हे आहे वर्षा राऊत यांचे पत्राचाळ कनेक्शन

    04-Aug-2022
Total Views |

varsha  

 
 
मुंबई : पत्राचाळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या संजय राऊतांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आता त्याच प्रकरणातील दुसरे प्रमुख नाव असलेल्या वर्षा राऊत याही ईडीच्या रडारवर आल्या आहेत. वर्ष राऊत यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकारणात नवाच ट्विस्ट आला आहे. पत्राचाळ प्रकरणात वर्ष राऊत यांच्या नावावर १ कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली असल्याचा आरोप ईडी कडून केला गेला आहे.प्रवीण राऊत, संजय राऊत आणि आता वर्ष राऊत सर्वच जण आता या सगळ्या प्रकरणात खोलवर अडकत चालले आहेत असेच दिसत आहे.
 
गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासात भ्रष्टाचार होऊन, जमीन परस्पर खासगी विकासकांना विकल्याचे उघड झाले होते. या घोटाळ्यात ज्या कंपनीला म्हाडाकडून हे पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते त्या गुरू आशिष कंपनीचे संचालक प्रवीण राऊत यांचे नाव प्रमुख आरोपी म्हणून होते. याच प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यातून वर्ष राऊत यांना बिनव्याजी कर्ज दिले गेल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वर्षा राऊत याही या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक आहेत.
 
या बेकायदेशीरित्या दिल्या गेलेल्या पैशांमधून वर्ष राऊत यांनी मुंबई मध्ये काही सदनिका, अलिबाग, किहीम येथे आठ प्लॉट्सची खरेदी केली असल्याचे ईडीच्या आरोपपत्रात म्हटले आहे. यातील किहीम- अलिबाग येथील प्लॉट्स मधील भागीदार स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या तक्रारीवरूनच संजय राऊत यांना अटक केली गेली आहे. स्वप्ना या शिवसेनेच्या अनेक नेत्यांचे व्यावसायिक सल्लागार आणि संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती.
 
वर्षा राऊत यांनी विकत घेतलेल्या मालमत्ता या याच निधीतून विकत घेतल्या आहेत. पत्राचाळ घोटाळ्यातील संजय राऊत, वर्षा राऊत, सुजीत पाटकर यांचा सहभागाचे पुरावे भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी जनतेसमोर आणले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच ही कारवाई होणे अपेक्षित होते पण त्याकाळात तपासाला हवी ती गती देण्याचे आली नव्हती. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर या तपासाला गती येऊन आता प्रकरणातील कारवायांचा वेग वाढला आहे.