नाही. पण पुन्हा एकदा जोमाने संस्था कामाला लागलेली आहे. यावर्षी ’लोकनृत्य’ हा विषय घेऊन पाचव्या ‘लोकगौरव पुरस्कारा’चे आयोजन संस्थेने केले आहे. यानिमित्ताने डोंबिवली परिसरातील विविध शाळांचा सहभाग असलेला पारंपरिक लोकनृत्यांचा कार्यक्रम व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकनृत्य कलाकार व नृत्यदिग्दर्शक अरविंदकुमार रजपूत यांचा ‘लोकगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
 
 
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, उपक्रमाचे हे यशस्वी पाचवे वर्ष म्हणून डोंबिवलीतील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पाच व्यक्तींचा विशेष गौरव केला जाणार आहे. संस्थेने यंदाच्या वर्षी ‘पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे लोकगौरव पुरस्कार सोहळा, डोंबिवली’ येथे ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद पवार, राधाबाई साबळे यांच्या उपस्थितीत मोठ्य दिमाखात आयोजित केला. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकनृत्य कलाकार व लोकनृत्य दिग्दर्शक अरविंदकुमार रजपूत व पुष्पलता रजपूत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
 
तसेच ‘यशराज गौरवरत्न पुरस्कारा’ने प्रवीण दुधे यांना ‘समाजरत्न’, अंकुर अहेर यांना ‘क्रीडारत्न’, वैद्य परीक्षित शेवडे यांना ‘वैद्यकीयरत्न’, उमेश पांचाळ यांना ‘कलारत्न’, सोनाली वाघेला यांना ‘शिक्षकरत्न’ पुरस्करांनी सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेने आतापर्यंत संगीतकार देवदत्त साबळे यांच्या हस्ते शाहीर कृष्णकांत जाधव, दुसर्‍या वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते वसंत अवसरीकर, तृतीय वर्षी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद रमेश कदम यांच्या हस्ते मंगल लहू जावळे, चौथ्या वर्षी ज्येष्ठ लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते शिवाजी थोरात यांना आणि ज्येष्ठ पत्रकार व संपादक ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते सुभाष खरोटे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
लहान मुलांसाठी ‘नृत्याकुंर’ कार्यक्रम ते घेतात, जेणेकरून लहान मुलांना सादरीकरणातील बारकावे लक्षात यावेत, हा त्यामागील हेतू होता. बालगीत, लोकगीत असे लहान मुलांसाठी कार्यक्रम होत असतात. ‘हे तर देवाघरचं देणं’ या कार्यक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विवेक ताम्हनकर यांनी सांगितले.
 
लोककला कशी आहे? ’तारपा नृत्य’ हे संगीतावर करायचे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विवेक यांच्या अकादमीतून विद्यार्थ्यांना मिळतात. मंचावर लोककला आकर्षक वाटण्यासाठी त्यात काही बदल केले तरी मुलांना तिचे मूळ स्वरूप कसे आहे, हे माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी विवेक सतत प्रयत्नशील असतात. लोककलेसाठी एखादी वास्तू तयार होण्याची गरज आहे. जेणेकरून सर्व ज्येष्ठ लोककलावंत एका ठिकाणी येतील. एखाद्या संस्थेला सभागृहाचे भाडे परवडत नाही. त्यामुळे वास्तू असावी. लोककलेची पुस्तके असलेले ग्रंथालय असावे, अशी विवेक यांची इच्छा आहे.
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.