‘प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’च्या माध्यमातून चीनची घुसखोरी!

    10-Sep-2022   
Total Views |

ch
 
 
या लेखामध्ये आपण ‘चिनी प्रायव्हेट कंपनी’ आणि ‘चिनी सेक्युरिटी कंपनी’वर आपले लक्ष केंद्रित करूया. त्यांचा वापर का केला जातो? आतापर्यंत त्यांचा वापर कुठल्या भागामध्ये केला गेला आहे? येणार्‍या काळामध्ये चिनी सेक्युरिटी कंपनीचा वापर अजून कुठे कुठे केला जाईल आणि सर्वांत महत्त्वाचे ‘चिनी सेक्युरिटी’ कंपनीचा प्रभाव आपल्या शेजारी राष्ट्रात कमी करण्याकरिता भारताने काय करावे?
 
 
अमेरिका, रशिया, चीनसारख्या विकसित राष्ट्रांना युद्धामध्ये किंवा युद्धजन्य व धोकादायक परिस्थितीमध्ये आपल्या सैनिकांचे झालेले मृत्यू आवडत नाही. त्या देशातील जनता सरकारवर दबाव टाकते की असे मृत्यू व्हायला नकोत. अमेरिकेने अफगाणिस्तानच्या युद्धातून माघार घेतली. कारण, तिथे गेल्या 20 वर्षांमध्ये अमेरिकेच्या साडेचार हजारांहून जास्त सैनिक मारले गेले होते. चौपट सैनिक जखमी झाले होते. परंतु, अनेकांना हे माहिती नाही की, त्यांच्या ‘प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर’ किंवा ‘प्रायव्हेट सेक्युरिटी’ कंपनीच्यामृत्युमुखी पडलेल्या ‘रिटायर्ड’ सैनिकांची संख्या ही साडेचार हजारांहून जास्त आहे. म्हणजेच ‘प्रायव्हेट सिक्युरिटी’ कंपनी तैनात केल्यामुळे अमेरिकेच्या सैनिकांची हानी कमी झाली, ते सैनिक कमी गंभीररित्या जखमी झाले, कमी सैनिक युद्धकैदी बनले.
 
 
रायगडच्या हरिहरेश्वरच्या समुद्रात एक संशयास्पद बोट नुकतीच सापडली होती. या बोटीत एक काळ्या रंगांचा बॅाक्स आढळून आला, त्यात तीन ‘एके-47’ रायफल आणि काही काडतूसं सापडली होती. या बोटीवर ‘नेपच्युन मॅरिटाईम सेक्सुरिटी’ असे लिहिले होते. ‘नेपच्युन’सारख्या ‘सेक्युरिटी’ कंपनी खासगी जहाजांना समुद्रामध्ये सुरक्षा प्रदान करतात.
 
 
‘प्रायव्हेट सिक्युरिटी’ कंपनी किंवा भाडोत्री सैनिकांनी अनेक युद्धांमध्ये आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये काम केलेले आहे. अमेरिकेचे ‘प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर’ म्हणजे ‘ब्लॅक वॉटर’, रशियाचे ‘प्रायव्हेट मिलिट्री कॉन्ट्रॅक्टर्स’ म्हणजे ‘वॅगनर ग्रुप’ आणि इतर याविषयी पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. परंतु, चिनी ‘प्रायव्हेट मिलिटरी’ कंपनी किंवा ‘चिनी प्रायव्हेट सेक्युरिटी’ कंपनी विषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.
 
 
‘प्रायव्हेट सेक्युरिटी’ कंपनीची गरज
 
 
या लेखामध्ये आपण ‘चिनी प्रायव्हेट कंपनी’ आणि ‘चिनी सेक्युरिटी कंपनी’वर आपले लक्ष केंद्रित करूया. त्यांचा वापर का केला जातो? आतापर्यंत त्यांचा वापर कुठल्या भागामध्ये केला गेला आहे? येणार्‍या काळामध्ये चिनी सेक्युरिटी कंपनीचा वापर अजून कुठे कुठे केला जाईल आणि सर्वांत महत्त्वाचे ‘चिनी सेक्युरिटी’ कंपनीचा प्रभाव आपल्या शेजारी राष्ट्रात कमी करण्याकरिता भारताने काय करावे?
 
 
आज चीन शेकडो देशांमध्ये ‘बेल्ट आणि रोड’ या त्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत हजारो किमीचे रस्ते बांधत आहे, सुविधा निर्माण करत आहे, खाणकाम करत आहे आणि वेगवेगळे कारखाने सुद्धा चालवत आहे. जिथे हजारो, लाखो चिनी नागरिक काम करतात. मात्र, कोरोना आणि त्यानंतर केलेल्या चिनी आक्रमक कारवायांमुळे जगातले बहुतेक देश आणी त्यांचे नागरिक चीनविरोधात गेले आहेत आणि जगामध्ये अनेक ठिकाणी चिनी नागरिकांवर प्राणघातक हल्लेदेखील झाले आहेत आणि होतच राहतील. खासकरुन अफगाणिस्तानमध्ये आणि पाकिस्तानात. म्हणून या ‘प्रायव्हेट सिक्युरिटी’ कंपनीची गरज पडते. कारण, चीनचा तिथे असलेल्या पोलीस किंवा सैन्यदलाच्या क्षमतेवर फारसा विश्वास नाही.
 
 
‘सेक्युरिटी कंपनी’चा वापर केल्यामुळे चीनला अनेक फायदे होतात. पहिले म्हणजे चिनी लोकांना कळत नाही की, त्यांचे सैनिक तिथे तैनात आहेत. त्यामुळे जनतेकडून विरोध होत नाही. दुसरे जागतिक स्तरावरती कोणीही म्हणू शकत नाही की चिनी सैन्याने दुसर्‍या राष्ट्रांमध्ये प्रवेश केला आहे. प्रत्येक देशाचे कायदे असतात आणि ते आपल्या देशात बाहेरच्या सैनिकांना काम करण्याकरीता परवानगी देत नाहीत. आंतरॉराष्ट्रीय कायद्यांचा सुद्धा भंग होत नाही. अशाप्रकारे ‘चिनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनी’ 40-50 देशांमध्ये काम करत आहे.
 
 
अर्थात, ‘चिनी प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर’ आणि ‘प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’मध्ये फरक आहे. आतापर्यंत अमेरिका आणि रशियाने आपल्या ‘प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर’चा वापर आपल्या मित्रराष्ट्रांना मदत करण्याकरिता केला, जसा युक्रेनमध्ये केला जात आहे किंवा अफगाणिस्तानमध्ये केला गेला. मात्र, चीनने आपल्या कायद्याप्रमाणे अजून कुठल्याही मित्रराष्ट्रांना लढाईमध्ये ‘प्रायव्हेट मिलिटरी कंपनी’ची मदत दिलेली नाही. मात्र, ‘प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनी’चा वापर चीन आता त्यांच्या कायद्याप्रमाणे करू शकतो. 2009 साली अशा ‘प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’च्या उपयोगाकरिता कायदेशीर परवानगी चीनने दिली आणि त्यानंतर त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
 
 
‘प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनी’सा कायदे, नियम लागू नसतात, त्यामुळे ते बिनधास्तपणे काम करू शकतात. काही वेळा आंतरराष्ट्रीय कायदे इतर देशांमध्ये किंवा समुद्रामध्ये सैन्याचा वापर करायला परवानगी देत नाही. त्यावेळेला सुद्धा या ‘प्रायव्हेट सेक्युरिटीकंपनी’ अत्यंत उपयोगी पडतात. एवढेच नव्हे, तर पारंपरिक सैन्याच्या तुलनेमध्ये ‘प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’ या कमी खर्चामध्ये काम करतात. कारण, त्यांना सर्व काळ तिथे तैनात करण्याची गरज नसते. काम झाले की त्यांना तिथून बाहेर पाठवता येते. असे अनेक फायदे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चीन ‘प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’चा वापर करत आहे.
 
 
असे मानले जाते की, ‘चिनी प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’ 40-50 देशांमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये काम करणारे कर्मचारी मुख्यतः ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ म्हणजे चिनी सैन्याचे निवृत्त झालेले सैनिक आणि अधिकारी आहेत. ते मध्य आशिया, आफ्रिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान अशा अनेक देशांमध्ये काम करत आहेत. त्यामुळे अशा भागांमध्ये चिनी प्रभाव वाढत आहे. एका अंदाजाप्रमाणे, सध्या 5 हजार, 200 चिनी ‘सेक्युरिटी कंपनी’ काम करत आहे. ज्यामध्ये 40 लाख निवृत्त सैनिकांना तैनात करण्यात आले आहे. ही जगातील सर्वांत जास्त निवृत्त सैनिकी तैनाती असावी.
 
 

ch 
 
 
 
इतर देशांच्या मच्छीमारांवर हल्ले
 
 
चीन समुद्रामध्येसुद्धा आपल्या जहाजांना सुरक्षा घेण्याकरिता ‘प्रायव्हेट सेक्युरिटीकंपनी’चा वापर करत आहे. कारण, अनेक भागांमध्ये समुद्री हल्ले करून व्यापारी जहाजांचे नुकसान करतात. परंतु, दक्षिण चीन समुद्रामध्ये चीन आपल्या मासेमारी बोटींच्या बरोबर ‘प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’चावापर करून इतर देशांच्या मच्छीमारांवरती हल्ले करून त्यांना घाबरवतो. कारण, त्या भागांमध्ये मासेमारी करून स्वतःचा फायदा करून घ्यायचा असतो. ‘प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनी’चा वापर येणार्‍या काळामध्ये तैवान आणि इतर आंतरराष्ट्रीय महासागरामध्ये चीन करू शकतो.
 
 
चिनी मच्छीमार बोटींमध्ये असलेल्या ‘प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनी’च्या सैनिकांनी दक्षिण पूर्व आशियातील देशांच्या मच्छीमारी बोटींवर हल्ले करून, दक्षिण चीन समुद्रामध्ये दहशत पसरवली आहे.
 
 
भारताने चिनी ‘प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनी’चा मुकाबला कसा करावा?
 
 
‘चिनी प्रायव्हेट सेक्युरिटी’ कंपनीचे भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये प्रवेश हे नक्कीच भारताकरिता धोकादायक आहे आणि या विरुद्ध पावले उचलली पाहिजे. भारताने ‘चिनी प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’चा मुकाबला कसा करावा? अर्थात, युद्ध परिस्थितीमध्ये त्यांचे हल्ला करून नुकसान केले जाऊ शकते. मात्र, शांतता काळात नेमके काय करायचे?
सर्वात प्रथम चिनी ‘प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’वरील संशोधन चालू ठेवावे आणि त्यांनी केलेल्या गैरकृत्यांची माहिती जगाला देत राहावी. दुसर्‍या देशांमध्ये या ‘प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’ काम करत आहेत, त्या देशांना चीनचा विरोध करायला सांगावे.
 
 
त्यांना सांगावे की, तुमच्या पोलिसांना, तुमच्या सैनिकांना आम्ही प्रशिक्षित करू, ज्यामुळे तुमच्या देशात संरक्षण तुम्हीच करू शकाल, त्याकरिता चिनी ‘प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’चीगरज पडणार नाही. ही मदत दहशतवादी हल्ले थांबवायचे प्रशिक्षण देण्याकरिता, अफू गांजा, चरस दहशतवाद थांबवण्याकरिता दिले जाऊ शकते. याशिवाय गुप्तहेर माहिती कशी काढायची, त्याचा वापर कसा करायचा, असे सुद्धा प्रशिक्षण दिले जाऊ शकते.
 
 
जिथे चिनी ‘प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’ किंवा चिनी नागरिक तैनात आहेत, ते तिथल्या देशांच्या नागरिकांशी गैरवर्तणूक करतात. ते आक्रमकपणे त्यांच्यावर हल्लेही करतात. अशा प्रकारचे हल्ले पाकिस्तानी सैन्यावरसुद्धा ‘चिनी प्रायव्हेट सेक्युरिटी’ कंपनीच्या कर्मचार्‍यांनी केलेले आहेत. अफगाणिस्तानमध्येसुद्धा ते अतिशय आक्रमकरित्या वागत असतात. जिथे चिनी राहतात, त्या भागांमध्ये इतर सामान्य नागरिकांना येण्याची परवानगी नसते. उदाहरणार्थ, ग्वादर बंदरामध्ये आसपासच्या समुद्रामध्ये स्थानिक मच्छीमारांना मासेमारी करण्याकरिता पूर्णपणे बंदी लादण्यात आली आहे.
 
 
चिनी ‘प्रायव्हेट सेक्युरिटी कंपनी’चे कटकारस्थान त्या त्या राष्ट्राच्या समोर वेळोवेळी मांडले पाहिजे, ज्यामुळे त्यांचा प्रभाव कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.