भारतात शून्य आर्थिक मंदी! जाणून घ्या पाच कारणे

    03-Aug-2022
Total Views |
 
recession
 
 
जगात सातत्याने वाढत असलेली महागाई, रेंगाळलेले रशिया - युक्रेन युद्ध, खनिज तेलांच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या किमती या सर्वांनीच सगळ्या जगाला चिंतेत टाकले आहे. अमेरिकेतही कधी नव्हे ते निगेटिव्ह आर्थिक वाढ नोंदवली गेली आहे . दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा आर्थिक विकासदरही सातत्याने कमीच होताना दिसतोय. जगातील सर्वच तज्ज्ञ जग आर्थिक मंदी कडे जातंय असेच सांगत आहेत, अशातच भारताला या आर्थिक मंदीचा अजिबात धोका नाही. भारतात मंदी येण्याची चिन्हे शून्य आहेत असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्लूमबर्ग रिपोर्टने सांगितले आहे. खरंच भारतात मंदी येणार नाही का ? अशी नेमकी काय कारणे आहेत की भारतात मंदी येणारच नाही याचीच चर्चा पुढील पाच मुद्द्यांमध्ये.
 
१ ) इतर देशांची आणि भारतात काय परिस्थिती
 
आशियायी देशांमध्ये चीन मध्ये २० टक्के, जपान, साऊथ कोरिया या देशांमध्ये २५ टक्के मंदीची शक्यता आहे. देशांतर्गत राजकीय, आर्थिक डोलारा ढासळलेल्या भारताचा शेजारील देश श्रीलंकेत तर ८५ टक्के इतकी मोठी मंदीची शक्यता या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आली आहे . जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेत मंदीची चिन्हे ४० टक्के आहेत. या देशांव्यतिरिक न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, तैवान, फिलिपिन्स या देशांमध्ये मध्येही मंदीची लाट येणार हेच या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे. सर्वच आशियायी देशांमध्ये मंदीची लाट येणार असल्याची चिन्हे आहेत. या सर्वच मोठ्या देशांमध्ये फक्त भारतात आर्थिक मंदी येण्याची चिन्हे शून्य आहेत.
 
२ ) भारतात मंदीची शून्य कारणे का ?
 
भारतीय अर्थव्यवस्था अन्नधान्यांच्या बाबतीत एक स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था आहे. देशातील सर्वच नागरिकांची गरज भागेल इतके उत्पादन भारतात होते. भारत अन्नधान्याचा निर्यातदार देश आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसाने यंदा खरीप हंगामात अन्नधान्यांचे उत्पादन चांगले येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतात कृषी क्षेत्र पुन्हा एकदा चांगली वाढ दर्शविण्याची चिन्हे आहेत. एस अँड पी ग्लोबल इंडियाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या रिपोर्ट नुसार भारतीय निर्मिती क्षेत्राने जुलै महिन्यात गेल्या आठ महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे या सर्व गोष्टींमुळे भारतात प्रत्येक क्षेत्रात वाढच होताना दिसत आहे. त्यामुळे भारतात मंदी येण्याची चिन्हे नाहीत.
 
३ ) खनिज तेलांच्या किमती आणि भारतीय आयात
 
जगभरात जसे जसे मंदीचे वातावरण पसरायला लागले तशा खनिज तेलांच्या किमतींमध्ये उत्तर दिसायला लागला. काही महिन्यांपूर्वी अगदी १५० डॉलर प्रति बॅरल इतकी किंमत होण्याची शक्यता होती पण जगभरात मंदी येण्याच्या भीतीने या किमती झपाट्याने घसरत ९७ डॉलर्स प्रति बॅरल पर्यंत पोहोचल्या आहेत ही भारतासाठी खूप चांगली बातमी आहे कारण भारत त्याच्या दैनंदिन गरजेच्या तब्बल ८५ टक्के खनिज तेल आयात करतो. त्यामुळे भारताचं आयातीवरील खर्च कमी होणार असून परकीय चलनाची मोठी बचत होणार आहे. यातून देशात सध्या भडकलेल्या इंधनांच्या किमंती कमी होऊन लोकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
  
४ ) करसंकलनात सातत्याने होणारी वाढ
 
आर्थिक मंदीच्या अनेक कारणांपैकी सर्वात महत्वाचे कारण असते ते देशातील नागरिकांची क्रयशक्ती म्हणजेच खर्च करण्याची क्षमता संपणे, त्यामुळे अर्थव्यवस्थेतील मागणी कमी होऊन देश मंदीकडे वाटचाल करतो. पण भारतात सातत्याने करसंकलनात होणारी वाढ ही भारतीय बाजारात वेगाने मागणी वाढत असल्याचे सांगत आहे. जुलै महिन्यात जीएसटी संकलनाने १ लाख ४९ हजार कोटींचा टप्पा गाठला. सलग पाचव्या महिन्यात देशात १ लाख ४० कोटींहून अधिक करसंकलन झाले. यातून दिसतंय की भारतात मागणी सातत्याने वाढतच आहे. येणाऱ्या काळात येणाऱ्या विविध सणांमुळे यात अजून मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच सध्या जरी भारतीय बाजारात महागाई दिसत असली तरी येत्या काळात परिस्थिती बदलले आणि सगळे पूर्वपदावर येईल असा विश्वास देखील निर्मला सिथरामन यांनी लोकसभेत नुकताच व्यक्त केला आहे.
 
५ ) मागे जे झाले त्याचीच पुनरावृत्ती होणार
 
२००८ मध्ये अमेरिकेतील लेहमन ब्रदर्स ही मोठी वित्तसंस्था बुडाल्यानंतर जगात सार्वत्रिक मंदीचे वारे वाहायला लागले. अमेरिकेसह, युरोपीय अर्थव्यवसस्थांना याचा प्रचंड मोठा फटका बसला होता. त्यावेळी बसलेल्या तडाख्यातून त्या अर्थव्यवस्था अजूनही सावरलेल्या नाहीत पण त्याहीवेळी भारतावर त्याचा फारसा परिणाम झाला नव्हता. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार मोठा असल्याने त्याहीवेळी भारतात मागणी वाढतच राहिली आणि त्यात कृषी क्षेत्राने मोठी कामगिरी बजावत देशाला आधार दिला होता. याहीवेळी असेच होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जरी जागतिक पातळीवर सगळीकडे मंदी आली तरी याहीवेळी याच सर्व गोष्टींमुळे भारत या संकटातून सहीसलामत बाहेर पडेल असा विश्वास सगळेच तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.