वसाहतवादी धोरणांचा बळी ठरलेल्या वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध असलेला असंतोष एकवटण्यासाठी ७ ऑगस्ट, १९०५रोजी स्वदेशी आंदोलनाची हाक देण्यात आली. याची आठवण म्हणून भारतात दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी हातमाग दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जाणून घेऊया भारतातील पारंपरिक वस्त्रकला अर्थात हातमाग क्षेत्र आणि त्यासाठी सर्वसामान्य भारतीय काय योगदान देऊ शकतो याविषयी...
भारतीय संस्कृती आणि परंपरा यांची ओळख सांगणार्या ज्या बाबी आहेत, त्यात वस्त्रोद्योग ही महत्त्वाची गोष्ट आहे. वस्त्रासाठी लागणारा कच्चा माल आणि वस्त्र विणण्याची कला या दोन्ही एतद्देशीय भांडवलावर उभ्या राहिलेली वस्त्रोद्योगाची परंपरा पार सिंधू संस्कृतीपासून आपली ओळख अभिमानाने सांगत असल्याचे दिसून येते. आपल्या महाकाव्यांमध्ये त्याचे उल्लेख आढळतातच. त्याशिवाय भारतातून तलम सुती कापड, झुळझुळते रेशीम निर्यात होत असल्याचे पुरावे पंधराव्या शतकापासून सापडतात. सतराव्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमार्फत होणार्या भारतीय मालाच्या एकूण व्यापारापैकी ८३ टक्के व्यापार वस्त्राचा होत होता. याच ब्रिटिशांनी भारत अंकीत केल्यानंतर राबवलेल्या वसाहतवादी धोरणामुळे भारतातील वस्त्रोद्योग आपले वैभव हरवून बसला आणि भारत फक्त कच्च्या मालाचा पुरवठादार म्हणून गणला जाऊ लागला. भारतातून निर्यात होणार्या हातमागाच्या कापडाच्या निर्यातीवर निर्बंध आले आणि ब्रिटनमध्ये कारखान्यात बनलेला माल मात्र इथल्या बाजारपेठेवर लादला गेला. या कठीण परिस्थितीतही भारतीय विणकरांनी आपल्यातील कला जीवंत ठेवली. कापडाचा प्रकार, भौमितिक आकार तसेच देवादिकांची वा निसर्गाची ओळख सांगणारे नक्षीकाम अशी वैशिष्ट्ये जपणारी स्थानिक वस्त्रप्रावरणाची कला पिढ्यान्पिढ्या जोपासली.
वसाहतवादी धोरणांचा बळी ठरलेल्या वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध असलेला असंतोष एकवटण्यासाठी ७ ऑगस्ट, १९०५ रोजी स्वदेशी आंदोलनाची हाक देण्यात आली. याची आठवण म्हणून आपण हातमाग दिवस साजरा करतो. खरेतर भारतीय वस्त्रोद्योगाने विक्रमी भरार्या घेत कित्येक सीमा ओलांडल्या आहेत. त्यातील लक्षवेधी बाब म्हणजे हा उद्योग आता तंत्रज्ञानाचा हात धरणारा उद्योग होत आहे. समजा, तुम्ही नेसलेली साडी ही हातमागावर विणलेली अस्सल बनारसी साडी आहे किंवा नाही, हे तुम्हाला त्यात विणलेला ‘क्यूआर कोड’ आणि ‘लोगो’ यावरून जाणता येत असेल तर... हे काही कुठल्या भविष्यकाळ चितारणार्या चित्रपटातले दृश्य नाही, तर वास्तव आहे. भारतीय तंत्रशिक्षण संस्था म्हणजे ‘आयआयटी’ आणि ‘बनारस हिंदू विद्यापीठ’ यांच्या चमूने एकत्रितपणे अशा प्रकारचा स्वदेशी प्रकल्प साकारत आणला आहे. ज्यावरून तुम्हाला साडीबद्दल सर्व काही जाणून घेता येईल, अशा प्रकारचा कोडसुद्धा तयार आहे. त्याही पुढे जात आपण खरेदी करत असलेली साडी ही हातमागावर विणलेली आहे का, यंत्रमागावर हेही तुम्हाला जाणून घेता येईल.
भारतात वस्त्रोद्योगाला दोन हजार वर्षांची परंपरा आहे. हाताने तयार होणार्या जगातील एकूण वस्त्रोद्योगामधील ९५ टक्के वाटा हा या आपल्या परंपरेतील वस्त्रांनी उचलला आहे. यामध्ये ३५ लाख हस्तकला कामगार येतात, ज्यापैकी ७२ टक्के स्त्रिया आहेत. दि. ७ ऑगस्ट हा दिवस खास दिवस आहे. १९०५ या साली याच दिवशी स्वदेशी चळवळीला आरंभ झाला होता, म्हणजे वस्त्रोद्योगाला या दिवसासारखा अभिमानाने मिरवता येणारा दुसरा दिवस नाही.आमच्या डिझाईन क्षेत्रातील मंडळींनी हातमाग विणकरांसोबत अथक काम करत साड्यांसाठी विणले जाणारे कापड, त्याचा पोत आणि चमक याचा दर्जा उंचावला, त्यामुळे ज्यांना सावकाश प्रक्रियेतून जात तयार होणार्या उत्पादनाचे मूल्य कळते, त्यांच्यासाठी एक काटेकोर पद्धतीने तयार होणारे उत्पादन साकार झाले. माझी अशी उत्कट इच्छा आहे की, २००० नंतर जन्मलेल्या प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी किमान एक हातमाग उत्पादन विकत घेऊन ते दर आठवड्याला वापरावे. त्यामुळे अथक परिश्रम करणार्या आणि विशेषतः ‘कोविड’ काळात सर्वाधिक दुर्दशा वाट्याला आलेल्या समुदायाला मदतीचा हात मिळेल.
प्रदर्शने, ‘बुनकर हाट’सारख्या माध्यमाद्वारे भारतीय विणकर आपल्या जुन्या समृद्धीच्या मार्गावरुन वाटचाल करू पाहत होता. ‘कोविड’मुळे त्याच्या प्रयत्नांना खीळ बसली. इथे ‘भारतीय फॅशन डिझाईन संस्थे’चा ‘कोविड’ साहाय्य निधी कामी आला आणि तगून राहण्यासाठी धडपडत असणार्या अशा समुदायांना मदत मिळाली. आम्ही त्यांना पाय रोवून राहण्यासाठी आशेचा किरण दाखवला. अर्थात, समुद्रात एखादा थेंब टाकण्याइतपतच वाटा त्या मदतीने उचलला असला, तरी त्या मदतीचे महत्त्व कमी होत नाही.
याशिवाय ‘डिजिटल’ तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप आणि तंत्रज्ञानाची मदत घेण्यास वाव मिळाल्यामुळे वस्त्रोद्योगाचे भविष्य उजळून निघण्याची खात्री मिळाली, याचा उल्लेख करायलाच हवा. आता आपली उत्पादने विकण्यास ‘ई-कॉमर्स’ची सुविधा मिळणे आवश्यक आहे. तसे झाल्यास विणकरांना आपली उत्पादने थेट विकता येतील आणि वस्त्रोद्योग मंत्रालय भरघोस साहाय्य देत असल्यामुळे, जगभरात कुठेही नेऊ शकणार्या ‘वर्ल्ड वाईड वेब’चा वापर लहानपणापासून करत आलेल्या विणकरांच्या पुढील पिढीने म्हणजे नातवंडांनी हे व्यवसायक्षेत्र सोडू नये.
टाळेबंदी आणि ‘कोविड’ याचा विणकरांना चांगलाच फटका बसला होता. ‘आत्मनिर्भर भारत अभियानां’तर्गत दिलेल्या आर्थिक मदतीच्या पॅकेजमुळे त्यांना काहीसा लाभ झाला. ई-बाजारपेठेच्या माध्यमातून हातमागावरील उत्पादनांची विक्री करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचेही प्रयास झाले आणि सध्याच्या परिस्थितीत प्रदर्शने भरवणे शक्य नसल्याने २३ ‘ई-कॉमर्स’ संस्था यामध्ये सामील झाल्या.वस्त्रोद्योगाला नवीन उंची गाठता यावी, या उद्देशाने वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापन करण्यात आली. या क्षेत्रातील रोजगार वाढावेत, तसेच हस्तव्यवसायातील पुढील पिढ्यांना लाभदायी व्हावी म्हणून काही सूचनांसह अंतिम योजना मंत्रीमहोदयांपुढे मांडली गेली.
भारतीय वस्त्रोद्योगाला पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम’, ‘समग्र हातमाग क्लस्टर विकास योजना’, हातमाग विणकरांसाठीची ’सर्वसमावेशक कल्याण योजना’, ‘सूतपुरवठा योजना’ यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून कच्च्या मालासाठी आर्थिक साहाय्य मिळेल. याशिवाय विणकरमाग खरेदी आणि नावीन्यपूर्ण नक्षीकाम यासाठीचे साहाय्य तर आहेच.“जगभरातील बाजारपेठेत उपलब्ध असलेले प्रत्येक लोकरीचे वा रेशमाचे कापड मग ते घर सजवण्यासाठी असो वा परिधान करण्यासाठी ते भारतातून आलेलेच असणार,” असे उद्गार व्यापाराचे वर्णन करताना डॅनिअल डफ या लेखकाने काढले होते. अशा या भारतीय वस्त्रोद्योगाच्या अभिमानाला पुन्हा मूर्त रूप देऊया. चला, या हातमाग दिनी आपण अभिमानाने आपल्या लाखमोलाच्या परंपरांनी भूषवलेली वस्त्रे परिधान करुया.
- सुनील सेठी
(लेखक भारतीय फॅशन डिझाईन कौन्सिल, नवी दिल्लीचे अध्यक्ष आहेत)