नवी दिल्ली : देशातील सर्वच शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास हा काही आपल्याला नवीन नाही. भटके कुत्रे चावल्यामुळे अनेक नागरिक दगावल्याची उदाहरणेही देशात असंख्य आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालायाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. भटके कुत्रे चावल्यास जे लोक या कुत्र्यांना खायला घालतात ते लोक जबाबदार धरले जातील आणि ज्या व्यक्तीला कुत्रा चावला आहे त्या व्यक्तीच्या उपचारांचा सर्व खर्च त्यांनाच करावा लागेल असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या लसीकरणासाठी जबाबदार धरले जाऊ शकते. असे मत न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणी सुनावणी देताना “मी देखील एक श्वानप्रेमी आहे. इथे इतर अनेक श्वानप्रेमी आहेत. मी विचार केला होता की जे लोक कुत्र्यांना खायला घालतात, त्यांना तसे करण्याची परवानगी दिली पाहिजे, ते संबंधित कुत्र्यांवर विशिष्ट नंबर किंवा चिन्ह ठेवू शकतात" अशी प्रतिक्रिया न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी दिली. भटक्या कुत्र्यांना खायला घालणे आणि निष्पाप नागरिकांचे रक्षण करणे यात समतोल साधण्याची गरज असल्याचे नमूद करीत न्यायालयाने याबाबत सरकारला सूचना केली.
जे लोक या भटक्या कुत्र्यांना खायला घालतात त्यांची जबाबदारीही उचलली पाहिजे. जर त्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला केला तर त्याच्या उपचारांचा खर्चही या त्यांना खायला घालणाऱ्या नागरिकांकडूनच वसूल करावा असे मत न्यायालयाने आपल्या निकालात नोंदवले आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर तरी ही भटक्या कुत्र्यांची समस्या संपेल अशी आशा आहे.