खेळ श्रावणातले स्नेह संस्कृती जपण्याचे

    30-Aug-2022   
Total Views |
 
shravan
 
 
 
 
चेंबूर एज्युकेशन सोसायटी’ प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेने दि. २३ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या मातांसाठी ‘खेळ श्रावणातले’ उपक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बृह्न्मुंबई महानगरपालिकेच्या निरीक्षिका भारती भवारी, जी वॉर्डच्या अधिकारी वर्षा गांगुर्डे, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. अपर्णा देसाई, शालेय समितीच्या अध्यक्ष भूषणा पाठारे आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये ‘या हृदयीचे त्या हृदयी’ निर्माण झालेले स्नहेबंध इथे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
 
सासुरवाशिण म्हणून तिचे माहेरी जसे कौतुकाने स्वागत केले जाते, तसेच पालक मातांचे स्वागत करावे, त्यांचे सुखदुःख वाटण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, त्यातून समस्या समजून त्याचे निराकरण करतानाच शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शाळा विविध उपक्रम राबवते. माताच का? आम्ही विद्यार्थ्यांच्या पित्यांसाठीही पितृ संमेलन आयोजित केले होते. हेतू हाच की, पालकांनी एकत्रित यावे. त्यांच्यात स्नेह निर्माण होऊन पालक आणि शिक्षक तसेच शाळा यांच्या सहयोगातून शाळेसोबतच विद्यार्थी घडावेत आणि पालकांच्या आयुष्यातही काही सकारात्मक व्हावे. पालक मातांसाठी, अंगणवाडी सेविकांसाठी मंगळागौरीचा खेळ तसेच या कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शनाचे आयोजनही केले आहे.
 
 
आमच्या शाळेच्या उपक्रमाबद्दल मी किंवा आमच्या शिक्षकांनी सांगण्यापेक्षा पालकच तुम्हाला शाळेच्या उपक्रमाबद्दल सांगतील.” ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’च्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे सर सांगत होते. त्यांच्या म्हणण्याला शाळेच्या सर्वच शिक्षिकांनी दुजोरा दिला. अर्थात, ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’च्या प्राथमिक शाळेचे यश मला माहिती होते. मुंबईभरच्या महानगरपालिकेच्या शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडत असताना या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांची रांग लागलेली मी पाहिलेली आहे. असे का? तर शाळेत राबविले जाणारे विविध उपक्रम.
 
 
ते उपक्रम केवळ शासकीय कागदपत्राच्या रिकाम्या जागा भरण्यासाठी नसतात, तर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या आयुष्यातल्या रिकाम्या जागा संस्कारीत महत्त्वाकांक्षा आणि यशाचे मापदंड भरणारे उपक्रम असतात. शाळेत विद्यार्थी यावेत यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि एकंदर सर्वच शिक्षकवृंद आणि कर्मचारी अतिशय सूक्ष्म पातळीवर नियोजन करतात. मराठी शाळा जगली पाहिजे, मातृभाषेतून शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे, हा त्यामागचा ध्यास. या मंगळागौरीच्या खेळासाठी अंगणवाडी सेविकांनाही आदराचे आणि आग्रहाचे निमंत्रण होते आणि हे निमंत्रण स्वीकारून परिसरातील ५० पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
 
विचार करत करत प्रत्यक्ष ‘खेळ श्रावणातले’ कार्यक्रम सुरू असलेल्या सभागृहात गेले. व्यासपीठावर मान्यवर होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. नंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मंगळागौरीचा खेळ सुरू झाला. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालक मातांचे चार गट होते. या महिलांना मंगळागौरीचा कोणात खेळ खेळायचा, हे त्या त्या इयत्तेच्या शिक्षकांनी मोबाईलवर त्यांना पाठवले होते. ते पाहून या मातांनी सराव केला हेाता, तर प्रत्यक्ष खेळाला सुरुवात झाली. ‘मिर्ची जाशिल कैसी म्हणत’ सुंदर नऊवारी साडी नेसलेल्या तरुणी फेर धरत होत्या.
 
 
त्या वर्तुळात असलेल्या चौघीजणी तो फेर तोडण्याचा प्रयत्न करत होत्या. खूप प्रयत्न करून त्यांनी तो फेर तोडला आणि त्या बाहेर आल्या. फेर धरणार्‍या सगळ्या जणीही लहान मुलींसारख्या हसू लागल्या, संसाराचा गाडा रेटताना हरवलेला तारूण्यसुलभ अवखळपणा आज त्यांच्यात पुन्हा उसळून आला होता. पिंगा घालत एकमेकींची मनमुराद थट्टा करताना त्यांच्यात उत्साह ओसंडून आला होता. ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मातांसाठी मंगळागौर आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पारंपरिक नऊवारी साडी, नाकात नथ, हातभर बांगड्या, पैंजण जोडवी, साग्रसंगीत नटून थटून शेकडो माता सहभागी झाल्या होत्या.
 
 
 
त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्या सहज व्यक्त झाल्या. ”लहानपणी गावी आई आतेसोबत मंगळागौरीला जायचो. आज इथे मंगळागौर पुजताना आईची आठवण आली. माहेराला आल्यासारखे वाटले.” डोळ्यातल्या आनंदाश्रूंना वाट देत ती म्हणाली. इतक्यात एक महिला म्हणाली, ” मी अंगणवाडी सेविका आहे. माझच काय, आम्हा सगळ्याजणींचे जगणं, घर-संसार आणि कामाच्या व्यापात मागं सुटलं. पतीचे निधन झाल्यानंतर तर जगच संपलं माझं. पण, मंगळागौरीचा खेळ पाहायला आले आणि पुन्हा किती दिवसांनी मनाला आनंद वाटला.” तिच्या बोलण्यात सत्यता होती. अतिशय साधा चेहरा. कष्ट आणि भोगलेली दु:खे चेहर्‍यावर विराजमान होतीच. पण, त्या दुःखांना भेदून तिच्या चेहर्‍यावरचा आनंद बाहेर आला होता. अर्थात, कुणाला वाटेल की, मंगळागौरीच्या खेळाचे काय ते कौतुक करायचे. पण, कौतुक करण्यासारखेच आहे. कारण, ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’च्या प्राथमिक शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या माता असू देत की आंगणवाडी सेविका असू देत की शाळेतल्या शिक्षिका आणि कर्मचारी महिला असू देत, सगळ्यांना ‘कष्टकरी मुंग्यांचे’ आयुष्य जगण्याचे शाप की वरदान ते जे काही ते लाभले आहे, स्वत:साठी मुद्दाम वेळ काढणे त्यांना शक्यच नाही. त्यांच्यासाठी हे अप्रूपच.
 
 
चेंबूर सिद्धार्थ कॉलनी, भाई भाई नगर, पी. एल. लोखंडे मार्ग परिसरातील मुलं शाळेत येतात. या सगळ्या परिसराची एक मिश्र संस्कृती आहे. कामाच्या आणि जीवनाच्या वेगात लोक पारंपरिक संस्कृती जोपासण्याचाअ आटोकाट प्रयत्न करतात. पण मंगळागौरीसारखा पारंपरिक खेळ मनात असूनही ते खेळू शकत नाहीत. पहिले कारण कुणाच्याही घरी इतकी जागा नाही आणि मिश्र वस्ती असल्यामुळे मंगळागौर खेळायला मैत्रिणी परिसरातूनच मिळत नाहीत. आज इथे त्यांना मंगळागौरीच्या सांघिक खेळातून मैत्रिणी मिळाल्या होत्या. खेळ संपले. प्रत्येकीसाठी भरगच्च अल्पोपहाराचा बेतही होता. अल्पोपहार करता करता एकमेकींच्या थट्टा मस्करीत त्या रंगल्या. त्या गंभीर कष्टकरी सुनांमधील अवखळ संस्कारशील लेकी बाहेर आल्या होत्या. त्यांना विचारले कसे वाटते, तर पूर्वाश्रमीची शेहनाझ पण आता आंतरजातीय विवाह करून हिंदू झालेली स्मृती म्हणाली, ”आज पहिल्यांदा वाटले की मला समाजाने स्वीकारले, मी या समाजाची सून आहे.” तिच्या डोळ्यांतले आनंदाश्रू पाहून सगळ्या जणी पुन्हा गंभीर झाल्या. म्हणाल्या, “खरंच शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे सर आमचे भाऊ आहेत, श्रावणात बहिणींसाठी त्यांनी हे माहेरपण आम्हाला दिले.”
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.