‘या’ कौतुकामागे दडलंय काय?

    11-Sep-2022   
Total Views |

bng
 
 
 
काही दिवसांपूर्वीच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतासह पंतप्रधान मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत भारत बांगलादेशचा सच्चा मित्र असल्याचे सांगितले होते. नुकत्याच त्या भारत भेटीवर आल्या होत्या. यावेळी भारत-बांगलादेशमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. तसेच, दोन्ही देशांच्या संबंधांना नवी बळकटी मिळाली. यानंतर आता अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही हसीना यांच्याप्रमाणेच भारताचे कौतुक केले.
 
 
ट्रम्प यांनी नुकत्याच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारत आणि अमेरिका सर्वात चांगले मित्र असल्याचे सांगितले. तसेच, भारताशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही माझे चांगले संबंध असून मोदी खूप चांगले काम करित आहेत. त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे ती अजिबात सोपी नाही. आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. ते खर्‍या अर्थाने एक चांगले व्यक्ती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
 
पुढे ते म्हणाले की, माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध अधिक मजबूत झाले. पंतप्रधान मोदी हे एक शानदार व्यक्ती असून त्यांच्या नेतृत्वात भारत अधिक पुढे जात आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्यावरही टीका करीत अर्थव्यवस्था सुस्त पडल्याचा आरोप केला. तसेच, अमेरिकेची प्राथमिकता ऊर्जा क्षेत्र असून त्यात अमेरिकेने आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, 2024 मध्ये होऊ घातलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही त्यांनी भाष्य करत, प्रत्येकाला वाटत आहे की मी आगामी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी.
 
 
अनेक सर्वेक्षणातही मी सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे लवकरच याविषयीचा निर्णय घेतला जाईल असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री संपूर्ण जग जाणून आहे. दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नातून भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत झाले होते. याच मैत्रीचे द्योतक म्हणून अमेरिकेत ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम संपन्न झाला. या रॅलीला ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी हे दोघेही उपस्थित होते. यादरम्यान भारतात ‘अबकी बार, मोदी सरकार’ ही घोषणा प्रचंड गाजली होती.
 
 
 
त्याचाच आधार घेत अमेरिकेत ‘अबकी बार, ट्रम्प सरकार’ ही घोषणा देण्यात आली आणि तीदेखील पुढे प्रचंड गाजली. ‘अबकी बार, ट्रम्प सरकार’ हा नारा अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा ठरला. पुढे ट्रम्प भारताच्या दौर्‍यावर आले होते. तेव्हा अहमदाबादमध्ये पार पडलेल्या भव्य कार्यक्रमातही पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला जगभरात माध्यमांनी मोठे कव्हरेज दिले होते.
 
 
दरम्यान, इतक्या दिवसांपासून चर्चेच्या परिघाबाहेर असलेले ट्रम्प अचानक चर्चेत आले आहेत. त्यांच्या फ्लोरीडातील घरी ‘एफबीआय’ने धाड टाकत घरातील अनेक कागदपत्रांची तपासणी केली. आण्विक कागदपत्रांच्या शोधात ‘एफबीआय’ने हा छापा टाकला असून त्यांच्यावर राष्ट्रपती भवनातून अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भारताच्या कौतुकामागे ‘एफबीआय’ने टाकलेल्या धाडी हे तर कारण नाही ना, असाही प्रश्न उभा राहतो. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी जोरदार प्रचार केला.
 
 
यात त्यांनी भारतीयांची मते त्यांच्या पारड्यात कशी पडतील, यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले. त्यात ते बर्‍यापैकी यशस्वीही झाले. परंतु, निवडणुकीच्या अवघ्या काही दिवसांआधी वातावरण फिरले आणि बायडन यांनी बाजी मारली. ट्रम्प यांनी अमेरिकेत उघडपणे इस्लामविरोधात भूमिका घेतली होती. त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे ते वादात सापडले होते. परंतु, असे असतानाही त्यांनी अमेरिकेतील उजव्या विचारसरणीला बळ देण्यासाठी मेहनत घेतली. आता 2024 मध्ये अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत असून ट्रम्प नक्कीच पुन्हा राष्ट्रपती होण्यासाठी इच्छुक असतील.
 
 
 
त्यामुळे ट्रम्प यांचे आव्हान आताच गुंडाळण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे या धाडींवरून दिसून येते. अमेरिकेत भारतीयांची संख्या अधिक असून त्यांची मतेही अनेक भागांमध्ये निर्णायक ठरतात. त्यामुळे, त्यांनी भारतावर आणि पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे. तसेच, जागतिक पटलावर भारताचे दिवसेंदिवस मजबूत होत चाललेले स्थान हेदेखील ट्रम्प यांच्या स्तुतिसुमनांचे महत्त्वपूर्ण कारण असू शकते.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.