नवी दिल्ली : भ्रष्ट अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या संगनमताने उभे राहिलेले नोएडातील सेक्टर ९३ मधील ट्वीन टॉवर्स अखेर जमीनदोस्त झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनेक अडचणींनी रखडलेली ही कारवाई अखेर प्रत्यक्षात आली. एडिफाय इंजिनीअरिंग कंपनीने काही दिवस पूर्वतयारी करून स्फोटकांच्या मदतीने ३२ मजली एपेक्स आणि २९ मजली सियान हे दोन टॉवर्स पाडले गेले. गेले काही दिवस राबणाऱ्या ४६ जणांच्या टीमने ही कारवाई पूर्ण केली आहे. टॉवर्स पडल्यानंतर परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ही कारवाई होण्याआधीच तेथील ७ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते
का पाडले गेले ट्वीन टॉवर्स ?
मुख्यतः या कारवाईसाठी खरेदीदारांनी दिलेला लढा कारणीभूत ठरला. हे टॉवर्स बांधले जात असताना त्यासाठी असलेले नियम सर्रास पायदळी तुडवले गेले होते. गेल्या १५ वर्षांपासून हा वाद चालू होता. २००४ मध्ये या टॉवर्सच्या बांधकामासाठी भूखंडाचे वाटप करण्यात आले होते. नोएडा प्राधिकरणाने या साठी भूखंडाचे वाटप केले होते. या बांधकामासाठी करारबद्ध केलेल्या सुपरटेक ग्रुपला बांधकामासाठी सर्व परवानग्या आणि प्रमाणपत्रे दिली गेली. त्यानुसार सुपरटेक ग्रुपने बांधकामासाठी नकाशादेखील तयार केला होता.
२००९ मध्ये सुपरटेक ग्रुपला बांधकामासाठी जास्त एफआरए मिळाला पण त्यानुसर आधी ठरल्याप्रमाणे काम करण्याऐवजी सुपरटेक ग्रुपने टॉवर्सची उंची वाढवून बेकायदा बांधकाम सुरु केले. त्याविरोधात खरेदीदारांनी जोरदार आवाज उठवत, नोएडा प्राधिकरणाकडे दाद मागितली पण प्राधिकरणाने सुपरटेकच्या बाजूने निकाल दिला. त्याविरोधात खरेदीदारांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने समिती नेमून चौकशी केली असता खरेदीदारांचे आक्षेप योग्य निघाले त्यामुळे उच्च न्यायालयाने हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असता सर्वोच्च न्यायालयानेही अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशांवर शिक्कामोर्तब केले. पुढे कोरोना काळामुळे दिरंगाई होत होत अखेर रविवारी दुपारी हे टॉवर्स पाडण्यात आले.