दक्षिण आफ्रिकेमधील जनाक्रोश

    06-Aug-2022   
Total Views |
south africa
 
 
 
 
सध्या दक्षिण आफ्रिकेमधील जनतेत प्रचंड रोष पसरला आहे. जोहान्सबर्ग शहर आणि परिसरात दंगलसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. लोक रस्त्यावर उतरले असून त्यांनी शहरांना जोडणारे रस्ते बंद केले आहेत. जमाजमास लोकांवर हल्ला करून त्यांना जेलबंद केल्याशिवाय थांबायचे नाही, असे आंदोलनकारी म्हणत आहेत. ते संतप्त आहेत. हिंसा भडकू शकते म्हणून त्यांना थांबवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी कमान हातात घेतली. यावर लोकांचे म्हणणे की, आम्हाला अडवण्याऐवजी जमाजमास लोकांना हाकलवून द्या. तुम्ही कारवाई करायला सक्षम नसाल, तर सैनिकांना कारवाई करू द्या. पण, कोण आहेत हे जमाजमास आणि द. आफ्रिकेमध्ये त्यांच्याबाबत इतका रोष पसरायचे कारण काय? तर दि. 28 जुलै रोजी जोहान्सबर्ग जवळच्या क्रुगर्सडॉर्प येथे एका म्युझिक व्हिडिओची शुटिंग सुरू होती. 12 महिला आणि दहा पुरूष शुटिंगमध्ये सामील होते. शुटिंग संपले. अचानक हवेत गोळ्या झाडण्याचे आवाज आले. ब्लँकेटने सर्व शरीर झाकलेल्या एका घोळक्याने शुटिंग करणार्याश लोकांना घेरले.कोण होता हा घेाळका?
 
हे सगळे जमाजमास लोक होते.जमाजामास म्हणजे अवैध सोन्याच्या खाणीत काम करणारे मजदूर. जे मुख्यतः मोझॅम्बिक झिम्बाब्वे, लेसेथो, इस्वातीन या देशातून अवैधरित्या द. आफ्रिकेत आलेले असतात, तर या जमाजमास गटाने शुटिंगसाठी आलेल्या 22 जणांचे सर्व सामान लुटले. दागिने, कृत्रिम दागिने, पादत्राणे अगदी मोजेही तसेच शुटिंगची सगळी यंत्रसामग्री या जमाजमासांनी लुटली. काही वेळाने शेकडो जमाजमास तिथे आले. त्यांनी 22 जणांपैकी आठ मॉडेल्सवर सामूहिक बलात्कार केला. 12 तास या आठ जणींवर बलात्कार झाला. गुन्हेगारांनी कपामध्ये लघुशंका करून ते कोल्डड्रिंक्स म्हणून या आठ जणींना पिण्याची सक्ती केली. आज आठवड्याभरानंतर पोलिसांनी या घटनेशी संबंधित 130हून अधिक गुन्हेगारांना पकडले आहे. त्यातील 20 तर 14 वर्षांचेही नाहीत. भयंकर आणि मानवतेलाकाळीमा फासणारी अशी ही घटना!
12 तास आठ मुलींवर अत्याचार होताना या देशातली शहरातली कायदा-सुव्यवस्था कुठे होती? यावर क्रुगर्सडॉर्पच्या नागरिकांचे म्हणणे आहे की, ”अशी घटना काही नवी नाही. घरफोडी, लुटमार अगदी पेट्रोलपंप आणि छोटेेसे दुकानही लुटण्याच्या घटना दररोजच घडतात. पोलिसांना अनेकवेळा संपर्क करूनही पोलीस यांच्याविरोधात काही कारवाई करत नाहीत. कारण, अवैध सोन्याच्या खाणीत त्यांचाही हिस्सा असतो.” या घटनेबद्दल संताप, दुःख व्यक्त करताना दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामापोस म्हणाले की, “गुन्ह्याबाबत कुणाला काही तरी माहिती असते, लोकांनी गुन्ह्याबाबत तत्काळ माहिती द्यायला हवी. इतकेच नव्हे, तर महिला सुरक्षाबाबत कायद्यामध्ये सकारात्मक बदल केले आहेत. स्त्रीपुरूष समानतेसाठी सरकार तातडीने कार्यवाही करणार आहे.” या घटनेबद्दल मत व्यक्त करताना देशाचे गृहमंत्री रॉन मॉटसोअलेडी म्हणाले, “काही वर्षांपूर्वी ते ग्रामीण क्षेत्रात डॉक्टर म्हणून सेवाकार्य करत. एका बालिकेला उपचारासाठी आणण्यात आले. तिचा योनीमार्गच नष्ट झाला होता. ती मरणाच्या दारात होती. तासन्तास शस्त्रक्रिया करून तिला वाचवले.
शुद्धीवर आल्यावर ती म्हणाली, “ते मामा बाहेर आईसोबत आले त्यांनी मला का मारले?” त्या नराधमाला पोलिसांकडे सुपूर्द करावे, यासाठी मी बाहेर आलो, तर काही बोलण्याआधीच ती महिला म्हणाली,“कृपया याबद्दल कुणाला काही बोलू नका. हे जे माझ्यासोबत आले आहेत, ते माझे मानलेले भाऊ आहेत. त्याच्यामुळेच आम्ही दोनवेळचे जेवू शकतो.” तुर्तास पोलिसांनी 130 संशयितांना पकडले. त्यांच्यावर अवैधरित्या देशात राहण्याचे, अवैध खाण खणण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सगळ्यांची ‘डीएनए’ चाचणी होणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होणार आहे. यावर देशातल्या समाजसेवी संस्थांनी प्रश्न विचारला आहे की, या मुली पुन्हा सामान्य जीवन जगतील का? या घटनेला सरकार, कायदा-सुव्यवस्था कोण जबाबदार? काहीही असो, मॉडेलिंगसाठी आलेल्या या मुली. त्यांची स्वप्न, त्यांचे भविष्य क्रूर, अमानवीपणे मारणारे चिरडून टाकणारे ते गुन्हेगार त्यांची मानसिकता सगळेच भयंकर. अर्थात, असे कितीतरी गुन्हे दबलेही गेले असतील. त्यांचे काय? या गुन्हेगारांना जगातली सगळ्यात क्रूर शिक्षाही कमीच म्हणावी लागेल.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.