फडणवीसांच्या कार्यालयामुळे तब्बल २० वर्षानंतर अनुसयाबाईंना मिळाली हक्काची पेंशन!
29-Aug-2022
Total Views |
मुंबई : गोवा मुक्ती संग्रामातील एका स्वातंत्र्यसैनिकाच्या ८७ वर्षीय पत्नीचा पेन्शनच्या लढ्याला तब्बल २० वर्षानंतर यश आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या संवेदनशीलतेमुळे अनुसयाबाई वैजनाथ नवले (परभणी) यांची पेन्शन सुरू झाली. लालफितशाहीच्या कारभारामुळे पेंशन बराच काळ प्रलंबित होती. दरमहा तब्बल २६ हजारांहून अधिक रक्कम त्यांना मिळणार असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला तिचा न्याय्य हक्क मिळाला आहे. आपल्या इतक्या वर्षांच्या लढ्याला यश आल्याने आजी भारावून गेल्या असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
अनुसयाबाई यांचे पती वैजनाथ खेमजी नवले यांनी गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतला होता. १९९४ साली त्यांचे निधन झाले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांसाठी २० जून २००३ पासून पेन्शन योजना सुरू केली होती. स्वातंत्र्यसैनिकांच्या पश्चात त्यांच्या पत्नीलाही आयुष्यभर पेन्शन देण्याची या योजनेत तरतूद आहे. अनुसयाबाई या योजनेअंतर्गत कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केला होता. मात्र त्यांचा प्रस्ताव पुढे गेला नाही.
दिल्ली येथे कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांना अनुसयाबाईंच्या लढ्याची माहिती मिळाली. त्यांनी गृह मंत्रालयाच्या स्वातंत्र्यसैनिक पेन्शन विभागाशी संपर्क साधला आणि अनुसयाबाईंसोबत भेटीची वेळ ठरवली. संबंधित अधिकाऱ्याला सर्व प्रकरण सांगितले. त्यानंतर तातडीने त्यांचे काम मार्गी लागले. अखेर २६ ऑगस्ट रोजी अनुसयाबाई यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली.