जे जे मानवनिर्मित नाही, त्याला आपण ‘निसर्ग’ म्हणू शकतो. पाणी, हवा, अग्नी, पृथ्वी आणि आकाश ही तत्त्वे निसर्गात आढळतात. त्यांचे स्रोत वेगवेगळे आहेत. जसे नद्या, समुद्र, डोंगर, जमीन, सूर्य, झाडे जे जे आपल्याला आसपास डोळ्यांनी दिसते आणि दिसत नाही, त्या सर्वांचा मिळून निसर्ग तयार होतो, अशी एक व्याप्त व्याख्या निसर्गाची करता येईल. आता मानवी जीवन आणि निसर्ग यांचा संबंध आपण पाहूया.
निसर्गात वेगवेगळे ऋतू असतात, त्यानुसार आपल्या शेजारील वातावरण आणि हवामान बदलत असते. पाऊस पडतो, ऊन असते, थंडी जाणवते हे सर्व बदल जगण्यासाठी आवश्यकच आहेत.निसर्ग म्हणजे निखळ आनंद! असे असले तरीही प्रत्येक टप्प्यात निसर्गात होणारे बदल अक्षरशः थक्क करून टाकणारे असतात. आपण निसर्गातील जे वेगळेपण पाहिलेय, अनुभवलेय ते वाचकांपर्यंत पुस्तक रुपाने यावे यासाठी लेखक जितेंद्र पराडकर यांनी खर्या अर्थाने निसर्गाला साद घातली आहे.
जे. डी. पराडकर हे 30 वर्षे पत्रकारिता करताना ठरावीक कालावधीनंतर कथा, लेख लिहिण्याकडे अधिक लक्ष देऊ लागले. वाचकांना नेहमीच काहीतरी वेगळं असं वाचायला देताना निसर्गाकडे पाहाण्याची लेखकाची नजर बदलली आणि त्यांनी निसर्गाच्या प्रत्येक ऋतू बदलातील बारकावे टिपले. निसर्गावर लिहिताना लेखकाने नेहमीच पर्यावरणाच्या होणार्या र्हासाकडे वाचकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.निसर्ग मानवाला विविध प्रकारे इशारे देत असताना माणूस मात्र सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष करत असल्याने याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत, असे असले तरी निसर्गातील सर्व आनंददायी घटकांवर लेखन करावे, यासाठी लेखकाचे मन नेहमीच निसर्गाकडे धाव घेत असते.
लेखन करणे आता त्यांना सरावाने खूप सोपे वाटते. मात्र, हेच लेखन पुस्तक रुपाने वाचकांसमोर यावे, असा अनेक वाचकांचा सातत्याने आग्रह सुरू असल्याने लेखकाने 2014 साली ‘कवडसा’ हा पहिला कथासंग्रह स्वतः प्रकाशित करून छपाई आणि वितरण याचा अनुभव घेतला. परिणामी, नव्याने पुस्तक छपाई करण्याचे धाडस त्यांच्यात होत नव्हते. अखेरीस त्यांच्या लेखनाचे मनापासून कौतुक करणार्या ‘कालनिर्णय’च्या जयेंद्र साळगांवकर यांनी त्यांना पुणे येथील ‘चपराक प्रकाशन’च्या घन:श्याम पाटील यांच्याकडे पाठविले. ‘चतुरस्र’, ‘परखड’, ‘रास्त’, ‘कर्तव्यदक्ष’ या चार अर्थपूर्ण शब्दांच्या पहिल्या अक्षरातून घन:श्याम पाटील यांनी ‘चपराक प्रकाशन’ची स्थापना केली. जी व्यक्ती प्रकाशनाचे नाव निवडतानाही एवढा खोलवर विचार करते, ती व्यक्ती किती चतुरस्र असेल, हे लक्षात आले. बोलण्यासह स्वभावातील नम्रपणा आणि लेखकाला सन्मान देणारे प्रकाशक म्हणून घन:श्याम पाटील यांची ओळख आहे. या व्यक्तीकडे असणारा स्पष्टवक्तेपणाही ‘चपराक’ची खरी ताकद. लेखकाचे नाव पाहून नव्हे, तर लेखनाचा दर्जा पाहून ‘चपराक’ पुस्तक प्रकाशित करते, असे धडधडीतपणे केवळ घन:श्याम पाटीलच सांगू शकतात. आमच्यासारख्या अनेक नवोदितांना ’चपराक’मुळे खरी ओळख मिळाली आहे.
लेखक जितेंद्र पराडकर ऊर्फ जे. डी. पराडकर यांचे लेख, कथा वाचल्यानंतर घन:श्याम पाटील यांनी ‘चपराक’ आपले केवळ एक नव्हे, तर पाच पुस्तके एकापाठोपाठ एक प्रकाशित करेल, हा शब्द पाटील सरांनी या लेखकाला सर्वांसमोर दिला.लेखन करणार्या व्यक्तीसाठी आपले सर्व साहित्य एकत्र होऊन वाचकांना वाचायला मिळणार याचा खूप आनंद मोठा असतो.पुस्तकाच्या छपाईत काहीतरी नावीन्य आणणे ही ‘चपराक’ची खासियत आहे . धाडसाने आजवर न झालेले प्रयोग करून एक नवा आदर्श समोर ठेवण्यासाठी घन:श्याम पाटील सतत अस्वस्थ असतात.
लेखन दर्जा मनासारखा असला की, प्रसंगी स्वतः खोट खाऊन पुस्तके प्रकाशित करणारा असा दुसरा संपादक मी पाहिला नाही. लेखकाचे निसर्गावर खास प्रेम आणि योगायोग पाहा- ‘चपराक’तर्फे पहिले पुस्तक ‘निसर्ग’विषयक लेखांवर आले. जी गोष्ट आपण अंतर्मनापासून करतो, त्याला हा असा न्याय मिळतो, असे लेखक पराडकर आवर्जून सांगतात. पुस्तकाचे मुखपृष्ठ, नाव ठरवणे यासाठी लेखकाला पाटील सरांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले. लेखकाचे स्नेही सतीश डिंगणकर यांनी पुस्तकाला ‘साद निसर्गाची’ हे नाव सुचवले आणि निसर्ग चित्रकार मित्र विष्णू परीट यांनी या पुस्तकाचे सुंदर मुखपृष्ठ तयार केले.
‘साद निसर्गाची’ हे निसर्ग विषयक लेखांचे जे. डी. पराडकर यांचे पुस्तक साहित्य क्षेत्रात एक वेगळा आयाम देणारे ठरत आहे.निसर्गविषयक असंख्य वाचकांची पुस्तकाची मागणी यानिमित्ताने पूर्ण होणार आहे. ‘चपराक प्रकाशन’ने ’साद निसर्गाची’ या पुस्तकाची अप्रतिम मांडणी केली आहे.
निसर्ग तसेच मानवी स्वभावाचे उत्तम निरीक्षण व आकलन करत जे. डी यांचे लेख या पुस्तकाद्वारे आपल्या भेटीस आले आहेत. हे पुस्तक म्हणजे निसर्गाचा उत्कट अलंकार आहे, याचाच अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.
-आशिष निनगुरकर
पुस्तक : साद निसर्गाची
लेखक : जे. डी. पराडकर
प्रकाशक : चपराक प्रकाशन
पृष्ठसंख्या : 150
मूल्य : 250 रुपये