पूरसंकटातून गहिरे आर्थिक संकट

    29-Aug-2022   
Total Views |
 
pakistan
 
 
 
आधीच आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या पाकिस्तानला मागील काही दिवसांत अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य पर्जन्याचा जोरदार तडाखा बसला. या पावसाचा जोर इतका भयंकर होता की, पाकिस्तानातील धरणे, बांध हा जलप्रवाह रोखू शकले नाहीत. परिणामी, पाकिस्तानचे खासकरून सिंध आणि खैबर पख्तुनख्वा प्रांत पूर्णपणे जलमय झाले असून एक हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. या पुराची दाहकता इतकी भीषण होती की, तीन लाखांहून अधिक घरे जमीनदोस्त झाली. लाखो लोकं बेघर झाले असून उपाशी अवस्थेत केवळ सरकारी मदतीवर अवलंबून आहेत. २२ कोटींच्या लोकसंख्येच्या या देशातील तब्बल ३.३ कोटी जनतेला, म्हणजेच १५ टक्के लोकसंख्येला या पुराने आपल्या कवेत घेतल्याने पाकिस्तानमध्ये आपात्कालीन आणीबाणीची घोषणा सरकारला करावी लागली. शाहबाज शरीफ यांच्या सरकारने प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत पुढील एका आठवड्यांत देण्याचे आश्वासन दिले खरे. परंतु, पाकिस्तानातील या पुराची दाहकता लक्षात घेता, ही सरकारी मदत गरजूंपर्यंत वेळेत पोहोचेल अथवा नाही, ही साशंकता आहेच.
 
 
 
पाकिस्तानसारख्या नद्यांनी व्याप्त प्रदेशात पूरसंकट तसे नवे नाहीच. यापूर्वी २०१०  साली अशाच महापुराने पाकिस्तानातील लाखो लोकांचे संसार उघड्यावर पडले होते. त्या पुरानंतरही अनेक लहान-मोठे पूर पाकिस्तानला हुलकावणी देऊन गेलेच. परंतु, यंदाच्या पुराने पाकिस्तानींच्या मनात २०१० च्या पुराच्या काळ्या आठवणी जागृत केल्या. त्यातच यंदा देशाच्या तिजोरीत आधीच खडखडाट असल्यामुळे पाकिस्तानने मदतीसाठी मित्रदेश, जागतिक संस्थांकडे मदतीचा हात मागितला आहे.
  
 
 
केवळ पाकिस्तानच नाही, तर यावर्षी जगभरातील कित्येक देशांना जागतिक तापमानवाढीच्या संकटाचा सामना करावा लागला आणि आता पाकिस्तानातील महापुराने पुन्हा एकदा जागतिक तापमानवाढीच्या संकटाची भीषणता अधोरेखित केली आहे.पाकिस्तानातील महापुरामागची कारणे शोधायचा प्रयत्न केला असता, यंदा अतिवृष्टी हे त्यामागील एक प्रमुख कारण समोर येते. पाकिस्तानमध्ये मान्सून साधारण १ जुलै रोजी दाखल होतो. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिनेच पाकिस्तानात पावसाळ्याचे मानले जातात. सप्टेंबरमध्ये होणार्‍या पर्जन्यमानाचे प्रमाण तुलनेने कमी असते. पण, यंदा पाकिस्तानच्या सरासरी पर्जन्यापेक्षा तब्बल अडीचपट अधिक पावसाने पाकिस्तानला अक्षरश: झोडपले. सिंध प्रांतात सरासरीच्या आठपट, तर बलुचिस्तानात सरासरीच्या पाचपट अधिक पर्जन्यमान नोंदवण्यात आले. त्यामुळे सिंधू खोर्‍यातील पाचही झेलम, चिनाब, रावी, सतलज, सिंधू या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आणि पाकिस्तानातील १५० जिल्ह्यांपैकी ११० जिल्हे हे पाण्याखाली गेले.
 
 
 
पाकिस्तानातील यंदाच्या या महापुरामुळे तब्बल तीन हजार किमीहून अधिक रस्ते वाहून गेले किंवा उद्ध्वस्त झाले. दीडशेहून अधिक लहान-मोठे पूल वाहून गेले. साडेसात लाखांहून अधिक जनावरे मृत्युमुखी पडली, तर सहा लाखांच्या आसपास घरांचे नुकसान झाले. आगामी काळात हा आकडा वाढण्याची भीतीदेखील वर्तविली जात आहे. सरकारने आपल्या परीने मदतकार्य सुरू केले असले तरी ही पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी सरकारी यंत्रणा मात्र अपुरीच म्हणावी लागेल. त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाकडेही आपात्कालीन मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. या महापुराचा मोठा आर्थिक फटका पाकिस्तानला बसला असून या संकटातून सावरण्यासाठी पाकिस्तानला पुढील दोन ते तीन महिन्यांचा कालावधीही लागू शकतो. शिवाय मोठ्या प्रमाणात नागरिकांना अन्नधान्याबरोबरच कपडे, औषधांचीही तातडीची मदत सरकारला करावी लागेल. त्यातही पूरग्रस्तांच्या निवार्‍याची तात्पुरती सोय करून भविष्यात नदीपात्रापासून दूर गृहनिर्माण प्रकल्प सरकारला हाती घ्यावे लागतील. तसेच, पुरामुळे उद्ध्वस्त झालेले उद्योगधंदे, नोकरी-व्यवसाय यांना उभारी देण्यासाठीही पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल.
 
 
एकूणच या पूरसंकटामुळे पाकिस्तानसमोर आव्हानांचा डोंगर उभा राहिला असून शरीफ सरकार पाकिस्तानला पुन्हा उभे करण्यात यशस्वी ठरते की, हा देश दिवाळखोरीच्या आणखीन एक पाऊल जवळ जातो, ते येणारा काळच ठरवेल.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची