मुंबई : गेले अनेक दिवस आमिर खानचा 'लालसिंग चढ्ढा' वादाचा विषय होता परंतु आता यामध्ये अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन' चित्रपटाचीदेखील भर पडली आहे. सध्या 'रक्षाबंधन' सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आहे. गेले अनेक दिवस 'लालसिंग चढ्ढा'वर बहिष्कार टाकत बॉयकोटवरुन हॅशटॅग ट्रेंड होत होते, त्याप्रमाणे आता 'बॉयकोट रक्षाबंधन' हे ट्रेंडिंग झाले आहे. ट्विटरवर युजर्स चित्रपटाचा विरोध करत आहे. कारण याचे कारण चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लन हिचे जुने ट्वीट आहे. तिच्या जुन्या ट्विटवरुन वाद सुरु झाला आहे.
कनिकाने 'गौमूत्रा'बाबत पूर्वी एक ट्विट केले होते. त्यामुळे यूजर्स ती हिंदू विरोधी असल्याचे सांगत आहेत. आता यामध्ये अभिनेत्री कंगना रणावतनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. कनिकाने तिची हिंदू विरोधात असलेली ट्विट्स डिलीट केली आहेत. त्यामुळे कंगना कनिकावर निशाणा साधत म्हणतेय, की फक्त पैशांच्या हव्यासामुळे तिने तिचे हिंदू विरोधी ट्विट डिलिट केले आहे.
कंगना आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हसत लिहितेय, 'हाहा आर्थिक नुकसानीच्या भीतीमुळे कनिकाने हिंदू फोबिक आणि भारत विरोधी तब्बल १७ पोस्ट्स डिलिट केल्या आहेत, बाकी काही नाही! फारच मजेशीर आहे ही.' रक्षाबंधन या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केले आहे. चित्रपटात अक्षय कुमारबरोबर भूमी पेडणेकर ही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी आमिर खानचा 'लालसिंग चढ्ढा' देखील प्रदर्शित होत आहे. यात त्याच्याबरोबर करिना कपूर आहे.