लखनऊ : उत्तरप्रदेश मधील माफियाराज संपवण्यासाठी आणि भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरु केलेल्या बुलडोझर कारवाईने आतापर्यंत चांगलेच यश मिळवले असून गेल्या पाच महिन्यात तब्बल ८६८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. उत्तरप्रदेमधील विधानसभा निवडणुकांमध्ये योगींनी भ्रष्टाचार आणि माफियाराज या बुलडोझर कारवाईने संपूर्णपणे उखडून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
२०१७ पासून आतापर्यंत तब्बल ६२ माफिया टोळ्यांची १८३२ कोटींची संपत्ती जप्त केली गेली आहे. मार्च २०२२ मध्ये योगी पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी हे अभियान जोरात चालू केले आणि आता त्याला चांगलेच यश मिळत आहे. पोलिसांनी आतापर्यंत या कारवाईदरम्यान झालेल्या चकमकींमध्ये तब्बल ९ माफियांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले आहे.
या मोहिमेत आतापर्यंत ९०० माफियांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे, तर विविध जिल्ह्यांत ४१० खटले सुरु करण्यात आले आहेत. ही कारवाई अशीच जोरदार सुरु राहणार आहे आणि जास्तीत जास्त माफियांना गजाआड करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत अशी माहिती उत्तरप्रदेश साहाय्यक पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले आहे. एक बिमारू, माफियाराज असलेले राज्य ही जुनी ओळख पुसून योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली एक विकसित राज्य म्हणून उत्तरप्रदेश पुढे येत आहे हेच यातून दिसत आहे.