अबू आणि औरंगजेबाची किंमत

    07-Aug-2022   
Total Views |
azmi
 
अबूचा औरंगजेब काय किमतीचा? “औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबाचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे,” इति अबू आझमी. अबू आझमी आणि औरंगजेबाचेे संबंध काय असावेत? अबू आझमी यांच्या पाठच्या पिढीचा मागोवा घेतला, तर साधारण पाच-सहा पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वज कोण होते? आझमींचे पूर्वज जर याच भारत देशातील असतील, तर त्यांचे मूळ पूर्वज मुस्लीम असणे शक्यच नाही. पण, आपण किती कट्टर मुस्लीम आहोत, हे दाखवण्यासाठी अबूसारख्यांवर आपण औरंगजेबाची औलाद आहोत, हे सिद्ध करण्याची नामुश्की येते. तसे करताना यांना काहीही वाटत नाही. औरंगजेब हा वाईट राजा नव्हता, असे अबू म्हणतो. पण हिंदूंना जगणे मुश्किल करणारा, त्यांचे जीवन नरक करणारा, मंदिर आणि हिंदूंच्या श्रद्धा तोडणारा इतकेच काय? छत्रपती संभाजी महाराजांना भयंकर यातना देणारा औरंगजेबच होता. या महाराष्ट्रामध्ये खलनायक औरंग्याच्या नसलेल्या चांगुलपणाबद्दल बोलण्याची हिंमत अबूसारख्यांची होते. अबूचे समाजकार्य काय वर्णावे? काही वर्षांपूर्वी ‘गोवंडी डम्पिंग ग्राऊंड’ला गेले होते. बिहार आणि उत्तर प्रदेशमधून विस्थापित झालेली आर्थिकदृष्ट्या गरीब मुस्लीम कुटुंब त्या ‘डम्पिंग ग्राऊंड’वर वसलेली. अतिशय घाणेरडा आणि दुर्गंधीयुक्त परिसर. मूलभूत सुविधांची वानवा. मात्र, हे लोक आ. अबूचे गुणगाण गात होते. या लोकांना विचारले, अबू इतका चांगला जमातवाला आहे, तर तुम्हाला साधी पाण्याचीही सोय का नाही? त्यावर यांचे म्हणणे, “पिछले महिने साहब आये थे। बोलके गये थे, पानी की लाईन लगवा देंगे। का करे? वो कोशिश करते हैं। जैसे साहबने पानी का कनेक्शन जमीन में गाडा की वो दिल्ली से मोदी देखता हैं और रातोरात मोदी लाईन कटवा देता हैं।” त्यांना विचारले, “हे तुम्हाला कोणी सांगितले?” तर त्यांचे म्हणणे, “साहब के आदमी क्यूं झूठ बोलेंगे।” याचाच अर्थ अबूचे कार्यकर्ते या लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत या लोकांना असे काहीबाही खोटे सांगत होते. लोकांकडे काहीही नसले, तरी मतदानकार्ड आहे, हे विशेष. हे अबूच्या मतदार संघातील जागरूक नागरिक आहेत. या लोकांना कायम मोदी आणि हिंदूंची भीती दाखवणे यापलीकडे या मतदारसंघात अबूचे विकास काम शून्यच आहेत. असा अबू आणि अशा अबूचा औरंगजेब काय किंमतीचा असेल?
 
जनता, सोंगांना भूलणार नाही
 
नुकतेच काँग्रेसच्या नेत्यांनी काळे कपडे घालून महागाईचा निषेध करत दिल्लीत आंदोलन केले. त्यात नसलेल्या राजसत्तेचे अजूनही स्वप्नात असलेले राजकुमार आणि राजकुमारी रस्त्यावर उतरले होते. राजकुमार राहुल आणि राजकुमारी प्रियांका वाड्रा या दोघांनी काळे कपडे घातले. रस्त्यावर बसले, उठले, अगदी पळापळ केली. हे आंदोलन तसे बरेच चर्चेत आले. प्रसिद्धही झाले. काही दुष्ट लोक म्हणतील की, प्रियांका वाड्रा यांचे विशिष्ट पद्धतीने टाळ्या पिटून अगदी रूक्ष आवाजातले, ‘मोदी हमसे डरता हैं। पुलीस को आगे करता हैं।’ असे काहीतरी ऐकले खरे. त्या प्रत्यक्ष घटनेच्या व्हिडिओपेक्षा त्या-त्या व्हिडिओवर बनवले गेलेले मिम्स आणि कंमेट्स अतिशय भारी आणि मनोरंजन करणारे उद्बोधक होते, असेही अनेक जण शपथेवर म्हणतील हेसुद्धा माहिती आहे. या आंदोलनामधले काही विशेष फोटो भाजपच्या अमित मालवीय यांनी ट्विट केले आहेत. त्यांचे हे ट्विट अत्यंत गाजले आहे. काय आहे या ट्विटमध्ये? तर अमित मालवीय यांनी काँग्रेसच्या आंदोलनाचे फोटो ट्विट केले. त्यातल्या एका फोटोमध्ये राजकुमार राहुल गांधी काँगेसच्या दीपेंद्र हुड्डा यांचा शर्ट खेचताना दिसत आहेत. तो शर्टही असा खेचत आहेत की, शर्ट फाटावा? शर्ट फाटल्यानंतर पाहणार्‍याला वाटावे की, आंदोलनामध्ये या व्यक्तीला मारहाण किंवा किमान धक्काबुक्की झालीच असावी. दुसरीकडे राजकुमारी प्रियांका वाड्रा एका महिला पोलिसाचा हात पिरगळताना दिसत आहेत. ही महिला पोलीस आपले कर्तव्य बजावत आहे. त्याचवेळी तिचा हात प्रियांका यांनी पकडला आहे, असे या फोटोतून दिसते. काय म्हणावे? आंदोलन विस्फोटक व्हावे म्हणून राजकुमार राहुल गांधी यांनी आपल्याच कार्यकर्त्याचा शर्ट फाडावा? प्रियंका गांधी यांनी विरोध म्हणून कर्तव्य बजावणार्‍या महिला पोलिसाचा हात पिरगळावा? कुठून येतो हा इतका टोकाचा लबाड आणि उद्दामपणा? या आंदोलनाचे फलित काय? तर या आंदोलनामुळे हाथरस, उत्तर प्रदेशमध्ये राहूल गांधी यांनी केलेले आंदोलन आठवले इतकेच. त्यावेळीही राहुल गांधी स्वत:च एका मऊ जागेवर जाऊन पडले होते. मला धक्काबुक्की केली, असे ते आकांडतांडव केलेच, पण प्रत्यक्ष ‘रेकॉर्डिंग’मध्ये ते स्वत:हून पडताना दिसले. राहुल आणि प्रियांका यांना कसे कळत नाही की, भारतातले लोकही हुशारच आहेत. कितीही बनवाबनवी करा, पण जनता आता सोंगांना भूलणार नाही.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.