भारतीय शेअर बाजाराचा चढता आलेख सुरूच! २१४ अंकांची उसळी

जागतिक बदलांना भारतीय बाजाराचा सकारात्मक प्रतिसाद

    03-Aug-2022
Total Views |
stock
 
 
मुंबई : जागतिक बाजारात होत असलेल्या सकारात्मक बदलांना भारतीय बाजाराने सकारात्मक प्रतिसाद देत चढता आलेख सुरूच ठेवला. भारतीय शेअर बाजार २१४ अंकांनी उसळी घेत ५८,३५० अंकांवर स्थिरावला. निफ्टीमध्येही ५० अंकांची वाढ दिसली. प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सना मागणी राहिल्याने त्यांच्या शेअर्सने उसळी घेतली आहे. जागतिक पातळीवर वाढलेली महागाई, रेंगाळलेले रशिया - युक्रेन युद्ध या सर्वच गोष्टींचे परिणाम होत असले तरी परिस्थितीतून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले.
 
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, जगातील सर्वच प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये येणारी मंदीची लाट ही जगातील सर्वच अर्थतज्ज्ञांच्या मते चिंतेची बाब आहे. तरीही भारतात मंदीची चिन्हे शून्य असल्याने भारतासाठी ही फार मोठी इष्टापत्तीच मानली जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती दिसत असल्याने आणि येणारा सणासुदीचा काळ यांमुळे भारतीय बाजारातील मागणी अजून वाढण्याचीच चिन्हे असल्याने भारतीय बाजारासाठी हा तेजीचा काळ असणार आहे.