गणिताचा लहानगा जादूगार

    03-Aug-2022   
Total Views |

nashik
 
 
लहानग्या वयात गणितासारख्या क्लिष्ट विषयात जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करणार्‍या नाशिकच्या आर्यन शुक्लच्या जागतिक विक्रमाविषयी...
 
 
गणित हा विषय म्हटला की, बहुसंख्य नागरिकांच्या चेहर्‍यावर सर्वांत आधी उमटणारे चिन्ह म्हणजे आठ्या. मात्र, याच गणिताच्या आधारे आपले व आपल्या देशाचे नाव जागतिक कीर्तिवर विराजमान करणारा नाशिकचा आर्यन शुक्ल हा लहानगा गणिताचा जादूगार म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. नुकतीच जर्मनी येथील पेडरबोर्न शहरात ‘मेंटल कॅलक्युलेशन वर्ल्ड कप’ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या नाशिकच्या आर्यन नितीन शुक्ल याने विजेते पद पटकावले.
 
 
१५ देशांतील सर्वोत्कृष्ट ४० ‘ह्युमन कॅलक्युलेटर’ची या स्पर्धेत निवड करण्यात आली होती. स्पर्धेतील वयस्कर स्पर्धक हा वय वर्ष ६०चा होता. अशावेळी अवघे १२ वर्षांच्या आर्यनने आपल्या पहिल्याच स्पर्धेत जिंकण्याचा पराक्रम केला.
 
 
त्याशिवाय पाच विश्वविक्रम त्याने आपल्या नावावर केले. लेखी स्वरूपाच्या या स्पर्धेत दहा विषयांची परीक्षा घेण्यात आली. ज्यात दहा अंकी दहा संख्यांची बेरीज करणे, तसेच सहा अंकी संख्येचे पाच अपूर्णांकपर्यंत वर्गमूळ काढणे, तसेच जास्तीत जास्त दहा अंकी भागीले पाच अंकी संख्या सोडवणे, दोन-आठ अंकी संख्याचे गुणाकार करणे, एक हजार या संख्येला सहा अंकी संख्येच्या वर्गमुळाने भागणे असे आणि इतर असे दहा प्रकारचे क्लिष्ट प्रश्न यात विचारले गेले. या प्रश्नांची उत्तरे विक्रमी वेळेत सोडवत आर्यनने आपले नाव जागतिक विक्रमावर कोरले.
 
 
याशिवाय स्पर्धेत सर्वांना स्वेच्छेने विश्वविक्रम करण्याची संधीदेखील होती, ज्यात आर्यनने २० अंकी संख्येला २० संख्येने १ मिनिट ४५ सेकंदात गुणून आधीचे तीन मिनिटांचे रेकॉर्ड मोडले. तसेच, पाच अंकी संख्येला पाच अंकी संख्येने कमी वेळात गुणायचे रेकॉर्डदेखील त्याने आपल्या नावावर केले. दहा अंकी संख्येला पाच अंकी संख्येच्या दहा सेटला ४१ सेकंदात सोडवून त्याने नवा विश्वविक्रम केला. जो आधी ५३ सेकंदांचा होता. सदरचे रेकॉर्ड भविष्यात सुधारण्याचा आणि आणखी काही रेकॉर्ड करायचा मानस आर्यनचा आहे.
 
 
‘एमसीडब्ल्यूसी’ या नावाने ‘मेंटल कॅलक्युलेशन’ क्षेत्रात नावारूपास असलेली ही स्पर्धा सर्वांत जास्त प्रतिष्ठित मानली जाते. मागील दोन्ही स्पर्धेत जपानी खेळाडूंनी पहिले दोन स्थान पटकावून आपला दबदबा निर्माण केलेला होता. ही स्पर्धा जिंकल्याने आता आर्यन हा याच वर्षी दुबई येथे होणार्‍या ‘मेमोरियाड ऑलिम्पिक’ स्पर्धेत भाग घेणार आहे. कौतुकाची बाब म्हणजे, आर्यन भारतीय चमू सोबत एकटाच या स्पर्धेत सहभागी झाला होता. इयत्ता सातवीत शिक्षण घेणारा आर्यन हा त्याच्या या अभूतपूर्व कौशल्याने कौतुकास पात्र ठरत आहे.
 
 
आर्यनने वयाच्या सहाव्या वर्षांपासून ‘मेंटल मॅथ’चे ‘जिनियसकिड’ प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. यातूनच त्याला अंक आणि गणित यांची खर्‍या अर्थाने आवड निर्माण झाली. वयाच्या १२व्या वर्षी फक्त गणित या विषयामुळे विश्वविजेतेपद मिळू शकते इतके गणित जीवनात महत्त्वाचे असल्याचे तो आवर्जून नमूद करतो.
 
 
गणित आणि ‘मेंटल मॅथ’मुळे अनेक जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेता येणे, अनेक ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवायला मिळणे, यामुळे आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत झाली. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकासात गणिताचा असलेला भाग हा मोठा असल्याचे तो नमूद करतो. जागतिक पटलावर भारताचे नेतृत्व करताना प्रचंड आनंद आणि जबाबदारीची जाणीव होत असल्याचे तो सांगतो. शून्याची ओळख जगाला भारताने करून दिली. त्यामुळे गणिताच्या क्षेत्रात भारतीयांचे नाव आदराने घेतले जाते.
 
 
यावेळीदेखील आपल्याला हाच अनुभव आल्याचे आर्यन आवर्जून सांगतो. अजून काही वर्षे जागतिक स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून चांगली कामगिरी करण्याचे ध्येय आर्यन बाळगून आहे. नावडता असणारा गणित हा विषय आवडीचा व्हावा म्हणून विद्यार्थ्यांनी अंकाशी खेळणे, प्रयोग करणे व झालेल्या चुकांतून स्वत:ला सुधारणे आवश्यक असल्याचे तो सांगतो. गणिताचे यश हे गणिताचा नेमका प्रश्न समजून घेण्यात आहे. प्रश्न समजल्यास त्याची निश्चित उकल करता येते आणि सरावाने तसा दृष्टिकोन तयार होतो, असे आर्यन सांगतो. आवडीच्या कामात स्वत:ला झोकून दिल्यास यश लांब नाही. कष्ट हा यशस्वी होण्याचा राजमार्ग असल्याचे तो सांगतो.
 
 
बौद्धिक गणिते ही जितकी बुद्धीच्या साहाय्याने सोडवली जात असतात तितकीच त्यासाठी चिकाटी आणि धैर्य आवश्यक असते. गणित या विषयाची भीती आयुष्यातून वजा करावयाची असल्यास गणिताच्या मैत्रीचा गुणकार करणे नक्कीच आवश्यक आहे. लहान वयात जागतिक स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करून आर्यनने अनेक विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
 
 
आवश्यक तेवढा हिशोब जमला तरी खूप, बाकी गणिताचे प्रत्यक्ष जीवनात काय महत्त्व. असा विचार करणारे काही नागरिक असतात. त्यांच्यासाठी आर्यनचे हे यश हे उत्तम वस्तुपाठ आहे. असेच वाटते. आर्यनच्या भावी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.