अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा संघर्ष

    07-Aug-2022   
Total Views |
taiwan
 
 
 
भारतीय भूमीत युद्ध आणि संघर्ष यांचा इतिहास तसा जुना आहे. भारताच्या ऐतिहासिक युद्ध कथांची पुस्तके आजही समाजमनात आपले स्थान टिकवून आहेत. पारंपरिक काळात होणार्‍या युद्धाची झळ ही त्या दोन राष्ट्रांना किंवा राज्यांना बसत असे. मात्र, आता आधुनिक काळात लढले जाणारे युद्ध हे केवळ युद्धक्षेत्र किंवा युद्धात सहभागी देशांपुरतेच मर्यादित राहत नाही. त्याची झळ संपूर्ण जगाला सोसावी लागत असते. नुकतेच याचे उदाहरण म्हणून आपण रशिया आणि युक्रेन संघर्षाकडे पाहू शकतो. रशिया आणि युक्रेन संघर्षाची गाथा संपते न संपते तोच आता तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यात वादास प्रारंभ झाला आहे. मूलत: जगातील संघर्षावर आपल्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग निर्भर ठेवणारी अमेरिका या वादात आपले शक्य तितके योगदान देत संघर्ष कसा चिघळेल, यासाठी नक्कीच प्रयत्नरत आहे. अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाच्या अध्यक्षा नॅसी पेलोसी यांच्या नुकत्याच झालेल्या तैवान दौर्‍यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आधीच ताणले गेले आहेत. त्यांच्या या दौर्‍यानंतर चीन तैवानला प्रत्येक प्रकारे धमकी देण्याचा प्रयत्न करत आहे. तैवानच्या हवाईसुरक्षा क्षेत्रात चिनी विमानांनी घिरट्या घालण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे तैवाननेदेखील आपला इरादा स्पष्ट करत चीनचे ऐकण्यास नकार दिला आहे. केवळ अन् केवळ चीन दबाव आणत आहे, म्हणून तैवानला अमेरिकेशी असलेली मैत्री तोडायची नाही. हे त्यांच्या इराद्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे.
 
 
 
मात्र, चीन, तैवान आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेला हा तणाव जगाच्या माहिती व तंत्रज्ञान बाजरपेठेसाठी अजिबात फलदायी नाही. आज तैवानचा माहिती तंत्रज्ञान बाजारात मोठा दबदबा आहे. तैवानचे या क्षेत्रात असलेले कौशल्य हे वादातीत आहे. तंत्रज्ञान आणि ‘सेमीकंडक्टर मार्केट’मध्ये तैवानचा मोठा वाटा आहे. तैवान जगातील आधुनिक ‘सेमीकंडक्टर’पैकी ९० टक्के उत्पादन करतो. गेल्या वर्षी तैवानने सुमारे ११८ अब्ज डॉलरचे ‘सेमीकंडक्टर’ निर्यात केले आहेत. तसेच, तैवानने जगातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांसाठी ‘चीप’ बनवली आहे. तैवानची कंपनी असलेल्या ‘टीएसएमसी’ने जगातील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी चीप उत्पादन केले आहे. चीन-तैवान युद्ध छेडले गेल्यास याचा थेट परिणाम हा स्मार्टफोन बाजारावर होण्याची शक्यता सध्या वर्तविली जात आहे. यामध्ये ‘अ‍ॅपल’, ‘एएमडी’, ‘नाव्हिया’ आणि ‘एआरएम’ सारख्या बड्या कंपन्यांसाठी तैवानमध्ये निर्मित होणारी ’चीप’ ही अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. चीन-तैवान युद्ध छेडले गेल्यास तेथील ’चीप’निर्मिती उद्योगावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता चर्चिली जात आहे. तैवानमध्ये निर्मित होणार्‍या ‘चीप्स’चा वापर स्मार्टफोन, कार, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये होत असतो. या ‘चीप्स’शिवाय या गोष्टींचे उत्पादन शक्य नाही. अशा स्थितीत चीन आणि तैवानमधील तणावाचा परिणाम तेथील ‘सेमीकंडक्टर’ बाजारपेठेवर होण्याची दाट संभावना आहे.
 
 
 
चीन आणि तैवान यांच्यातील संघर्षाचे परिणाम थेट अमेरिका आणि युरोपातील देशांवर होण्याची शक्यता चर्चिली जात आहे. चीन आणि तैवानमध्ये युद्ध सुरू झाले, तर त्याचा परिणाम मोबाईल उत्पादक तसेच, कारनिर्माते आणि घरगुती मनोरंजन कंपन्यांवर होईल. त्यामुळे जगभरात पुरवठा तुटवड्याचा प्रश्न निर्माण होण्याची संभावना सध्या चर्चेत आहे. चीनने सध्या सहा बाजूंनी तैवानची घेराबंदी केली आहे. चीनचा आक्रमक पवित्रा पाहून तैवाननेदेखील ‘लेव्हल २’ अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे अमेरिकेनेही चीनशी दोन हात करण्याची तयारी केली आहे. अण्वस्त्रवाहू ‘एअरक्राफ्ट’ जहाजांपासून ते किलर पाणबुड्या या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. आधुनिक जगात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे जग जवळ आले आहे. त्यातच स्मार्टफोन, कार यांसारख्या बाबी या आता चैनीच्या बाबी राहिल्या नसून त्या जीवनावश्यक सदरात मोडत आहेत. अशावेळी मानवाच्या जीवनाला प्रगतिपथ निर्माण करून देणार्‍या घटकांवर जर जागतिक संघर्षाचा परिणाम होणार असेल तर त्याची मोजावी लागणारी किंमत नक्कीच न परवडणारी आहे. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा हा संघर्ष टळलेलाच बरा असेच मत जगाच्या पाठीवर व्यक्त होत आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.