तैवानच्या हवाई हद्दीतून चीनच्या वायुदलाची विमाने घेऊन जाणे, लष्करी जहाजे तैवानच्या सागरी हद्दीजवळून नेणे, तैवानच्या आजूबाजूच्या क्षेत्रात युद्धसरावांचे आयोजन यामुळे काहीही साध्य होण्याची लक्षणे नाहीत.
नॅन्सी पेलोसी यांनी तैवानची राजधानी तैपेईला त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे बुधवारी भेट दिली. सिंगापूर व मलेशियाचा दौरा करून तिथून नॅन्सी पेलोसी तैवानची राजधानी तैपेईमध्ये दाखल झाल्या होत्या. नॅन्सी पेलोसी या तैवानला भेट देतील का, याकडे सर्व जगाचे लक्ष होते. नॅन्सी पेलोसी यांच्या विमानाला तैवानच्या वायुदलातील सहा ‘एफ १६’ विमानांनी संरक्षण पुरविले होते. नॅन्सी पेलोसी यांचे तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग वेन यांनी स्वागत केले आणि नॅन्सी पेलोसी यांना तैवानचा सर्वोच्च पुरस्कारही देण्यात आला. नॅन्सी पेलोसी यांची तैवान भेट ही सरळ सरळ चीनला चिथावणी देणारी होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पण चीनने कितीही मोठ्या राणा भीमदेवी थाटात घोषणा केल्या असल्या, तरी प्रत्यक्ष आदळआपट करण्यापलीकडे काहीच केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. चीनच्या सरकारी मुखपत्राने तर या प्रश्नावर तैवानसह अमेरिकेशी युद्ध पुकारण्याची धमकी दिली होती. चीनचे लष्कर पेलोसी यांच्या या तैवान भेटीला आक्रमक प्रत्युत्तर देईल, असे चीनचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने म्हटले होते. नॅन्सी पेलोसी यांचे विमान पाडण्याचा इशाराही चिनी मुखपत्राने दिला होता.
अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या सभापती, वय वर्षे ८२ असणार्या नॅन्सी पेलोसी यांची सभापतीपदाची मुदत लवकरच संपत आहे. त्या डेमोक्रेटिक पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडन, उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यानंतर ज्येष्ठतेनुसार नॅन्सी पेलोसी यांचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना शक्य तेवढा त्रास देण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका प्रस्तावाचे कागद ट्रम्प यांच्यासमोरच अमेरिकन काँग्रेसमध्ये टराटरा फाडले होते. त्यामुळे त्या बर्याच चर्चेत आल्या होत्या.
अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहाच्या घटनेनुसार त्या आता परत सभापती बनू शकणार नाहीत. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहातील सभापती पदावरील व्यक्तीने तैवानला भेट देण्याची ही दुसरी वेळ आहे. २५ वर्षांपूर्वी साल १९९७ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे तत्कालीन अमेरिकन काँग्रेसचे सभापती असणारे गिंगरीच यांनी तैवानला भेट दिली होती. मग अशा निवृत्त होण्याच्या वेळी नॅन्सी पेलोसी यांना तैवानला भेट देण्याची गरज का वाटावी? भले त्याकरिता चीनसारखा देश अस्वस्थ झाला तरी चालेल. बाकी तैवानच्या लोकशाही, सार्वभौमत्व, स्त्री पंतप्रधान असण्याचे कौतुक या केवळ बोलाच्याच गोष्टी असाव्यात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो बायडन यांनीही नॅन्सी पेलोसी यांनी तैवानची भेट टाळावी, असे अप्रत्यक्षपणे सुचविले होते. नॅन्सी पेलोसी यांनी यापूर्वीही चीनला डिवचण्यासाठी भारतात आश्रय घेतलेल्या तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांना अनेकदा भेट दिली होती. या भेटीत दलाई लामा यांच्याबद्दल प्रेम नसून केवळ चीनला वाकुल्या दाखविण्याचाच महत्त्वाचा उद्देश असावा की काय, अशी चर्चा होती. कारण, या अशा भेटींमधून पुढे काय साध्य झाले, हे मोठे कोडे होते. तसेच दलाई लामा यांना अमेरिकन काँग्रेसमध्ये आमंत्रित करून त्यांचा सन्मान करणे, हाही त्याचाच एक भाग होता असे म्हणता येईल. कारण, तिबेट स्वतंत्र करण्यासाठी किंवा त्याला पुरेसे सार्वभौमत्व मिळवून देण्यासाठी नॅन्सी पेलोसी यांनी अमेरिकन काँग्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत कोणता प्रयत्न केल्याचे दिसून आले नव्हते. दलाई लामा यांनाही मागील वर्षी तैवानला भेट देण्याची इच्छा होती. पण कोरोनाच्या उद्रेकामुळे त्यांना तैवानला जाता आले नव्हते. त्यामुळे नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीकडे पाहिले असता, त्यांची ही भेट म्हणजे अमेरिकेच्या राजकारणात टिकून राहण्याची त्यांची केविलवाणी धडपड असावी की काय, अशी शंका येते. नुसती माध्यमांमध्ये खळबळ उडविणे आणि स्वतःकडे लक्ष वेधून घेणे, हा यामागील उद्देश असावा.
नॅन्सी पेलोसी या अमेरिकेतील काँग्रेसमध्ये तीन दशके सक्रिय राहिलेल्या आहेत. आता त्यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्या चीनच्या विरोधक राहिलेल्या आहेत. त्यांच्या चीन विरोधाची धार कमी करण्यासाठी चीनमधील कम्युनिस्ट पक्षाने गेल्या दशकात विविध मार्गाने सर्वतोपरी प्रयत्न केले ही पण एक वस्तुस्थिती आहे.साल १९९१ मध्ये चीनमधील तियान्मेन चौकात बळी पडलेल्या लोकशाहीप्रेमी निदर्शकांच्या समर्थनासाठी नॅन्सी पेलोसी तियान्मेन चौकामध्ये जाऊन धडकल्या होत्या. अमेरिकन काँग्रेसमधील दोन सदस्यांबरोबर नॅन्सी पेलोसी यांनी तियान्मेन चौकात जाऊन फुले अर्पण केली होती. त्याची ध्वनिचित्रफीत समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. नॅन्सी पेलोसी या अमेरिकन काँग्रेसमधील पहिल्या महिला सभापती आहेत. २००७ मध्ये त्या पहिल्यांदा सभापतीपदी निवडून आल्या होत्या.
नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीकडे ऑप्टिकल्सच्या नजरेतून पाहायला हवे. कारण, या अशा भेटीतून जगाचे लक्ष वेधून घेतल्याने नॅन्सी पेलोसी या त्यांच्या लवकरच अपेक्षित निवृत्तीनंतर पुढच्या राजकीय आकांक्षांसाठी पायाभरणी तर करत नाहीत ना, अशी शंका येते. अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडन यांच्या कारभारामुळे अमेरिकन जनता त्यांच्यावर नाराज आहे. अमेरिकेत महागाईचा भडका उडालेला आहे. डेमोक्रेटिक पक्षाची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे. पुढील दोन महिन्यांत सिनेटच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सिनेटच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रेटिक पक्षाला जोरदार फटका बसण्याची चिन्हे आहेत. जर सिनेटमध्ये अमेरिकेतील विरोधी पक्ष असणार्या रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाले तर जो बायडन यांना त्यांनी मांडलेले प्रत्येक विधेयक पारित करून घेताना त्यानंतरच्या काळात मोठी कसरत करावी लागेल. त्यातच जो बायडन हे त्यांच्या वयोमानामुळे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा उर्वरित दोन वर्षे समर्थपणे सांभाळू शकतील का, अशीही अमेरिकेतच चर्चा आहे. तेथील उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याकडून अमेरिकन जनतेला फारशा अपेक्षा नाहीत. पण परिस्थिती उद्भवल्यास नॅन्सी पेलोसी याही कमला हॅरिस यांच्या बरोबरीने अध्यक्षपदाच्या जबाबदारीसाठी उत्सुक असाव्यात अशी तेथे चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वांची नजर साल २०२४ मधील अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागली आहे. या येणार्या निवडणुकीमध्ये डेमोक्रेटिक पक्षाला भवितव्य असेल का, अशी तेथे चर्चा आहे. नॅन्सी पेलोसी यांनाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत का हेही सांगता येत नाही. पण एक गोष्ट निश्चित की, आधीच प्रचंड अडचणीत असलेले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे खूपच अडचणीत आले आहेत. शी जिनपिंग यांच्या तीन सत्रांच्या कारकिर्दीनंतर त्यांना परत मुदतवाढ मिळेल किंवा नाही याचीच चिंता त्यांना भेडसावत असेल, हे निश्चित. कोरोना साथीचा उडालेला भडका, त्याचा प्रसार नियंत्रणात येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत, ढासळणारी अर्थव्यवस्था आणि ‘झिरो कोविड’ रुग्ण या उद्देशाने चाललेली दडपशाही यामुळे शी जिनपिंग यांची चीनमधील लोकप्रियता झपाट्याने खाली आलेली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये तर शी जिनपिंग यांच्या जागी कोण येऊ शकतो, याची चर्चाही सुरू झाल्याचे दिसते आहे. शी जिनपिंग यांना आता त्यांचे अस्तित्व दाखविण्यासाठी काहीतरी करावे लागेल. शी जिनपिंग यांना त्यांच्या कम्युनिस्ट पक्षातच खूप विरोधक आहेत. त्यावर ते कसे मात करतात, हे बघावे लागेल. तैवानच्या हवाई हद्दीतून चीनच्या वायुदलाची विमाने घेऊन जाणे, लष्करी जहाजे तैवानच्या सागरी हद्दीजवळून नेणे, तैवानच्या आजूबाजूच्या क्षेत्रात युद्धसरावांचे आयोजन यामुळे काहीही साध्य होण्याची लक्षणे नाहीत. आता काही केले नाही तर नोव्हेंबरमधील कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात शी जिनपिंग यांना चीनचे तहहयात अध्यक्ष बनण्याची संधी मिळणार नाही. चीन आता कोणते धाडस करण्यास उद्युक्त होतो, याकडे जगाचे लक्ष आहे.
- सनत्कुमार कोल्हटकर