कालाय तस्मै नम:।

    28-Aug-2022   
Total Views |

sambhaji
 
 
मा. बेस्ट सीएम’ (इथे ‘मा.’ म्हणजे माजी हे कृपया लक्षात घ्या) आमच्या उद्धव साहेबांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा घेऊन भाजप पुढे जातो की नाही, याची चिंता आहे. उद्धव ठाकरे यांना संघाचा विचार आणि भूमिकेची इतकी काळजी का वाटावी? संभाजी ब्रिगेडसारख्या हिंदुत्वाला नाकारणार्‍या संघटनेचे मांडलिकत्व स्वीकारून दुसरीकडे रा. स्व. संघाच्या विचारांवर बेगडी प्रेम दाखवण्याचे कसब उद्धव ठाकरेच दाखवू शकतात. नव्हे, ते स्वत: म्हटले होते की, बाळासाहेब भोळे होते पण मी भोळा नाही. मी धूर्त आहे. तर असे भोळे नसलेले उद्धव ठाकरे.
 
 
गेल्याच वर्षी दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी संघाच्या विचारांवर थातुरमातूर (सामान्यांच्या भाषेत चिंधी) प्रश्न उपस्थित केले होते. रामभाऊ म्हाळगी संस्थेबद्दल काहीबाही बोलणारे हेच ते उद्धव ठाकरे. आज यांना रा. स्व. संघाच्या विचारांची आठवण आली. कारण त्यांनाही माहिती आहे की, कोरोना काळातच काय? कोणत्याही आपत्तीमध्ये समाजासाठी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकच होते. समाजासाठी काम करण्यामध्येे संघाचे स्वयंसेवक (यात संघाच्या विचारधारेशी निगडीत सर्वच महिला पुरूष कार्यकर्ते) आघाडीवर असतात. धारावीमध्ये कोरोना आटोक्यात आला, याचे श्रेय कुणीही लाटले, तरीसुद्धा प्रत्यक्ष धारावीतील लोकांना माहिती आहे की, तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेले लोक दिवस-रात्र अक्षरश: खपत होते. खपत होते यासाठी की, त्यातले काही जण कोरोना होऊन देवाघरी गेले.
 
 
अर्थात, ज्याच्या हाती ससा तो पारधी या न्यायाने आणि संघ परिवाराला जाहिरात करण्याची सवय नसल्याने या सगळ्या सेवाकार्याबद्दल कुठेही वाच्यता झाली नाही. या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत सत्ताधार्‍यांनी धारावी वाचवली,मुंबई वाचवली, असे म्हणणे सुरू केले. उद्धव ठाकरेंनीही स्वत: स्वत:ची पाठ थोपटवली. मात्र, हे करत असताना त्यांना आणि त्यांच्या आजूबाजूच्या कोंडाळ्याला माहिती होते आणि आहे की, हे श्रेय केवळ रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे आहे. लोकांपर्यंत पोहोचून लोकांना सोबत घेऊन विधायक काम करण्याची ताकद केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे. त्यामुळेच सत्ता गेल्यावर आणि समोर केवळ अधःपतन उरल्यावर उद्धव ठाकरे यांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार दिसू लागले. कालाय तस्मै नम:।
 
 
समाजाने प्रश्न विचारावा!
 
मी आदिवासीचा बच्चा आहे. हार मानणार नाही. झारखंडचा मुलगा आहे,” असे नुकतेच झारखंड मुक्ती मोर्चाचे तळ्यात मळयात असणारे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले. हेमंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे तर दुसरीकडे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ते म्हणाले, “मी महाराणा प्रतापाचा वशंज असून राजपूत आहे.” या दोघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यावर कारवाई झाली असता, त्यांना त्यांच्या जाती का आठवल्या? नुकतेच विदेशी चर्चासत्रात हेमंत यांनी मत मांडले होते की, आदिवासी कधीही हिंदू नव्हते. आमचा धर्म सरणा आहे. मात्र, भ्रष्टाचारविरोधी कारवाई झाल्यावर आता त्यांना आदिवासी शब्द आठवला आहे. झारखंडमधील विविध आदिवासी समूहांनी एकत्र येत हेमंत यांच्यासाठी समर्थन द्यावे, हेच यामागचे कारण आहे. दुसरीकडे अख्खा राजपूत समाज ‘पद्मिनी’ चित्रपटाविरोधात एकत्र येत असताना मनीष सिसोदिया यांनी ‘पद्मिनी’ चित्रपटाला समर्थन दिले होते. राजपूत समाजाच्या भूमिका त्यावेळी मनीष यांच्यासाठी गौण होती. आता भ्रष्टाचार उघडकीस आल्यावर त्यांना आपण राजपूत आहोत, असे आठवले?
 
 
भारतीय समाजात पाप-पुण्याचे हिशोब पार चोख ठेवले जातात. त्यामुळेच हेमंत यांनी मुख्यमंत्री असताना स्वत:ला खनिज खाणीचा पट्टा कसा मिळवला, तसेच त्यांचे आमदार पंकज मिश्रा आणि सोशल मीडिया सल्लागार अभिषेक यांनाही खनिज खाणीचे कंत्राट कसे मिळाले, याबद्दल हेमंत यांनी उत्तर देणे अपेक्षित आहे. हेमंत यांची पत्नी कल्पना यांना ही अशीच खनिज खाण जमीन मिळाली. त्याबद्दल न्यायालयात खटला सुरू असताना त्यांच्या वकिलाने जबाब दिला होता की, ती जमीन सरकारला परत करण्यात आली. हे सगळे भ्रष्टाचार नाही तर काय आहे? हेमंत यांच्या या भ्रष्टाचाराने आदिवासी समाजाचे कोणते भले झाले? समाजाची प्रतिमा उंचावली का? तसेच दारू भ्रष्टाचारात अडकलेले मनीषही राजपूत समाजासंदर्भातील योगदानाबद्दल काही बोलतील का? की केवळ भ्रष्टाचारात कोट्यवधींची माया मिळवून ती पचवण्यासाठी जातींचा आधार घेतील? समाजाने अशा लोकांना प्रश्न विचारायची वेळ आली आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.