म्हणून उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसच्या माजी आमदाराला फितवले
29-Aug-2022
Total Views |
मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे व वंचित आघाडीकडून पूर्व विधानसभा लढविलेले जिल्हा परिषद माजी सदस्य अजित मगर यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे एकीकडे पुढील निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढवणार असल्याच्या चर्चा असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसच्या माजी आमदारालाच फोडल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठवाने शिवसेनेला मोठे भगदाड पडले. पक्षातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंचे नेतृत झुगारून देत शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे हिंदुत्वाशी दुरान्वये संबंध नसणाऱ्या सुषमा अंधारे यांना पक्षात सामावून घेतले तर हिंदुत्वाचा कायम द्वेष करणाऱ्या संभाजी ब्रिगेड सारख्या संगठणांशी उद्धव ठाकरे यांनी युती केली.
राजू मुंजाजी विभुते या कोळी समाजातील तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी टारफे यांच्यावर सप्टेंबर २०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१४ साली कॉंग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव खासदार झाल्यानंतर कळमनुरीतून संतोष तरफे यांची आमदारपदी वर्णी लागली. २०१९ च्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी टारफे यांना पराभवाची धूळ चारली. गेल्या काही काळापासून राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्याशी खटके उडत असल्याने टारफे यांनी कॉंग्रेसला सोडचिट्ठी दिली आणि आपल्या हाती ठाकरेंचे शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला.
कळमनुरी विधानसभेत मागच्या वेळी वंचितचे मगर हे दुसऱ्या स्थानावर तर टारफे हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यामुळे सध्याचे कळमनुरीचे आमदार आणि शिंदे समर्थक संतोष बांगर यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही चाल खेळली असल्याचे बोलले जाते.