आनंद उत्सवाचा...

    29-Aug-2022
Total Views |
kasaba
 
 
 
 
गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीची धूम आटोपल्यावर उत्सवप्रिय पुणेकर आता श्रीगणेशाच्या आगमनासाठी सज्ज आहेत. लोकमान्य टिळकांनी पुण्यातच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेचा श्रीगणेशा केला आणि तेव्हापासून शेकडो वर्षांच्या या परंपरेत कधीही खंड पडला नाही. फक्त गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीने काय तो अडथळा आणला. मात्र, पिढ्यान्पिढ्या हा उत्सव अगदी आनंदात साजरा करीत राहण्यात कोणतीही कसर बाकी राहिली नाही, एवढेच कशाला सातासमुद्रापार राहून देखील गणेशोत्सव आता साजरा होऊ लागला यातच या अद्भुत संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित होते. सारे समाज एकोप्याने आपल्या देशाचे रक्षण, प्रगती करण्यात सक्रिय राहावा, हा हेतू सफल करण्यात पुणेकरांनी ठेवलेला आदर्श नक्कीच स्पृहणीय आहे.
 
आज कोरोनानंतर हा उत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळे आणि संघटनांनी बदलत्या काळानुसार सेवाभाव आणि संस्कृती रक्षणाचा पायंडा रचला आहे आणि त्याला जगभरातून दाद मिळत असते.येथील देखावे हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. भव्य उत्सवातील अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून जी रोजगार निर्मिती होत असते, ती भविष्यातदेखील व्यवसायातील नव्या कौशल्यास वाव देण्यास पुरेशी असते. यातूनच आजच्या भाषेत नवे ‘स्टार्टअप्स’ उदयास येतात. ‘डिजिटल’ युगात नवे किंवा संकेतस्थळाच्या तसेच युट्यूबच्या माध्यमातून देखील नवी पिढी हा उत्सव थाटात साजरा करीत असते. पुण्यातील ‘आयटी’ क्षेत्रातील तरुणाई यात माहीर आहे.
 
यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काळ बदलला तरी पुणेकर नागरिकांनी संस्कृती दर्शन घडविण्याची परंपरा कायम ठेवली आहे. अनेक जुनी मंडळे आजदेखील देखाव्यातून भारतीय उज्ज्वल परंपरेचं मनोहारी दर्शन घडवीत असतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ३०८ वे उत्सवाचे वर्ष साजरे करणार्‍या पेशवेकालीन मुजुमदार वाड्यातील गणेशोत्सव रविवारपासून सुरू झाला. ऋषी पंचमीपर्यंत चालणारा हा उत्सव पंचधातूची वल्लभेष दशभुज गणरायाच्या पूजन दर्शनाची पर्वणी असतो. प्रसिद्ध दगडुशेठचे यंदा १३० वे वर्ष. अशी कितीतरी उदाहरणे आहेत, त्यामुळे ही उत्सवी, आनंदी, धामधूम नक्कीच मानवी मनात ऊर्जा भरणारी आहे. अशा या यंदाच्या निर्बंधमुक्त गणेशोत्सवामुळे एक सकारात्मक आणि उत्सवी ऊर्जा पुण्याच्या वातावरणात सर्वत्र भारावलेली दिसते.
 
...आणि ‘कल्याणकारी योजनां’चा
 
हे लेखन सुरू असताना एका राजकीय पक्षाचे नेते स्वतः नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचा जाणूनबुजून विसर ठेवून मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांची यादी वाचून दाखवीत असल्याची बातमी वाहिन्यांवर दिसत होती. त्यात ते सांगत होते, मोदी आश्वासने पाळत नाहीत. सारी हयात या देशाची तसेच राज्यातील नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळालेला हा नेता किती ढोंगी आहे, हे नागरिकांच्या लक्षात येत होते. जेथून हे नेते येतात त्याच पुण्यात मात्र प्रत्येक दिवशी कोठे ना कोठे मोदी सरकारच्या ‘कल्याणकारी योजनां’चा लाभ नागरिकांना मिळावा म्हणून आणि आणि मोदी यांनी दिलेली आश्वासने पाळावी म्हणून अनेक कार्यकर्ते कार्यरत असल्याचे चित्र दिसत होते.
 
पर्वती भागात मोजून नऊ ते दहा महिला हातात मोदीविरोधी फलक घेऊन एका कोपर्‍यात काहीतरी घोषणा देत होत्या. मात्र, ना त्या घोषणा त्यांना समजत होत्या आणि कोणीही मोदी विरोधक त्याला समर्थन म्हणून पुढे येत नव्हता. इतकी केविलवाणी अवस्था एकेकाळी दबदबा असलेल्या या शहरातील नेत्याच्या पक्षाची होत असल्याचे बघून अनेकजण हसत होते. त्याचवेळी पुण्यातील वास्तव बनून त्रासदायक ठरू पाहणार्‍या वाहतूककोंडी, स्थानिक रस्त्यांवरील खड्डे या मुद्द्यांवर येथील आमदार आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे संबंधित यंत्रणेला त्वरित उपाय करा आणि पुणेकर नागरिकांना दिलासा द्या, म्हणून निर्देश देत होते.
 
कोणताही मुद्दा नसलेले विरोधक पुण्यात येऊन माध्यमांसमोर आम्ही आक्रमक आहोत, हे दाखवीत असताना येथील बहुतांश स्थानिक नेते मोदी सरकारच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा म्हणून कार्यरत होते. मग ‘सुकन्या जनधन’, ‘आधार कार्ड लिंक करणे’ किंवा इतर लाभकारक योजनांतून लाभ मिळावा यासाठी हे कार्य सुरू असल्याचे चित्र नक्कीच नागरी सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने आश्वासक वाटते. पुण्यात दररोज कितीतरी भागात हे कल्याणकारी कार्य सुरू असून त्या लाभामुळे लोक आनंदी होत आहेत. पण, विरोधकांकडे पुणे असेल राज्य किंवा एकूणच देशभरात, सांगण्यासारखेही काही नाहीच म्हणा. म्हणूनच तर मोदीविरोध या एकमेव अजेंड्यासह ही मंडळी बावचळलेली दिसतात. असो. श्रीगणेश यांना सद्बुद्धी देवो, हीच प्रार्थना!
 
 - अतुल तांदळीकर