बीज वाढवावे नाम : संतसाहित्याचे धर्माधिकारी!

    12-Sep-2022   
Total Views |
DHARMADHIKARI
 
 
भारतीय संतसाहित्याचा आणि संस्कृती-धर्मशास्त्राचा व्यासंगी कार्यप्रवीण अभ्यासक असा लौकिक असणारे डॉ. प्रशांत धर्माधिकारी. त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
मुंबई आकाशवाणीवर ‘ज्ञानेश्वरीतील संवादकौशल्य’ या विषयावर पाच भागांत व्याख्यान देणारे डॉ. प्रशांत धर्माधिकारी. संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असणारा वक्ता, श्रोता तसेच संवाद प्रक्रिया, प्रतिक्रिया वगैरे विषयांवर डॉ. प्रशांत यांनी थक्क करणारे व्याख्यान केले होते. आधुनिक काळात संवाद कौशल्याच्या संदर्भात ज्ञानेश्वरीचा भावार्थ मांडणे ही एक बौद्धिक कसोटी.
 
 
तत्त्वज्ञान आणि धर्मसंस्कृती, साहित्याचा विशेष त्यातही सर्वांगीण अभ्यास असल्याशिवाय हे शक्यच नाही. पण, संस्कृत आणि प्राकृत साहित्य, अगदी परंपरांसह जीवनाच्या सूत्राचे आधारभूत असलेल्या डॉ. प्रशांत यांना हे सहज शक्य झाले. भारतीय विचार विमर्षामध्ये समरसता हा प्राण आहे. समाजात समरसता प्रस्थापित व्हावी, सर्व भेद विसरून भारतीयत्वाच्या बंधाने सर्व एकत्र यावेत, या जीवनमंत्रासाठी डॉ. प्रशांत सातत्याने कार्य करतात.
 
 
विश्व हिंदू परिषदेच्या सामाजिक समरसता आयामात ते कार्यशील आहेत. ते जोशी-बेडेकर महाविद्यालयात इंग्रजी भाषा व साहित्याचे प्राध्यापक असून शासनाच्या मराठी विश्वकोशात इंग्रजी साहित्य विभागात लेखक म्हणूनही ते नियुक्त आहेत. ‘विद्या प्रसारक मंडळा’च्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज व लंडन अभ्यास दौर्यासाठी तीनवेळा त्यांची निवड झाली. क्योटो सांगयो विद्यापीठ, ओसाका विद्यापीठ, जपानच्या अभ्यास दौर्यात ते सहभागी झाले होते.
 
 
‘विद्या प्रसारक मंडळा’चे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्र मंडळ, लंडन येथे दि. २८ मे, २०१९ रोजी ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची काव्यप्रतिभा’ कार्यक्रम सादर केला, तर इंग्लंडमध्ये ‘उपनिषदांचे पाश्चात्य अभ्यासक’ या विषयावर मे २०१८ मध्ये दोन व्याख्यानेही दिली. असे शैक्षणिक क्षेत्रातले अतिशय व्यासंगी आणि समरस वृत्तीचे, बुद्धिवादी, समाजशील व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. प्रशांत धर्माधिकारी.
 
 
लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कारेपूर खेड्यातील पुरुषोत्तम आणि सरस्वती यांना सात अपत्ये. त्यापैकी शेंडेफळ असलेले प्रशांत. पुरुषोत्तम हे वारकरी आणि शेतकरी, तसेच उत्तम कीर्तनकारही आहेत. कारेपूर खेड्याच्या अवतीभवतीच्या किमान १५ खेड्यांमध्ये त्यांचे स्नेहाचे संबंध. धर्माधिकारी कुटुंबांचे घर म्हणजे गावकर्यांचे हक्काचे घर. इथे जातपातभेदाला थारा नव्हता. आपण सगळे बांधव आहोत. एकमेकांच्या सुखदु:खात धावून गेले पाहिजे, अशी पुरुषोत्तम यांची मुलांना शिकवण असे. प्रशांत यांनी लहानपणी ठरवले की, आपण कीर्तनकार व्हायचे.
 
 
संपूर्ण भगवद्गीता कंठस्थीकरणाकरिता ‘श्रुंंगेरीपीठा’च्या शंकराचार्यांच्या हस्ते त्यांचा गौरवही झाला. संस्कृत भाषेच्या पदव्य्ाुत्तर परीक्षेत ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्रथम आले आणि ‘वासुदेव शास्त्री पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले. घरची आर्थिक परिस्थिती यथातथाच होती. मात्र, धार्मिक आणि नैतिक संस्काराने श्रीमंत होती. धर्माधिकारी कुटुंबाने गरिबीची किंवा नसलेल्या गोष्टीची कधी खंत बाळगली नाही.
 
 
जे आहे, ते परमेश्वराचे आहे. आपण सन्मार्गाने चालत राहावे बस्स! तेच संस्कार प्रशांत यांच्यावरही झाले. चौथीपर्यंत ते गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. पुढे मोठे भाऊ डॉ. व्यंकट यांनी त्यांना रा. स्व. संघाच्या सावरकर संकुलामध्ये शिक्षणासाठी पाठवले. येथे नित्यनियमाने संघाच्या शाखा भरत. इथे सागर नाझरकर, धीरज घाटे, गिरीश कुबेर हे संघ प्रचारक येत. त्यांचे वागणे-बोलणे आणि देश-धर्म-समाजासाठी सर्वस्व अर्पून समाजकार्य करण्याची तळमळ पाहून प्रशांत यांच्यात आमूलाग्र बदल झाला.
 
 
गरजा कमी करून विचार आणि कार्य वाढवावे, अशी शिकवण या सगळ्यांकडून त्यांना मिळाली. भारतीय संस्कृती आणि साहित्य याची थोरवी महान असून जागतिक पटलावर त्याचे अस्तित्व उमटायलाच हवे, अशी प्रेरणा त्यांच्यात निर्माण झाली. त्यामुळेच पुढे प्रशांत यांनी इंग्रजी व संस्कृत अशा दोन विषयात एम.ए केले. इंग्रजीत ‘सेट’ व ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण होऊन, पुण्याच्या ‘रानडे परकीय भाषा विभागा’तून ‘फ्रेंच’ भाषेची पदविका प्राप्त केली.
 
 
तसेच ‘कम्पॅरिटीव्ह मायथोलॉजी‘ या विषयावर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ‘पौराणिक वाड्.मय आणि भारतीय इंग्रजी कादंबरी’ या विषयावर त्यांनी पीएच.डीही केली. ते सध्या जपानी भाषा शिकत आहेत. मराठी गझल काव्यावर प्रभुत्व यावे, यासाठी त्यांनी उर्दू भाषेवरही प्रभुत्व मिळवले. कुराण आणि बायबलचा सध्या ते अभ्यास करत आहेत. ‘सामाजिक समरसता’मध्ये संतांचे योगदान यावर त्यांचे संशोधन सुरू आहे.
 
 
इतकेच काय, ‘चित्रपट रसास्वाद’ हा अभ्यासक्रमही ते चालवतात. इंग्रजी आणि इतर जागतिक भाषांवर प्रभुत्व यासाठी मिळवले की इंंग्रजीचा पगडा असलेल्या नव्या पिढीला भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे ज्ञान इंग्रजीतूनच देता यावे. तसेच, जगभराच्या प्रमुख भाषेतील साहित्याचा, धर्मविचारांचा अभ्यास व्हावा आणि भारतीय विचारविमर्षामध्ये त्यांचा तौलनिक विचार करता यावा म्हणून. कोरोना काळात त्यांनाही कोरोनाने गाठले होते, पण त्यावर मात करत त्यांनी आपले दैवीकार्य सुरूच ठेवले होते.
 
 
त्यांंनी स्वत:चे ‘युट्यूब चॅनेल’ सुरू केले. कोरोना काळात त्यांनी आणि त्यांचे पिता पुरुषोत्तम यांनी मिळून संत एकनाथ यांच्या ‘भावार्थ रामायणा’चे वाचन आणि निरूपण असा कार्यक्रम सुरू केला. हजारो लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. अशाप्रकारे धर्मसंस्कृती क्षेत्रात खर्या अर्थाने अधिकारी असलेले डॉ.प्रशांत धर्माधिकारी. ते स्वत:च्या ध्येयकार्याविषयी म्हणतात,
 
धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन
हेचि आम्हा करणे काम,
बीज वाढवावे नाम...
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.