सिंधुदुर्ग: टस्कर हत्तीने मोठ्या प्रमाणात धुडगूस घालून केले अनेकांचे नुकसान!

    11-Sep-2022
Total Views |
 
elph
 
 
आंबोली: नांगरतास येथे एका टस्कर हत्तीने मोठ्या प्रमाणात धुडगूस घालून अनेक ग्रामस्थांचे नुकसान केले आहे. रात्रभर दहशत घातल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
 
आंबोली परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टस्कर हत्तीने भर रस्त्यात पुन्हा दर्शन दिल्याने वाहनचालक घाबरला. बांदा केंद्रशाळेचे शिक्षक जे. डी. पाटील पत्नीसह येत असताना त्यांना याचे दर्शन झाले. या दाम्पत्याने त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. १० मिनिटे हत्ती ने तेथे वास्तव्य केले. त्यानंतर तो लगतच्या झाडीत गेला.
 
दरम्यान, हा हत्ती ऊस तसेच भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी भररस्त्यात येऊन गाड्यांना अडथळा करीत आहे. ८ सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास टस्कराने नांगरतास येथे अशोक गावडे व ओंकार गावडे यांच्या घराजवळ आणि तेथील शेतात धुडगूस घातला. दरवाजावरही सोंडेने थाप मारली.
 
 
elph
 
 
 
त्याने दुचाकी सोंडेने ओढत नेत त्यांच्या टेम्पोवर आपटली आणि दोन्ही गाड्यांचे नुकसान केले. यानंतर रात्री वन विभाग कर्मचाऱ्यांना बोलावल्यावर तासभराने त्या ठिकाणी पोहोचले. पहाटे चारपर्यंत त्याचा धुडगूस सुरू होता. गेले बरेच दिवस नांगरतास येथे बेळगाव-सावंतवाडी रस्त्यावरही तो दिसत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.