मदरशांचे सर्वेक्षण महत्त्वाचेच!

    01-Sep-2022   
Total Views |
owaisi
 
 
उत्तर प्रदेशात सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या उपाययोजनांमुळे उत्तर प्रदेश आता संपूर्ण दंगलमुक्त राज्य झालेे आहे. त्यानंतर आता योगींनी शिक्षण व्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आसाम सरकारच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला असून योगींनी आता उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वेक्षणानंतर त्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करावा लागणार आहे. या निर्णयानुसार सर्व मदरशांतील निधी, मौलवी ते अगदी अभ्यासक्रमापासून मुलांना दिल्या जाणार्‍या सुविधांपर्यंत सगळ्याचीच चौकशी केली जाणार आहे.
 
 
 
याद्वारे कोणत्या जिल्ह्यात किती अनोळखी मदरसे असून त्यात किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, याची माहिती प्राप्त होणार आहे. मान्यता नसलेल्या मदरशांचेही सर्वेक्षण केले जाणार असून त्यासाठी दि. ५ ऑक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. चौकशीअंती योग्य ठरणार्‍या मदरशांना ’उत्तर प्रदेश मदरसा बोर्डा’कडून मान्यता दिली जाणार आहे. सध्या उत्तर प्रदेशात १६ हजार, ४६१ मदरसे कार्यरत असून यापैकी जवळपास ५६० मदरसे सरकारी अनुदानावर चालत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून या यादीत एकही नवीन मदरसा समाविष्ट करण्यात आलेला नाही. मदरशांमध्ये काम करणार्‍या महिलांनाही गर्भधारणा आणि बाळंतपणानंतर सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
 
नुकतेच आसाममधील तीन मदरसे दहशतवादी संबंधांमुळे उद्ध्वस्त करण्यात आले असून अनेकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनेही मदरशांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. राज्याचे अल्पसंख्याक कल्याणमंत्री दानिश आझाद अन्सारी म्हणाले की, मुलांचे मूलभूत अधिकार सुरक्षित करण्यासाठी हे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी आणि फर्निचरपासून ते वीजपुरवठा आणि शौचालये मुलांसाठी आवश्यक असून ते या मदरशांमध्ये उपलब्ध आहेत की नाही, याची तपासणी केली जाईल. त्याचप्रमाणे मदरसे कोणत्या संस्था चालवतात, यावरही सरकारची नजर असेल. एकूणच मदरशांचा मूळ उद्देश धर्मप्रचार, प्रसार आणि शिक्षणाचा असला तरी त्यावरून याआधीही अनेक वादंग उठले आहेत. म्हणूनच केवळ उत्तर प्रदेश नव्हे, तर देशातील सर्व राज्यांमधील मदरशांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.
 
 
 
टेकामांचे रिकामटेकडे उद्योग
 
 
छत्तीसगढच्या काँग्रेस सरकारमधील शालेय शिक्षणमंत्री डॉ. प्रेमसाई टेकाम सध्या त्यांच्या सल्ल्यांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. नुकतीच त्यांनी बलरामपूर येथील एका व्यसनमुक्ती कार्यक्रमात दारूचा महिमा सांगत चक्क दारू कशी प्यावी, याविषयीचे अगाध ज्ञान उपस्थितांना दिले. यावेळी त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या कवितेचाही संदर्भ देत मंदिर-मशिदीमुळे भांडणं होतात, पण दारू मात्र एकत्र करण्याचे काम करते, असे सांगितले. त्याचबरोबरीने आत्मसंयम असायला हवा, आम्ही त्याचा वापर निवडणुकीतही करत असल्याचे सांगितले.
 
 
 
विशेष म्हणजे, या कार्यक्रमात शाळकरी मुलेदेखील सहभागी झाली होती. अशाठिकाणी मंत्रिमहोदय चक्क दारू पिण्याचे तोटे सांगण्याऐवजी त्याचे फायदे आणि पिण्याच्या पद्धतीच सांगू लागले. मंत्रिमहोदयांनी दारू एकदाच घटाघट न पिता सावकाश प्यावी, तरच ती पचत असल्याचे म्हटले. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपल्या मंत्र्यांवर जरा अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. शाळकरी मुलांसमोरच जर मंत्री साहेब असे दारूबाबतचे आपले दिव्य ज्ञान पाजळत असेल तर ती गंभीर बाब म्हणावी लागेल.
 
 
 
शालेय शिक्षणसारखे महत्त्वाचे खाते असतानाही त्यांनी दारूमुक्तीवर बोलण्याऐवजी दारूच्या अनोख्या गोष्टी सांगण्यातच धन्यता मानली. कार्यक्रमानंतर शिक्षणमंत्री टेकाम यांना पत्रकारांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, “खराब रस्ते लवकर नीट करण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण जिथे खराब रस्ते आहेत तिथे रस्ते अपघात कमी होतात व मृत्यूदेखील कमी होतात. परंतु, ज्याठिकाणी रस्ते चकाचक आहेत, त्याठिकाणी मात्र रस्ते अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असते.” आधीच देशभरात काँग्रेस अखेरच्या गंटागळ्या खात आहेत.
 
 
 
त्यात छत्तीसगढमध्ये स्वतःची सत्ता असताना तिथे मंत्र्यांकडून असे दिव्य कारनामे सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेसला सद्बुद्धी कधी येणार, हा मोठा प्रश्न आहे. सत्ता असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीचे कारनामे करायचे आणि निवडणूक आली की मोदीविरोधाची माळ जपायची, एवढाच काय तो उद्योग काँग्रेसजनांना शिल्लक राहिला आहे. त्यामुळे थोडीशी काही शिल्लक राहिली असेल, तर तत्काळ या रिकामटेकड्या टेकाम साहेबांवर कारवाई करावी, अन्यथा आहे ती सत्ता हातची जायला वेळ लागणार नाही.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.