‘वाचनवेल पुस्तक’ भिशीचा अनोखा उपक्रम

    03-Aug-2022
Total Views |

pune
 
 
पुणे: नागरिकांमध्ये पुस्तक वाचण्याची आवड निर्माण व्हावी, पुस्तक वाचन चळवळीला चालना मिळावी, या उद्देशाने ’वाचनवेल पुस्तक’ भिशी सुरू करण्यात आली. हा उपक्रम एक लाख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आहे. या मुख्य उपक्रमाबरोबरच विविध नामांकित साहित्यिकांचा वाचकांशी संपर्क व्हावा, म्हणून ’वाचनवेल प्रतिष्ठान’ने द्वितीय वार्षिक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले असून दि. ६ आणि ७ ऑगस्टला भोसरी येथील ‘कै. अंकुशराव लांडगे सभागह’ येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ‘वाचनवेल’च्या संस्थापक अध्यक्षा रूपाली सोनवणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
 
 
या वेळी सदस्य डॉ. संतोष मोरे, दीपेश मोहिते, गणेश बनसोडे, किरण फलफले आदी उपस्थित होते. दीपेश मोहिते यांनी सांगितले की, “मागील तीन वर्षांपूर्वी ४० वाचकांपासून सुरू झालेला पुस्तक भिशीचा उपक्रम दोन वर्षांत दहा हजार वाचकांपर्यंत पोहोचला आहे.” गणेश बनसोडे म्हणाले की, या मेळाव्यात शनिवार, दि. ६ ऑगस्ट रोजी पहिले सत्राचे उद्घाटन आणि ‘वाचनवेल अखिल भारतीय महाकरंडक काव्यस्पर्धे’चा प्रारंभ ज्येष्ठ कवी अनंत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ज्येष्ठ साहित्यिक राजन खान, अच्युत गोडबोले, मनोज अंबिके, वास्तुविशारद कुमार दादा, अभिनेते विनम्र भाबल यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता होणार आहे. दुसरे सत्र आणि स्पर्धेचा दुसरा भाग दुपारी २.३० वाजता होईल.
 
 
डॉ. संतोष मोरे यांनी म्हणाले की, रविवार, दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी साहित्यिक, प्रकाशक, वाचक, वितरक यांचा आनंद सोहळा होणार आहे. यामध्ये सकाळी ८ वाजता सादरीकरण त्यानंतर लेखक मनोज अंबिके यांचे ‘वाचनातून स्वविकास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सकाळी १०:३० वाजता प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांची दीपेश मोहिते मुलाखत घेतील. सकाळी ११:३० वाजता ‘ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांचे साहित्य आणि माणूस’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर महाकरंडक स्पर्धेचा निकाल आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशीही माहिती डॉ. संतोष मोरे यांनी दिली.
 
 
किरण फलफले यांनी सांगितले की, “दुपारी ३ वाजता वाचनवेल पुस्तक भिशी सदस्यांचे मनोगत, संस्थापक अध्यक्ष यांचे भाषण आणि अध्यक्ष भाषण अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहमेळाव्यास मोफत प्रवेश आहे.”