मुंबई : "याकूब मेमनच्या कबरीचे उद्गतीकरण करणाऱ्यांचे हस्तक होण्यापेक्षा बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या, कलम ३७० हटविणाऱ्या, बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाणाऱ्या मोदी-शहांचे हस्तक होणं कधीही चांगलं आहे", असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोखठोकमधील टिकेला थेट प्रत्युत्तर दिले. पैठण येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती ? याचं उत्तर आजची विराट सभा आहे. ही पैशाने जमवलेली माणसं नाहीत ही माणसं प्रेमाने आले आहेत. ही सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. लोकांच्या भावना जाणून घेत आपल्याला काम करण्याचं आहे. हे तुमच्या मनातील सरकार हे शिवसेना भाजप युतीचे सरकार आम्ही स्थापन केले. प्रत्येकाला वाटतं आहे की हा आपला माणूस आहे. हा मुख्यमंत्री आपल्यातील आहे. सकाळी ४ वाजता रस्त्याच्या दुतर्फा लोक पैसे देऊन थांबतात का? मात्र या महाराष्ट्राच्या भल्यासाठी घेतलेल्या निर्णयाला जनतेने पसंती दिलीय. माझ्यामध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोणतेही अंतर नाही. जेव्हा माणूस आपल्यातील वाटतो तेव्हाच माणसं आमच्यापर्यंत येतात,
सुप्रिया सुळे आणि अजितदादांचा घेतला समाचार
पुढे एकनाथ शिंदे म्हणतात, काही लोक म्हणतात मुख्यमंत्री भलत्या गाठीभेटी घेत आहे. मी कालपर्यंत त्यांच्यापर्यंत जात होतो आजही जाणं माझं कर्तव्य आहे. माझ्यातील कार्यकर्ता कदापि मरून देणार नाही. अजितदादा सकाळी ६ वाजता उठून काम करायचे. आधी दादा टीका करायचे आता तरीही टीका करत आहे. टीका करणं हा विरोधकांचा धंदा आहे. ताईंना मी माहिती देतो की हा एकनाथ सकाळी ६ पर्यंत जनतेसाठी काम करतो. या कामात कुठलाही खंड मी पडू देणार नाही. टीका करणाऱ्याला कसली चिंता आहे? त्यांना २ मुख्यमंत्र्यांची सवय आहे. त्यांचा रिमोट कंट्रोल आम्ही काढून घेतला आहे म्हणून त्यांची अडचण झाली आहे, असा टोला त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना लगावला.
बाळासाहेब आणि हिंदूंशी प्रतारणा करणारे कोण?
आता बाळासाहेबांची शिवसेना कोण? शिवसेना भाजप युती म्हणून आपण निवडणूक लढवली. लोकांनी युती म्हणून मतदान केलं. दुर्दैवाने आपण करायला नको ते केलं. लोकांशी बेईमानी कोणी केली? जनतेचा विश्वासघात कोणी केला? बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा, हिंदूंशी प्रतारणा कोणी केली याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा खोचक टोलाही शिंदेंनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला.
देशद्रोह्यांचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचे होणं चांगलं
पुढे शिंदेंनी सामनातील रोखठोक सदरातील टीकेचा समाचार घेत शिंदे म्हणाले, रोखठोक मधून हिंमत असेल तर आज मुंबईतील मराठी माणूस किती राहिला? याची आकडेवारी जाहीर करावी. फक्त निवडणूक आली की मराठीचा मुद्दा पुढे करायचा. पुढील रोखठोक मधून मुंबईतील मराठी माणूस किती टक्के राहिला याचं विश्लेषण करावं. आधी मतांसाठी मराठी माणसाचा वापर करायचा नंतर दुसऱ्यांवर खापर फोडायचं. एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे आहेत. पण याच साबणाने तुमची मस्तक धुलाई केली हे लक्षात ठेवा. याकूब मेमनच्या कबरीचे उद्गतीकरण करणाऱ्यांचे आणि देशद्रोह्यांचे हस्तक होण्यापेक्षा बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या, कलम ३७० हटविणाऱ्या, बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाणाऱ्या मोदी-शहांचे हस्तक होणं कधीही चांगलं आहे. पुढच्या येणाऱ्या निवडणुकांत शिवसेना-भाजप युतीचे २०० आमदार निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा इशाराही शिंदेंनी यावेळी उद्धव ठाकरेंना दिला.