रिक्षा, सुरक्षा आणि नौटंकी

    13-Sep-2022   
Total Views |
aravind kejriwal
 
 
 
सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीचा कारभार वाऱ्यावर सोडून गुजरात दौर्यावर आहेत. दौरा करायला कुणाची ना नाही. परंतु, तिथे जाऊन शांत बसतील ते केजरीवाल कसले. केजरीवाल म्हटलं की, गडबड, गोंधळ होणारच. नुकतेच ते आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचारासाठी अहमदाबादमध्ये आले होते. त्यावेळी स्थानिकांशी झालेल्या भेटीदरम्यान, त्यांनी अगदी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणेच घरी जेवायला येण्यासाठी एका रिक्षा चालकाने दिलेले आमंत्रण स्वीकारले.
 
 
केजरीवालांना गुजरातमधील अन्य दोन नेत्यांसह रिक्षामधून चालकाच्या घरी जेवणाला जायचे होते. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव अहमदाबाद पोलिसांनी त्यांना रिक्षामध्ये न जाण्याचे आवाहन केले आणि केजरीवाल चक्क पोलिसांवरच भडकले. नुसते भडकलेच नाही, तर हुज्जत घालण्यास सुरुवात केली. केजरीवाल पोलीस अधिकार्यांना म्हणाले, “मला अशी सुरक्षा नको आहे. सुरक्षेच्या नावाखाली पोलिसांना अटक करायची आहे. आम्हाला सुरक्षा नको आहे. आम्हाला लोकांना भेटायचे आहे.
 
 
तुमच्या ‘प्रोटोकॉल’ने जनतेला नाखूष ठेवले आहे.” तेव्हा, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्यासाठी पोलिसांच्या दोन गाड्या रिक्षामागे गेल्या. रिक्षामध्ये केजरीवालांसोबत एक पोलीस अधिकारी होता. खेदजनक बाब म्हणजे केजरीवालांसह आपचे तीन नेते रिक्षाच्यामागील सीटवर बसले होते, त्यामुळे पोलीस अधिकार्याला ड्रायव्हरसोबत अत्यंत धोकादायक स्थितीत बसावे लागले. परंतु, केजरीवालांच्या या नौटंकीमुळे त्यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघडा पडला. कारण, आम आदमी पक्षानेच केजरीवालांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त करत गुजरात पोलिसांकडून संरक्षण मागणारे पत्र एप्रिल २०२२ मध्ये लिहिले होते.
 
 
जेव्हा केजरीवालांनी गुजरातमध्ये आपला निवडणूक प्रचार सुरू केला, तेव्हा आपच्या गुजरात शाखेने त्यांच्यासाठी संरक्षणाची मागणी केली होती. त्यामुळे आधी स्वतःच सुरक्षा मागायची आणि नंतर संरक्षण नको म्हणत बोंबाबोंब करायची, हा प्रकार केजरीवालांना शोभनीय नाही. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी केजरीवालांचा हा खटाटोप संतापजनक आहे. सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करून आणि अण्णा हजारेंच्या तत्वांना हरताळ फासून राजकारण करणार्या केजरीवालांकडून दुसरी कोणती अपेक्षा नाहीच म्हणा!
 
काँग्रेसकडून क्रांतिकारकांचा अपमान
 
भारत जोडण्याच्या प्रयत्नात भारत तोडण्याच्या आणि भडकावण्याच्या उद्देशाने निघालेली ‘भारत जोडो यात्रा’ सातत्याने वादाच्या भोवर्यात सापडत आहे. ६० पेक्षा अधिक सर्वसोईसुविधायुक्त कंटेनरमध्ये राहुल आणि त्यांचे काँग्रेसी सहकारी ‘भारत जोडण्या’च्या मोहिमेवर निघाले आहेत. आजही नेहरू आणि गांधी घराण्यानेच देशासाठी सर्व काही केले, असे वातावरण काँग्रेस तयार करत आहे. परंतु, २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि देशासह अनेक महान राष्ट्रपुरूषांची आणि त्यांनी भारतभूला दिलेल्या बलिदानाची किंमत देशाला समजली.
 
 
असो. सध्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पाद्री जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेतली आणि नवा वाद सुरू झाला. यावेळी या पाद्रीने येशू हाच खरा देव असल्याचे सांगत हिंदू देवदेवतांना काल्पनिक ठरवले. त्यावेळी स्वतःला ‘जनेऊधारी’ म्हणत देवदेवळांचे दौरे करणारे राहुल गांधी मात्र शांत बसले. गांधी भारत जोडायला निघाले आहे की, हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याकरिता निघाले आहेत, हाच खरा प्रश्न. त्याचप्रमाणे, केरळमधील केई मेमन आणि पद्मश्री पी. गोपीनाथन नायर या क्रांतिकारकांच्या स्मारकाचे अनावरण तिरुअनंतपुरमच्या ‘एनआयएमएस’ हॉस्पिटलमध्ये होणार होते.
 
 
क्रांतिकारकांच्या परिवाराच्यावतीने केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख सुधाकरन यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. पण, युवराज राहुल काही या कार्यक्रमाला पोहोचलेच नाही. त्यामुळे नाईलाजास्तव बिचार्या प्रदेश काँग्रेसचे प्रमुख सुधाकरन यांनी या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. आपल्या नेत्याच्या चुकीमुळे सुधाकरन यांनी मागितली खरी, परंतु युवराजांचा निष्काळजीपणा पुन्हा समोर आला.
 
 
केवळ गरिबांसोबत फोटो काढून त्यांच्या केविलवाण्या चेहर्यांना फोकस करून प्रसिद्धी मिळेलही. परंतु, प्रसिद्धीने देश आणि पक्ष चालत नसतो. त्यासाठी तुमच्याकडे प्रगल्भता आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याची क्षमता हवी. तिकडे तीन-चार महिन्यांवर आलेल्या गुजरात विधानसभेसाठी केजरीवाल गुजरातेत बोंबाबोंब करत आहे आणि इकडे लोकसभेला अजून अवकाश असताना युवराज ‘भारत जोडो यात्रे’वर निघाले आहेत. परत गुजरामध्ये तोंडावर आपटले की मग आपला ‘बी टीम’ आणि भाजपवर इव्हीएम अफरातफरीचा आरोप करण्यास काँग्रेस मोकळीच!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.